*प्रवासातील अनुभव...*
( भाग : 27 )
सोमवार दि. 13, 14 जून 2026 रोजीचा अनुभव...
*फिल्मी दुनियेची सफर, अमीर खान चे नियोजन आणि अविस्मरणीय सहल*
👉 15 सप्टेंबर 2025 नंतर तब्बल 9 महिन्यांनी प्रवासातील अनुभव लिहितोय...
अविरतपणे प्रवास वर्णन वाचणाऱ्या वाचकांचा मी खऱ्या अर्थाने गुन्हेगारचं.
केवळ "कंटाळा" हे एकमेव कारण सोडले तर प्रवास वर्णन न लिहिण्याचे दुसरे कोणतेही कारण नाही.
या नऊ महिन्याच्या कालावधीत कित्येक वाचकांनी शब्दशः व व्यक्तिशः खंत व्यक्त केली की, आपण प्रवास वर्णन का लिहीत नाही. आम्ही आपले प्रवास वर्णन वाचण्यास आतुर असतो.
वाचकांच्या या प्रश्नावर मला निरुत्तर होण्याशिवाय पर्याय नसतो.
मात्र आता पुन्हा सर्व वाचकांची दिलगिरी व्यक्त करून इथून पुढे खंड पडणार नाही, याची ग्वाही देत प्रवासातील अनुभवाचा 27 वा भाग आपल्यासमोर ठेवत आहे.
👉🏻 माझ्या काही पत्रकार मित्रांची आणि माझी , कुठेतरी सहकुटुंब फिरायला जाऊ, याबाबत खालबते सुरू होती.
मागील सहा महिन्यापासून
ठिकाण ठरविणे आणि प्लानिंग करणे यातच वेळ जात होता. घरच्या गृहमंत्र्यांनाही सांगून ठेवले होते, की लवकरच आपल्याला सहकुटुंब सहलीला जायचे आहे.
आता काही दिवसांवर पावसाळा येत असल्यामुळे पुन्हा चार महिने सहलीला ब्रेक लागणार होता.
हा ब्रेक लागण्यापूर्वी आपण जर सहलीला गेलो नाही तर, "गृहमंत्री" नाराज होतील आणि त्यांचा रोष ओढवून घेणे परवडणार नाही.
म्हणून घाईघाईने नियोजन केले. आणि सर्वांनुमते, *हैद्राबाद टूर* ठरला.
हैदराबाद जायचं म्हणजे , फार काही कठीण नव्हतं. कारण आपल्या वाशीम वरून दररोज काचीगुडा ही रेल्वे गाडी हैदराबादला जाते.
मग काय, गेलो रेल्वे स्टेशनवर अन, चार फॅमिलींची येण्याची आणि जाण्याची तिकिटे बुक केली.
आमचे पत्रकार मित्र, अतिश देशमुख , देव इंगोले, आर जे इरफान सय्यद आणि मी गजानन धामणे असे आम्ही चौघे जण सहकुटुंब सहलीला निघालो.
हैदराबाद येथे असणारी *रामोजी फिल्मसिटी* आणि हैदराबाद शहरातील महत्त्वाची ठिकाणे पाहण्याचा बेत करून आम्ही मार्गस्थ झालो.
दि. 12 जून 2026 रोजी सकाळी साडेदहा वाजता काचीगुडा एक्सप्रेस ने वाशिम वरून मार्गस्थ झालो.
कुठलाही टूर करायचा म्हणजे नियोजन आलेच, तिथे गेल्यानंतर कशाने फिरायचे, कुठे कुठे फिरायचे, किती दिवस फिरायचे आणि राहायचे कसे, याबाबतचे नियोजन ओघाने आलेच.
हे नियोजन आम्हीही केलं.
या नियोजनासाठी आम्हाला यापूर्वी हैदराबादला जाऊन आलेले आमचे मित्र राम शृंगारे यांनी त्यांचा टूर उत्तम प्रकारे ज्यांनी घडवून आणला . त्या व्यक्तीचे नाव आणि नंबर आम्हाला दिला.
त्या व्यक्तीचे नाव होते, "अमीर खान" आपण आश्चर्यचकित झाला असाल, आमिर खान तर प्रसिद्ध चित्रपट अभिनेते.
