प्रवासातील अनुभव...
( भाग : 28)
गुरुवार दि. 17 सप्टेंबर 2026 चा अनुभव...
*पाच रुपयांचा वाद, कंडक्टरची कर्तव्यनिष्ठा अन् प्रवाशांचे हाल, बेहाल!*
👉 गुरुवारी मला कामानिमित्त परभणी येथे जायचे होते. थोडा दूरचा प्रवास असल्यामुळे आणि रात्री परतताना बसेसचा तुटवडा असल्यामुळे मी सकाळी लवकरच बसने परभणीला निघालो.
नियोजित वेळेत पोहोचलो. काम आटोपल्यानंतर परभणी स्टॅंडवर गेल्यानंतर तेथून डायरेक्ट वाशीम कडे येणारी गाडी मिळाली नाही, त्यामुळे हिंगोली पर्यंत येणाऱ्या गाडीत बसलो. ही बस सायंकाळी 7 वाजता हिंगोली स्थानकावर पोचली.
बसमधून उतरल्यानंतर चौकशी कक्षात जाऊन वाशिम कडे जाणाऱ्या गाडीची चौकशी केली. त्यावेळी समजले की , आता वाशीम कडे जाण्यासाठी 9 वाजेपर्यंत गाडीच नाही. दरम्यान त्या टाईम मध्ये रेल्वेगाडीही नव्हती.
त्यामुळे नाईलाजाने हिंगोली स्थानकावर थांबावे लागले.
रात्री 9.21 वाजता बिलोली ते अकोला ही या मार्गावरील शेवटची गाडी आली. तेव्हा माझ्यासोबत आठ - दहा प्रवासी होते. बस थांबल्यानंतर हिंगोलीत उतरणारे प्रवासी पटापट बसमधून खाली उतरले.
त्यामधीलच एका प्रवाशाने खाली उतरल्यानंतर कंडक्टर कडे तिकिटातून उरलेल्या 5 रुपयांची मागणी केली. हक्काचे पैसे ज्यांचे त्यांना मिळायलाच हवेत, याबाबत दुमत नाही. मात्र, कंडक्टर कडे 5 रुपये सुटे नव्हते. त्यामुळे कंडक्टरने 20 रुपयांची नोट काढली आणि त्या प्रवाशाला देत म्हणाले की तुमचे 5 रुपये घेऊन उर्वरित रक्कम मला परत द्या.
कंडक्टरकडे सुटे पैसे नसल्यामुळे त्यांचे बोलणे साहजिक होते. मात्र, यावेळी प्रवाशाने कंडक्टर सोबत वाद घालायला सुरुवात केली.
मला माझे 5 रुपये सुटे द्या!, तुम्ही सुटे पैसे का ठेवत नाही, मला माझे 5 रुपये सुटे द्या, असे म्हणत त्या प्रवाशाने कंडक्टर सोबत शाब्दिक वाद घालायला सुरुवात केली. दरम्यान, एका प्रवासी तरुणाने 5 रुपये कंडक्टरला देऊन त्या माणसाला द्या आणि लवकर गाडी काढा. असे सांगितले. मात्र, त्या प्रवाशाचे बोलणे सुरूच असल्यामुळे कंडक्टरचाही पारा चढला आणि एकमेकात शाब्दिक युद्ध सुरू झाले.
हा वाद थांबत नसल्यामुळे बसचे ड्रायव्हर सुद्धा या वादात पडले. स्टेअरिंग वरून उतरून त्या प्रवाशाला समजावत होते. मात्र, त्यांचे एकमेकांबाबत शाब्दिक वार सुरूच होते.
या शाब्दिक युद्धात अर्धा तास तसाच निघून गेला. त्यामुळे बस मधील प्रवासी चिडायला लागले. कंडक्टर साहेब लवकर गाडी काढा, जाऊद्या, वाद थांबवा, असे प्रवाशांनी म्हटल्यामुळे आणि कर्तव्य महत्त्वाचे असल्यामुळे ड्रायव्हरने गाडी सुरू केली.
