*सामान्यातून असामान्यत्वाची झेप घेणारे व्यक्तिमत्त्व...!*
*पोलीस उपनिरीक्षक बुद्धू साहेब रेघीवाले यांच्या सेवापूर्तीच्या निमित्ताने...*
👉🏻 वाशिम शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेले सुरकंडी बु. हे छोटेसे गाव. एकेकाळी गावाकडे जाणारा रस्ता म्हणावा की गाडरस्ता, अशी या गावाची अवस्था होती. कोरडवाहू शेती हा गावकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय. अवघी ३०० च्या आसपास लोकवस्ती असलेल्या या गावात उच्च शिक्षण आणि शासकीय नोकरी यांचा फारसा संबंध नव्हता. अशा प्रतिकूल परिस्थितीत एका सामान्य शेतकरी कुटुंबात दि. ५ ऑगस्ट १९६८ रोजी एका मुलाचा जन्म झाला. परिस्थिती सामान्य असली तरी स्वप्ने मात्र मोठी होती. जिद्द, मेहनत आणि कर्तृत्वाच्या बळावर या मुलाने स्वतःचे आयुष्य घडवतानाच आपल्या गावालाही नवी दिशा दिली.
हे व्यक्तिमत्त्व म्हणजे दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेले बुद्धू चंदू रेघीवाले अर्थातच बुद्धू साहेब रेघीवाले हे होत.
आज, दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी त्यांच्या सेवापूर्तीच्या निमित्ताने त्यांनी आपल्या स्वगृही सुरकंडी बु. येथे स्नेही, आप्तेष्ट आणि ऋणानुबंध जपलेल्या व्यक्तींसाठी स्नेहभेट व स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तब्बल ३८ वर्षांच्या पोलीस सेवाकाळात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ज्यांच्याशी ऋणानुबंध निर्माण झाले, त्यांच्या प्रेमाची आणि सहकार्याची परतफेड कृतज्ञतेच्या भावनेतून करण्याचा हा एक सुंदर प्रयत्न आहे.
या निमित्ताने आपल्या गावातील या आदर्श व्यक्तिमत्त्वाविषयी लेखणी चालविणे, हा एक गावकरी आणि पत्रकार म्हणून माझा नैतिक धर्मच आहे.
*कौटुंबिक जडणघडण*
बुद्धू साहेब हे केवळ 2 वर्षांचे असतांना वडिलांचे छत्र हरविले. त्यामुळे दोन बहिणी आणि बुद्धू साहेब यांचा सांभाळ त्यांच्या आई स्व. मुन्नीबाई चंदू रेघीवाले यांनी हिमतीने केला. मोठी बहीण कामनबाई लछमन परसूवाले सुरकंडी बु.
दोन वर्षांचे असणारे बुद्धू साहेब आणि ज्यांचा जन्म होण्यापूर्वीच वडिलांचे निधन झाले अशी लहान बहीण जिबेदाबाई रमजान परसूवाले, शिरपूर जैन या तिघां भावंडांची जबाबदारी आईने सांभाळली. आपल्या कोरडवाहू शेतीत राब राब राबून त्यांनी मुलांना घडविले. काही झाले तरी माझ्या मुलाला शिकवायचे हा ध्यास मनी धरून त्यांनी बुद्धू साहेबांना शिक्षण दिले. त्यांचे इयत्ता १ ते ७ वी पर्यंतचे शिक्षण फाळेगाव थेट येथे झाले. ८ ते १० वी पर्यंत चे शिक्षण बाकलीवाल विद्यालय वाशीम तर उच्च शिक्षण राजस्थान कॉलेज वाशिम येथे झाले.
विवाहानंतर त्यांच्या पत्नी हसीनाबाई यांनी आदर्श पद्धतीने संसार सांभाळला. मुलांना चांगले संस्कार दिले. त्यांना ३ मुली आणि १ मुलगा आहे. मोठी मुलगी शहनाज मोहम्मद गौरवे सूरकंडी बु, दोन नंबर ची शबनम रन्नू परसुवाले शिरपूर जैन तर धाकटी मुस्कान फकीर परसुवाले सूरकंडी बु. ह्या असून मुलगा आसिफ हा शिक्षण घेत असून UPSC स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे.
*कुस्तीच्या आखाड्यातून सुरू झालेला प्रवास...*
लहानपणापासूनच बुद्धू साहेबांना कुस्तीची विलक्षण आवड होती. त्या काळी गावोगावी कुस्त्यांच्या दंगली भरत असत. प्रत्येक गावात आखाडे असत आणि गावच्या मातीशी जोडलेला हा खेळ तरुणांच्या जिद्दीला आणि शौर्याला धार देत असे.