ते कसे काय यांचा टूर घडवून आणतील.
आपल्याला पडलेला प्रश्न अगदी बरोबर आहे.
परंतु, हैदराबादचे हे अमीर खान, चित्रपट अभिनेते नसून, हैदराबाद मध्ये येणाऱ्या पर्यटकांना, प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देत गाईड करणारे एक सामान्य ऑटो चालक आहेत.
मात्र, हे अमीर खान सामान्य ऑटोचालकांपेक्षा काहीतरी वेगळेच आहेत.
त्यांच्याकडे हैदराबाद शहराची खडानखडा माहिती आहे. मागील शेकडो वर्षांचा इतिहास ते सहजतेने सांगतात. कोणते ठिकाण पाहिले पाहिजे. कोणत्या ठिकाणी काय विशेष आहे. त्याचा इतिहास काय, रामोजी फिल्मसिटी चा संपूर्ण इतिहास, या सगळ्या बाबी आमिर खान यांना तोंडपाठ आहेत.
दि. 12 जून रोजी रात्री साडेनऊ वाजता आम्ही काचीगुडा येथे पोहोचलो.
आधीच संपर्क केलेला असल्यामुळे आमिर खान आणि त्यांचे दुसरे सहकारी आम्हाला स्टेशनवर घेण्यासाठी आले. त्यांच्या ऑटो मध्ये बसून आम्ही हॉटेलवर मुक्कामासाठी गेलो. तेथे रात्रभर निवांत झोप झाली.
दि. 13 जून रोजी सकाळी ठीक साडेसात वाजता सर्व तयारी करुन हॉटेलच्या प्रवेशद्वारावर येताच, आमिर खान आणि त्यांचे सहकारी आपले ऑटो घेऊन रेडी होते, साब आपने जो टाईम दिया उस टाइम पे परफेक्ट आ गये, खरंतर रेडी होण्याचा टाईम त्यांनीच आम्हाला दिला होता.
अधिक वेळ न घेता आम्ही पटापट दोन दोन फॅमिली दोन ऑटो मध्ये बसलो.
30 किलोमीटरचा प्रवास करून आम्हाला "रामोजी फिल्मसिटी" मध्ये जायचे होते.
रामोजी फिल्म सिटी मध्ये कोणत्या ठिकाणी किती वेळ द्यायचा, कोणते ठिकाण बघायचे, याबाबतची सर्व इत्यंभूत माहिती आम्हाला आमिर खान यांनी आधीच दिली होती.
रामोजी फिल्मसिटी येण्याच्या अगोदरच त्यांनी एका चांगली हॉटेल असलेल्या ठिकाणी ऑटो थांबविला आणि पोटभर नाश्ता करून घेण्याचे सांगितले. आम्हीही पटापट नाश्ता करून घेतला आणि रामोजी फिल्मसिटी मध्ये प्रवेश केला.
तेथेही आमिर खान यांनी नियोजन करून तिकीट लाईन मध्ये न लागता क्षणात आम्हाला ऑनलाईन तिकीट मिळवून दिले.
यानंतर रामोजी फिल्म सिटी मध्ये जाणाऱ्या पहिल्या बसमध्ये आम्ही आत शिरलो.
जसजसे आत जात होतो, तसतसे डोळ्यांचे पारणे फेडणारे चित्र आम्हाला दिसत होते. यावेळी
एका आमदाराचे वाक्य होते, " काय ती झाडी, काय ते डोंगर" ह्या वाक्याची आम्हाला आठवण आली.
काही अंतर गेल्यानंतर बस नियोजित ठिकाणी पोहोचली. त्या ठिकाणचे दृश्य पाहिल्यानंतर रामोजी फिल्मसिटी ची भव्य दिव्यता किती मोठी आहे याची कल्पना आली होती.
रामोजी फिल्म सिटी बद्दल सांगायचे झाले तर, दाक्षिणात्य निर्माते रामोजी राव यांनी 1991 साली रामोजी फिल्म सिटी च्या उभारणीची सुरुवात केली. आणि 1996 साली ठराविक काम पूर्ण झाल्यावर येथे चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले.