गाडी शहराबाहेर आल्यानंतर कंडक्टरने प्रवासी संख्या मोजली असता, एक प्रवासी कमी असल्याचे आढळून आले. त्यानंतर कंडक्टर च्या लक्षात आले की, समोरच्या केबिन मधील एक प्रवासी खाली उतरला असावा. आता मागून येणारी कुठलीही बस नाही. त्यामुळे त्या प्रवाशाला आणावेच लागणार आहे. दरम्यान कंडक्टर ने ड्रायव्हरला सांगितले की , एक प्रवासी बस स्टँड वर राहिला आहे. त्याला आणण्यासाठी बस रिटर्न घ्या. ड्रायव्हर साहेबांनी लगेच बस मागे फिरवली. बस स्टैंड वर आल्यानंतर तो प्रवासी बस स्टँडच्या बाहेर रस्त्यावरच उभा होता. बस आल्यानंतर त्याचा जिवात जीव आला आणि तो पटकन गाडीत बसला. त्या प्रवाशाच्या चुकीमुळे बस अर्धा तास लेट झाली, त्यामुळे इतर प्रवासी सुद्धा त्याच्यावर भडकले. तुम्ही कंडक्टरला सांगून का उतरले नाही, वगैरे वगैरे म्हणत प्रवाशांनी त्याच्यावर राग शांत केला.
बस पुन्हा सुरू झाली, बस मुख्य मार्गावर बायपास जवळ आल्यानंतर तेथे रोडचे काम सुरू असल्यामुळे हा मार्ग बंद होता. तिथून बस काढणे कठीण होते.
वास्तविक पाहता रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने रस्ता बंद असल्याचे फलक लावायला पाहिजे होते. मात्र, असे फलक कुठेच नसल्यामुळे ड्रायव्हर साहेबांनी बस बायपास पर्यंत नेली. बायपास जवळ गेल्यानंतर तिथून अनेक वाहने विरुद्ध दिशेने परतत होती.
कमी अधिक याच ठिकाणावरून विसरलेल्या प्रवाशाला आणण्यासाठी बस रिटर्न आली होती. आणि आता पुन्हा तोच कित्ता गिरवावा लागणार होता.
आता बस पुन्हा रिटर्न घ्यावी लागणार असल्याचे प्रवाशांना कळताच पुन्हा सर्व प्रवाशांचा पारा चढला. पण नाईलाज होता, यात ड्रायव्हरची कुठलीही चूक नव्हती. नाईलाजाने पुन्हा बस रिटर्न वळली.
बळसोंड येथून जुन्या बायपासने कळमनुरी रोड कडे जाऊन मोठ्या बायपास ने पुन्हा बस वाशिम कडे मार्गस्थ झाली.
बस स्टँड वरील वाद सुरू असतानाचा गेलेला वेळ, प्रवाशाला रिटर्न आणण्यासाठी गेलेला वेळ आणि पुन्हा रस्ता बंद असल्यामुळे पुन्हा फेऱ्याने यावे लागणे. यामध्ये तब्बल एक ते दीड तासाचा अतिरिक्त वेळ गेला.
ज्या वेळात बस वाशीमला पोहोचणार होती, त्यावेळी बस हिंगोलीतुन निघाली.
त्यामुळे सर्व प्रवाशांचे नियोजित पोहोचणे बारगळले.
माझ्या शेजारी मूळचा तोंडगावचा असणारा आणि नांदेड येथे क्लासेस करत असणारा एक विद्यार्थी बसलेला होता. त्याने त्याच्या पोहोचण्याची नियोजित वेळ आपल्या आईला आणि वडिलांना सांगितली होती. मात्र, नियोजित वेळेपेक्षा एक ते दीड तास उशीर होत असल्यामुळे त्याची आई त्याला सारखी फोन करत होती. बाळा एवढा उशीर का लागत आहे, काय झाले. कारण, एका आईला आपल्या मुलाची किती काळजी असते हे आपल्याला वेगळे सांगण्याची गरज नाही. त्याला सतत फोन येत होते कुठपर्यंत आलास.
शेवटी उशिरा का होईना तो नियोजित ठिकाणी उतरला.