सुरकंडी बु. येथील कुस्तीच्या मैदानावर बालपणी इतर पहिलवानांचे डावपेच पाहता पाहता बुद्धू साहेब स्वतः आखाड्यात उतरू लागले. त्यांच्या चाणाक्ष खेळी, अंगातील ताकद आणि निडर वृत्तीच्या जोरावर त्यांनी अनेक प्रतिस्पर्ध्यांना चारी मुंड्या चीत केले. त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे जिल्हास्तरापासून राज्यस्तर आणि पुढे राष्ट्रीय स्तरापर्यंत ‘बुद्धू पहिलवान’ म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.
‘बुद्धू पहिलवान’ आखाड्यात उतरला की, भल्या-भल्या पहिलवानांचीही घाबरगुंडी उडायची, अशी त्यांची त्याकाळची ख्याती होती.
मात्र कुस्ती हा केवळ त्यांचा खेळ नव्हता; तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा शिल्पकार होता. आखाड्यातून मिळालेले धैर्य, शिस्त, चिकाटी, पराभवातून पुन्हा उभे राहण्याची वृत्ती आणि संकटांना सामोरे जाण्याचे बळ पुढे त्यांच्या पोलीस सेवेतही पदोपदी उपयोगी पडले.
*आखाड्यातील पहिलवान ते पोलीस सेवक...*
कुस्तीला सर्वस्व मानतानाच आपल्या कुटुंबाची परिस्थिती बदलावी, आपल्या गावातील तरुणांसाठी आदर्श निर्माण करावा आणि पोलीस सेवेत दाखल होऊन देशसेवा करावी, अशी त्यांची मनोमन इच्छा होती.
त्याच काळात क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या उमेदवारांना पोलीस भरतीमध्ये विशेष संधी मिळत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी १९८९ साली पोलीस भरतीचा अर्ज भरला आणि आपल्या क्रीडा कौशल्याच्या जोरावर मैदानही मारले. पोलीस भरतीची यादी जाहीर झाली आणि त्या यादीत बुद्धू चंदू रेघीवाले यांचे नाव झळकले. यावेळी पोलिसांची 89 जागांची भरती निघाली होती. त्यात १३ वे मेरिट म्हणून बुद्धू साहेबांचे नाव यादीत झळकले. याच क्षणापासून ‘बुद्धू पहिलवान’ यांच्या आयुष्यातील पोलीस सेवकाचा नवा अध्याय सुरू झाला.
सुरुवातीला पोलीस कॉन्स्टेबल म्हणून ते बुलढाणा जिल्ह्यात रुजू झाले. लोणार आणि शेगाव पोलीस ठाण्यांत त्यांनी अनेक वर्षे सेवा बजावली. त्यानंतर वाशिम जिल्ह्यात बदली होऊन आल्यानंतर मानोरा, अनसिंग पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा वाशिम तसेच जिल्हा वाहतूक शाखा वाशिम आदी ठिकाणी त्यांनी कॉन्स्टेबल, रायटर, जमादार, हवालदार अशा विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या. या ३८ वर्षांच्या सेवाकाळात त्यांना तब्बल २५० रिवॉर्ड मिळाले. विशेष म्हणजे त्यांच्या सेवाकाळात त्यांना एकही पनिशमेंट झाली नाही किंवा शिक्षा झाली नाही. त्यांच्या विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र अमरावती यांचे प्रशस्तीपत्र सुद्धा मिळाले आहे.
*परीक्षा दिली... आणि पीएसआय झाले!*
पोलीस सेवेत असतानाही शिक्षण आणि पुढे जाण्याची जिद्द त्यांनी कधी सोडली नाही. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली आणि आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर मजल मारली.
कारंजा शहर पोलीस ठाण्यात पीएसआय म्हणून त्यांनी पहिल्यांदा जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर जिल्हा बदलीने अकोला येथे जाऊन सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात सेवा बजावली. पुढे पुन्हा वाशिम जिल्ह्यात परतल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेत त्यांनी आपली सेवा बजावली आणि याच ठिकाणी दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी ३८ वर्षांच्या प्रदीर्घ पोलीस सेवेला पूर्णविराम दिला.
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदाला साजेसे कर्तृत्व
पोलीस सेवेत असताना बुद्धू साहेबांनी केवळ गणवेश परिधान केला नाही, तर त्या गणवेशाची प्रतिष्ठा आपल्या कर्तव्याने जपली.
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या पोलीस दलाच्या ब्रीदवाक्याला साजेसे काम करताना त्यांनी अनेक कुख्यात गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या, अवैध धंद्यांवर कारवाई केली आणि अनेक गंभीर गुन्ह्यांच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.