तब्बल 2000 एकर विस्तीर्ण परिसरात ही फिल्म सिटी पसरलेली आहे. नैसर्गिक डोंगर, त्या डोंगरावर असलेले अवाढव्य दगड, आणि एकूणच प्रसन्न अशा भूमीत ही फिल्म सिटी वसलेली आहे.
या फिल्म सिटी मध्ये 7700 कर्मचारी कार्यरत आहेत.
आज पर्यंत या ठिकाणी 3300 चित्रपटांची शूटिंग झाली आहे.
आपण बालपणापासून पाहत आलेले अनेक चित्रपट या ठिकाणी शूट झाले आहेत. त्या चित्रपटांमध्ये दाखविलेले बंगले, गाणे शूट झालेले गार्डन्स, बाजारपेठा, कारागृह, रेल्वे स्टेशन, गाव खेड्याचे चित्र, रामायण महाभारताच्या सिरीयल मधील सेट, बाहुबली चित्रपटाचा संपूर्ण सेट आजही तेथे कार्यरत आहेत.
फिल्म सिटी मध्ये प्रवेश करताना, एखाद्या राजवाड्याप्रमाणे असणारे भले मोठे दोन दरवाजे उघडले जातात. त्यानंतर त्या ठिकाणी तेथील डान्स करणारे कलावंत सुंदर डान्स करून फिल्म सिटी मध्ये आलेल्यांचे स्वागत करतात.
खरं म्हणजे हा क्षण अगदी डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो.
पाच ते दहा मिनिटांचा डान्स शो झाल्यानंतर गेटमधून आत एन्ट्री होते.
जवळपास 500 लोकांचा समूह आज प्रवेश करतो.
आत प्रवेश केल्यानंतर पुन्हा नृत्य सुरू होते.
तिथून उजवीकडे गेल्यानंतर चित्रपटात जशी मारामारी ची शूटिंग असते तशीच हुबेहूब मारामारीची कलाकृती तेथील सिने कलावंत सादर करतात.
मग तेथून सुरू होतो. विविध सेट पाहण्याचा प्रवास.
एक सेट पाहिला की बाहेर यायचे, तेथे पुढील सेटवर जाण्यासाठी ट्रॅव्हल लागलेलीच असते. असे करत एक एक सेट आम्ही पाहत गेलो. काही ठिकाणी फोटो आणि सेल्फी घेतल्या.
सेटमध्ये रामायण महाभारताचा सेट, मोठमोठ्या बंगले असणाऱ्या इमारतींचे सेट, चित्रपटात दाखविले जाणारे कारागृह, खेडेगाव, रेल्वे स्टेशन, विमानतळ, काही विशिष्ट बंगले, जसे की सूर्यवंशी चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा दाखविलेला बंगला. असे अनेक सेट पाहून डोळ्यांचे पारणे फिटते.
येथे मनाला भावलेली एक बाब म्हणजे, चित्रपटाची शूटिंग कशी होते आणि आपण तो चित्रपट पडद्यावर कसा दाखविला जातो याचे प्रात्यक्षिक तेथे दाखविले जाते.
प्रेक्षकांमधूनच काही प्रेक्षक स्टेजवर जातात, त्यांची शूटिंग होते आणि पुढे एखादा सीन कसा दाखविला जातो याचे हुबेहूब चित्रण तेथे बघायला मिळाले.
शूटिंग आणि चित्रपटात दाखविले जाणारे दृश्य, हे बघितले तर खरं म्हणजे चित्रपटावरचा विश्वास ऊडून जातो . मात्र हे सुद्धा येथे प्रामुख्याने सांगितले जाते हेच या फिल्म सिटी चे विशेष होय.
या ठिकाणी जापानीज गार्डन, अमेरिकन गार्डन असे कितीतरी प्रकारचे एकशे बढकर एक गार्डन आहेत. मी तरी आजपर्यंत आयुष्यात कधीही एवढे सुंदर गार्डन बघितले नाहीत.
येथे विविध पक्ष्यांचे कप्पे आहेत, फुलपाखरांचे गार्डन आहे. वरतून कोसळणारा कृत्रिम परंतु हुबेहूब वाटणारा धबधबा. हुबेहूब साकारलेली बुद्ध लेणी, एका उंच टेकडीवर नृत्यगृहामध्ये नृत्य करत असलेली नृतिका, सगळं काही अप्रतिमच.