माझ्या बाजूच्या सीटवरील एक प्रवासी फोनवर बोलत होता, वाशीमला उतरल्यानंतर त्याला एका हॉटेलमध्ये जेवण करायला जायचे होते, कुणीतरी त्याची बस स्टॅन्ड वर वाट पाहत होते. परंतु, बस वाशीमला पोहोचण्यासाठी रात्रीचे 11.34 वाजले होते. त्यामुळे बस स्टॅन्ड च्या जवळची हॉटेलही बंद झाली होती. समोरचा व्यक्ती त्या प्रवाशाला म्हणत होता की, आता आपल्या जेवणाचा बेतही हुकला.
कमी अधिक प्रमाणात सर्वच प्रवाशांचे प्रवासाचे नियोजन कोलमडले होते.
माझी पत्नी सुद्धा जेवणाची थांबली होती, मात्र, जास्त वेळ लागत असल्याने मी सुद्धा तिला जेवण करून घेण्यास सांगितले.
एकंदरीत पाहता, पाच रुपयांच्या चिल्लरच्या वादामुळे बसमधील सर्वच प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. वाशिम पासून पुढे जाणाऱ्या प्रवाशांनाही याचा फटका बसला.
बस मध्ये चिल्लर पैशांवर होणारे वाद थांबविण्यासाठी आणि डिजिटल भारत चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिकीट काढण्याच्या मशीन मध्ये ऑनलाइन पेमेंट ची सुविधा आली आहे. मात्र, बऱ्याच वेळा ऑनलाइन तिकीट निघत नसल्याच्या तक्रारी आहेत. या बसमधील कंडक्टर जवळ असलेल्या मशीनमध्ये सुद्धा ऑनलाईन तिकीट निघाले नाही. मला स्वतः ऑनलाईन तिकीट काढायचे होते. मात्र, निघाले नाही. त्यामुळे कंडक्टरला चिल्लर पैसे देताना मलाही अडचण निर्माण झाली.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीच्या प्रवासात सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असलेला व्यक्ती म्हणजे कंडक्टर ( वाहक ) होय. एसटी महामंडळाने घालून दिलेले नियम पाळताना कंडक्टरची खूपच दमछाक होते. त्यांच्याकडे प्रवासादरम्यान पुरेसे सुटे पैसे देणे गरजेचे आहे. मात्र, पुरेशा प्रमाणात दिले जात नसावेत. म्हणूनच अशा प्रकारच्या घटना घडतात.
या प्रवासातील कंडक्टरने एका विसरलेल्या प्रवाशासाठी बस रिटर्न घेऊन आपली कर्तव्यनिष्ठा जपली.
चिल्लर पैसे नसल्यामुळे नाईलाजामुळे वादाला सामोरे जावे लागले.
मात्र, याचा बसमधील प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
मित्रांनो, माझे कामानिमित्त सतत फिरणे असते. प्रवासादरम्यान अनेक घटना घडामोडी निदर्शनास येतात. त्यातील काही निवडक घटना आणि घडामोडींचे मी प्रवासातील अनुभव या सदरात वस्तुनिष्ठ लिखाण करत असतो.
या प्रवासवर्णनाची दखल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ घेतली पाहिजे. एवढीच अपेक्षा !
( टिप : मी दैनंदिन कामानिमित्त दररोज कुठेतरी प्रवास करत असतो. प्रवासादरम्यान अनेक अनुभव मला येत असतात. यातील काही निवडक अनुभव शेअर करण्यासाठी मी *प्रवासातील अनुभव* हे सदर माझ्या *उलगडा* या ब्लॉग वर तसेच सोशल मीडियावर सुरू केले आहे . आजचा हा *अठ्ठावीस* वा भाग आहे. हा अनुभव आपणास कसा वाटला हे आपल्या कमेंट च्या माध्यमातून जरूर कळवा. )
माझ्या प्रवास वर्णनाचे मागील 27 भाग वाचण्यासाठी माझ्या *उलगडा* या ब्लॉग ला भेट द्या!
✍️ गजानन धामणे
मुक्त पत्रकार, वाशिम
9881204538

Post a Comment