कर्तव्य बजावताना कोणत्याही दबावाला बळी न पडता निडरपणे काम करण्याची वृत्ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होती. या वृत्तीला कुस्तीच्या आखाड्यात मिळालेल्या संस्कारांची भक्कम पार्श्वभूमी होती. आखाड्यातील धैर्य आणि पोलीस सेवेतली कर्तव्यनिष्ठा यांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात पाहायला मिळतो.
*स्वतःपुरते यश न ठेवता गावालाही दिली दिशा...*
बुद्धू साहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांनी आपले यश केवळ स्वतःपुरते मर्यादित ठेवले नाही.
आपल्या गावातील प्रत्येक घरातील किमान एक मुलगा नोकरीत असावा, अशी त्यांची मनापासून इच्छा होती. त्यामुळे पोलीस व सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या गावातील युवकांना त्यांनी मार्गदर्शन केले. आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि ‘मेहनत केली तर यश नक्की मिळते’ हा कानमंत्र युवकांच्या मनात रुजवला.
त्यांच्या मार्गदर्शनाचा परिणाम आज सुरकंडी बु. गावात स्पष्टपणे दिसून येतो. या छोट्याशा गावातील ३० ते ४० युवक आज पोलीस सेवा, सैन्यदल तसेच विविध शासकीय व इतर विभागांत कार्यरत आहेत, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे.
काही वर्षांपूर्वी ज्या गावात कुडामातीची घरे दिसायची, त्याच गावात आज सिमेंट-काँक्रीटची टुमदार घरे उभी आहेत. गावातील आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली आहे. शेतीतही समृद्धी आली आहे. एका व्यक्तीने मनाशी ध्येय बाळगून सातत्याने प्रयत्न केले, तर त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण गावाच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनावर होऊ शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे बुद्धू साहेब रेघीवाले.
*एक पहिलवान... एक पोलीस अधिकारी...*
*आणि गावाचा* *मार्गदर्शक!*
बुद्धू साहेबांचा प्रवास हा केवळ एका व्यक्तीच्या यशाची कहाणी नाही. तो आहे संघर्षावर मात करण्याची, स्वप्नांना कर्तृत्वाची जोड देण्याची आणि स्वतःबरोबर इतरांनाही पुढे घेऊन जाण्याची प्रेरणादायी कहाणी.
सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या एका तरुणाने कुस्तीच्या आखाड्यात आपले नाव कमावले, त्याच कर्तृत्वाच्या जोरावर पोलीस सेवेत प्रवेश केला, ३८ वर्षे प्रामाणिकपणे देशसेवा केली आणि सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाही आपल्या गावातील तरुणांच्या भवितव्याची चिंता केली ही बाब निश्चितच प्रेरणादायी आहे.
आज ते शासकीय सेवेतून निवृत्त झाले असले, तरी सेवा, संस्कार आणि समाजाशी असलेली त्यांची नाळ कधीही निवृत्त होणार नाही.
*सेवानिवृत्ती नव्हे, नव्या पर्वाची सुरुवात!*
बुद्धू साहेब, आपल्या ३८ वर्षांच्या प्रदीर्घ आणि कर्तव्यनिष्ठ पोलीस सेवेसाठी आपले मनःपूर्वक अभिनंदन!
आपल्या पुढील आयुष्यात आरोग्य, आनंद, समाधान आणि समृद्धी लाभो. आपण ज्या पद्धतीने आपल्या कर्तृत्वाने स्वतःचे आयुष्य घडविले आणि आपल्या गावातील अनेक युवकांच्या आयुष्याला दिशा दिली, त्याचप्रमाणे यापुढेही आपल्या हातून समाजासाठी विधायक कार्य घडत राहो, हीच मनःपूर्वक सदिच्छा.
‘बुद्धू पहिलवान’ म्हणून आखाड्यात मिळविलेली कीर्ती,
‘पोलीस उपनिरीक्षक’ म्हणून बजावलेली कर्तव्यनिष्ठ सेवा
आणि ‘बुद्धू साहेब’ म्हणून गावकऱ्यांच्या मनात मिळविलेले स्थान
हीच आपल्या आयुष्याची खरी कमाई आहे!
सेवापूर्तीच्या हार्दिक शुभेच्छा...!
आपली पुढील वाटचाल सुखी, निरोगी, आनंदी आणि समाजोपयोगी होवो, हीच सदिच्छा!
@ गजानन धामणे
मुक्त पत्रकार
सुरकंडी, वाशिम
मो. ९८८१२०४५३८
दि. ०१/०९/२०२६
Post a Comment