या फिल्मसिटी बद्दल डिटेल्स लिहायचं म्हटल्यावर खूप मोठ होईल. एका ठोक्यात वाचणे ही आपणाला शक्य होणार नाही.
त्यामुळे, ही फिल्म सिटी म्हणजे अप्रतिमच, आपण प्रत्येकाने येथे एकदा तरी भेट दिली पाहिजे. एवढेच मी सांगेल.
सायंकाळी सात वाजता आम्ही फिल्म सिटी मधून बाहेर पडलो.
दिवसभर डोळ्यांचे पारणे फेडणारे चित्र पाहिल्यामुळे भुकेची आम्हाला आठवण आली नाही. फिल्म सिटीतून बाहेर पडल्यावर मात्र, कडाक्याची भूक लागली. बाहेर आल्यानंतर आमिर खान आणि त्यांचे सहकारी आपले ऑटो घेऊन रेडी होते. पटापट ऑटोत बसलो आणि हैदराबाद कडे रूमच्या दिशेने निघालो. इकडे गावात आल्यानंतर छान अशा हॉटेलमध्ये जेवण केले. आणि नंतर हॉटेल जवळ केले.
आता संपूर्ण हैदराबाद पाहण्यासाठी आमच्याकडे केवळ एक दिवस होता.
मात्र आमिर खान यांनी , साब आप सुबह 7 बजे रेडी रहना, हम बराबर टाइम पर पोचते है. एवढे सांगून आपल्या घराकडे गेले.
एका दिवसात जवळपास महत्त्वाचे पॉईंट कव्हर करून देतो, फक्त आपण फोटो काढण्यात, सेल्फी काढण्यात वेळ घालू नका आणि पटापट पुढे चालत रहा अशा सूचना आधीच केल्या होत्या.
ठरल्याप्रमाणे आमिर खान आणि त्यांचे सहकारी सकाळी सात वाजता हॉटेल समोर आले, आम्हीही ठराविक वेळेत तयार झालो. ऑटोत बसलो आणि प्रवास सुरू झाला. पहिल्यांदा ऑटो थांबला तो "चारमिनार" येथे. आमिर खान यांनी चारमिनार चा इतिहास आम्हाला सांगितला, तेथेच जवळ असणारी भली मोठी चारशे वर्षे जुनी असणारी मज्जिद दाखविली.
तेथून आम्ही *सालारजंग* म्युझियम मध्ये गेलो. या म्युझियम मध्ये अनेक दुर्मिळ आणि ऐतिहासिक साहित्य आम्हाला बघायला मिळाले.
एक तासानंतर तेथून बाहेर आलो, तेथून *नेहरू प्राणी संग्रहालयात* गेलो. हे प्राणी संग्रहालय म्हणजे, कित्येक एकर परिसरात असलेले विस्तीर्ण जंगल. या प्राणी संग्रहालयात विविध प्रजातींचे प्राणी बघितले.
सोबत असणारी आमची मुले वाघ, सिंह, हत्ती, पाहून जाम खुश झाले. दोन तासानंतर तेथून बाहेर पडलो.
तेथून थेट *गोळकोंडा* किल्ल्याकडे. गोळकोंडा किल्ल्याला सुद्धा शेकडो वर्षांचा इतिहास आहे. आजही या किल्ल्यावर हजारो पर्यटक दररोज येतात. वेळेच्या अभावामुळे आम्हाला किल्ल्यावर पोहोचणे शक्य नव्हते. किल्ल्याच्या पायथ्याशीच एक स्टुडिओ होता, तेथे गोळकोंडा किल्ला आणि संपूर्ण हैदराबाद ची इत्यंभूत माहिती, फिल्म मधून दाखविली जात होती. आम्ही तिथे जाऊन तिकीट काढले आणि एक तासाचा शो बघितला. या शोमध्ये हैदराबाद शहराचा हजारो वर्षांचा इतिहास दाखविला गेला. येथे असणारे निजामाचे राज्य, त्यापूर्वीच्या अनेक राज्यांचे राज्य आणि त्यानंतरची स्थित्यंतरे दाखविली गेली. यातून एक प्रकार्षाने जाणवले की, आम्ही फार बोटावर मोजण्या इतकेच प्रमुख ठिकाणे पाहिली. मात्र, येथे शेकडो पॅलेस असे आहेत की, जे आजही शाबूत आहेत आणि हैदराबादच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देतात.
पुढे जेव्हा केव्हा हैदराबादला येणे होईल त्यावेळेस, येथील पॅलेस, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भव्य मूर्ती, हुसेन सागर तलाव, असे विविध ठिकाणे आरामात बघूयात हा विचार करून आम्ही तेथून निघालो.
हैदराबाद मध्ये काही वर्षांपूर्वी दुबई शहरालाही लाजवेल अशी भव्य *स्मार्ट सिटी* तयार झाली आहे. मोठमोठ्या उंच काचाच्या इमारती, त्यामध्ये असणारी विविध कॉर्पोरेट ऑफिसेस, मॉल, सगळं काही दुबई प्रमाणे आहे.
आमच्या अमीर भाईंनी अधिक वेळ न घेता आपले ऑटो सरळ स्मार्ट सिटी कडे वळवले. आम्ही थेट एका भल्या मोठ्या मॉलवर येऊन थांबलो.
कितीतरी मोठ्या विस्तीर्ण जागेत असणारे हे मॉल पाहून आम्हाला नक्कीच दुबईत असल्याची जाणीव होत होती. या मॉलमध्ये पाचव्या मजल्यावर काश्मीर प्रमाणेच कृत्रिम बर्फाचे काश्मीर बनविले आहे. सगळ्यांची इच्छा झाली आणि प्रत्येकी तब्बल आठशे रुपयांचे तिकीट काढून आम्ही आत शिरलो. काश्मीरमध्ये घातले जाणाऱ्या टोपी स्वेटर बूट, सगळं काही आम्हाला देण्यात आलं. आत गेल्यानंतर जणू काही आपण काश्मीर मध्येच आहोत अशी प्रचिती आली. मुलांसह आम्ही सुद्धा खूप एन्जॉय केलं. बर्फाची उधळण केली. उड्या मारल्या. जणू काही काश्मीरचीच सहल करून आल्याचा भास आम्हाला झाला.
तेथून बाहेर पडल्यानंतर पटापट ऑटोमध्ये बसून स्मार्ट सिटी कडे निघालो.
सहा पदरी रस्त्यावरून मार्गक्रमण करताना रस्त्याच्या दोन्ही कडेला उंच उंच इमारती दिसत होत्या. जणू काही आपण दुबई शहरात फिरतोय , असे भासत होते.
ऑटो जस जसा पुढे जात होता तस तशी आमिर खान आम्हाला माहिती देत होते. कोणत्या बिल्डिंगमध्ये काय आहे. विशेषता या ठिकाणी चित्रपट अभिनेत्यांचे अनेक बंगले आहेत. त्यांचे काही हॉटेल्स व इतर उद्योग आहेत. त्याबद्दलही आमिर खान यांनी आम्हाला माहिती दिली.
पुढे आल्यानंतर पुष्पा चित्रपटाचे नायक अल्लू अर्जुन यांचे घर आम्हाला दाखविले. तेथे आम्ही सेल्फी घेतले.
आता सायंकाळचे साडेसात वाजले होते. भूक सुद्धा लागली होती आणि परतीच्या प्रवासाची तयारी करावी लागणार होती. त्यामुळे आम्ही जेवणाच्या हॉटेलकडे निघालो.
या प्रवासात ऑटो चालक आमिर खान यांनी, एक मदतकार्य राबविले, ते पाहून आमिर खान यांच्या औदार्याबद्दल आमचा उर भरून आला.
झाले असे की, एक नवीन ऑटोवाला, जो नव्यानेच हैदराबाद येथे येऊन ऑटो चा व्यवसाय करण्याची सुरुवात केली होती. अशा ऑटो चालकाचा ऑटो चा गॅस संपल्यामुळे तो आपला ऑटो लोटत होता. तेथून चार-पाच किलोमीटर परिसरात कुठेही गॅस पंप नव्हता. आमिर खान यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी, आपला ऑटो चालवत असताना एका पायाने तो ऑटो पुढे ढकलला सुरुवात केली. दरम्यान आमच्या ऑटोतील एक जणाला त्या ऑटोत बसविले. आणि एका पायाने तो ऑटो ढकलत पुढे नेला. तब्बल पाच किलोमीटर पर्यंत तो ऑटो पुढे ढकलण्याचे काम आमिर खान यांनी केले. शेवटी तो ऑटो चालक आणि आमचा मार्ग वेगळा होणार असल्यामुळे आम्ही आमच्या मार्गाने पुढे निघालो. यावेळी तो ऑटो चालक अत्यंत विनयशीलतेने कृतघ्न होत, आमिर खान यांना अक्षरशः दंडवत घातले. आणि आभार व्यक्त केले.
वास्तविक पाहता त्या ऑटो वाल्याला मदत करा असे आम्ही कोणीही आमिर खान यांना सांगितले नाही, आमिर खान यांनी स्वतःच त्यांना मदत करण्याचे ठरविले आणि त्यांचा ऑटो पुढे नेण्यास सहकार्य केले.
अमीर खान यांच्या या कार्यामुळे त्यांचा मला सार्थ अभिमान वाटला.
पुढे काही क्षणात हॉटेल आले आणि आम्ही येथेच हैदराबादी जेवण केले. तेथून
हॉटेल कडे गेलो आणि चेक आउट करून काचीकूडा रेल्वे स्टेशन कडे रवाना झालो.
स्टेशनच्या प्लॅटफॉर्म पर्यंत, आमिर खान व त्यांच्या सहकाऱ्यांनी आम्हाला आणून सोडले.
यावेळी ठरलेल्या पेक्षा थोडे अधिक पैसे देऊन आम्ही अमीर खान यांचा निरोप घेतला. निघताना आवर्जून सेल्फी घेतला आणि जल्द ही मिलेंगे, असे म्हणत प्लॅटफॉर्मवर आलो.
पुढे ठराविक वेळेच्या काही तासानंतर रेल्वे आली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही स्वगृही वाशिमला पोहोचलो.
आज पर्यंत मी अनेक टूर केले. परंतु हैदराबादचा हा टूर खरोखरच अविस्मरणीय ठरला. तो म्हणजे आमिर खान यांच्यामुळे.
मागील काही वर्षांपासुन काही फॅसिस्ट संघटनाकडून मताच्या ध्रुवीकरणासाठी समाजात "हिंदू- मुस्लिम" द्वेषाचे राजकारण केले जाते. मात्र प्रत्यक्ष व्यवहारात जेव्हा केव्हा एखाद्या मुस्लिम व्यक्तीशी संबंध येतो, तेव्हा तसा विरोधाभास कुठे दिसून येत नाही. जीवाला जीव देणारी माणसं बघायला मिळतात. अडचणीच्या वेळी मदत करणारी माणसे मिळतात. तेथे धर्माला कुठेच थारा नसतो.
खरंतर आमिर खान सुद्धा इतर ऑटो प्रमाणे ट्रिक करून एक व्यावसायिक म्हणून आमची ने आण केली असती परंतु, आमचा टूर यशस्वी व्हावा, सर्व काही बघायला मिळावे, यासाठी आमिर खान यांनी केलेली धावपळ, काही केले तरी विसरू शकणार नाही. एवढे मात्र नक्की!
आपल्याला सुद्धा *हैद्राबाद टूर* करायचा असेल तर केव्हाही *अमीर खान* यांना कॉल करा. ते आपल्याला स्टेशनवर घ्यायला येतील. संपूर्ण टूर योग्य नियोजनात आणि कमी वेळेत करून देतील, याची मला ग्वाही आहे. संपर्कासाठी : अमीर खान, हैद्राबाद ( ऑटोचालक ) मो. 9959634599
( टिप : मी दैनंदिन कामानिमित्त दररोज कुठेतरी प्रवास करत असतो. प्रवासादरम्यान अनेक अनुभव मला येत असतात. यातील काही निवडक अनुभव शेअर करण्यासाठी मी *प्रवासातील अनुभव* हे सदर सोशल मीडियावर सुरू केले आहे . आजचा हा *सत्तावीस* वा भाग आहे. हा अनुभव आपणास कसा वाटला हे आपल्या कमेंट च्या माध्यमातून जरूर कळवा. )
✍️ गजानन धामणे
मुक्त पत्रकार, वाशिम
9881204538


Post a Comment