प्रवासातील अनुभव भाग 26

 



*प्रवासातील अनुभव...*

भाग : 26 ) 

सोमवार  दि. 15 सप्टेंबर 2025 रोजीचा अनुभव...

 *खालून रुमाल टाकून खरचं एसटी बस मध्ये शीट मिळविता येते का?* 

 👉  आज मला कामानिमित्त  दारव्हा येथे  जायचे होते. निघण्यास थोडा उशीर झाला होता. सकाळी दहा वाजता  वाशिम - अमरावती गाडीत बसलो. गाडीत जागाही मिळाली. दीड तासात गाडी  कारंजा स्थानकावर पोहोचली. 
  मला दारव्हा जायचे असल्यामुळे  कारंजा येथून  यवतमाळ गाडीत बसावे लागणार होते. अर्धा तास वाट पाहिल्यानंतर  अकोला - यवतमाळ ही बस आली. 
 ही बस येताच  यवतमाळ मार्गावर जाणारे  जवळपास 50 प्रवासी बस जवळ आले. बसच्या प्रवेशद्वाराजवळ जाऊन गाडीत बसण्यासाठी जागा मिळावी म्हणून प्रवेशद्वाराजवळ आतील प्रवाशांची उतरण्याची वाट पाहत होते. तर काही प्रवासी  खिडकीजवळ जाऊन  रुमाल किंवा बॅगा टाकून  जागा जिंकण्याचा प्रयत्न करत होते. 

 मी बसच्या प्रवेशद्वाराजवळच उभा होतो. बसमधील प्रवासी उतरल्यानंतर  सर्वात पहिल्यांदा मी बस मध्ये चढलो. एका रिकाम्या सीटवर बसत असताना  खालून उभा असलेला एक जवळपास 65 वर्षाचा माणूस खालून रुमाल टाकून,  'ये दोनो सीट में हमारी दो लेडीज बैठने वाली है. आप यहा बैठो मत'. असे बोलू लागला. 
 त्याच्या आणि माझ्या दोन मिनिटांच्या संवादाच्या दरम्यान,  गाडीतल्या सर्व रिकाम्या शीटा पॅक झाल्या. 

 मी त्या व्यक्तीला म्हणत होतो की, मी गाडीत आधी आलो आहे. त्यामुळे इथे मी बसणार आहे. तुम्ही खालून रुमाल टाकून ही जागा कशी काय जिंकू शकता ?  कोणत्या नियमात बसते हे. 
 मी त्याला प्रेमाने बोलत असताना, त्यांनी  चुकी असतानाही शिरजोरपणा करण्यास सुरुवात केली. 

 नंतर मी सुद्धा आवाज वाढवला, आणि चलो कंट्रोल रूम मे, 
 अगर उन्होने कहा की, नीचे से रुमाल डाल के  कोई भी सीट पर दावा कर सकता है तो, मै यहा नही बैठेंगा. 
 लेकिन उन्होने कहा की , जो पहले गाडी मे चढेगा, वह प्रवासी पहले सीट पर बैठ सकता है. 

 असे सांगितले तर, काय करशील. मग मी तुम्हाला कोणती सजा देऊ. 

नियमबाह्यपणे  गाडीतील शीटवर रुमाल टाकून दावा करताय, आणि वरतून शिरजोरी सुद्धा करताय? तुमच्या वयाला हे शोभत नाही. असे मी बोलल्यानंतर  बोलल्यानंतर ते नरमले.  
 नही भैया, हमारे दो लेडीज बैठने वाली है, इनके लिये जगा रख रहा हू. 

 यावेळी मी त्याला म्हटले की, मी पहिल्यांदा गाडीत चढलो, त्यामुळे या सीटवर माझा दावा आहे.  आपण जर जास्त मुजोरी करत असाल तर, हा विषय मी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाईल. आणि नियम काय असते हे तुम्हाला दाखवून देईल. 

 तुम्हाला जागा पाहिजे असेल तर विनंती करा. मात्र,  मुजोरी करून तुम्ही  नियमबाह्यपणे जागा मिळवत आहात, हे चुकीचे आहे. हे मी कदापिही खपवून घेणार नाही. 

 असे,  बोलल्यानंतर त्यांनी, आपला रवैया बदलला आणि  भाईसाब मै रिक्वेस्ट करता हु  यहा लेडीज को बैठने दो. 
 असे म्हणाला, वयाचा मान राखत मी त्यांना  शीट सोडली. 

 मात्र, एवढ्या वेळात गाडी पूर्णपणे पॅक झाली होती. 
 उभे राहायला सुद्धा जागा ऊरली नव्हती. 

 ही गाडी  अकोला येथून आल्यामुळे  कारंजा स्थानकावर पंधरा मिनिटे  बस कंडक्टर आणि ड्रायव्हरच्या  नाश्ता पाण्यासाठी थांबणार होती. 
 त्यामुळे मी बसच्या खाली आलो.

  पुढच्या दहा मिनिटात यवतमाळ कडे जाणारी दुसरी बस आली. 
 स्थानकावर असलेली संपूर्ण गर्दी याच गाडीत गेल्यामुळे  मागून आलेल्या गाडीमध्ये मला प्रथमदर्शनी जागा मिळाली. आणि दारव्हा कडे मार्गस्थ झालो. 

 या प्रवास अनुभवावरून मला एक संदेश द्यायचा आहे , तो असा की,  बस मध्ये प्रवास करताना  बसच्या गेटमधून  जो व्यक्ती पहिल्यांदा आत प्रवेश करेल, तोच रिकाम्या सीट चा हकदार असतो. 
 बाहेरून रुमाल टाकून किंवा बॅग टाकून  कुणीही जागेवर दावा करू शकत नाही. हा साधा सरळ नियम आहे. 

 मात्र, प्रवाशांनी रुमाल टाकून जागा  जिंकल्यानंतर ती जागा त्याला सोडावी लागते. हा अलिखित नियम मान्य केला की काय. असे वेळोवेळी दिसून येते.

 कुण्याही व्यक्तीने रुमाल किंवा बॅग सीटवर टाकली तर  गाडीमध्ये चढलेला  प्रवासी त्या सीटवर बसत नाही. गाडीमध्ये पहिल्यांदा चढतो.  मात्र,  त्याला जागा मिळत नाही. आणि जो व्यक्ती गाडीच्या खालून सीटवर रुमाल टाकतो तोच हुकूमशाही पद्धतीने त्या सीटवर दावा करतो. 

 या प्रकारातून  माझ्यासारखे सुजान नागरिक हा नियमबाह्य प्रकार सहन करत नाहीत. यामुळे अनेक वेळा वाद होतात. 
 हे वाद कंडक्टर ड्रायव्हरला माहित असतात.  मात्र, ते याबाबत काहीच बोलत नाहीत. 

 एसटी महामंडळातील सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांना  हा प्रकार माहित आहे. मात्र,  याबाबत ते कुठलीच नियमावली  जाहीर करत नाहीत. 

 या प्रवास वर्णनातून मला  एसटी महामंडळाला एक  आवाहन करायचे आहे की, आपण एक आदेश काढून  प्रत्येक स्टॉप वरून  गाडी निघताना  कंडक्टरने  सूचना द्यावी की, जो व्यक्ती गेटमधून  अनुक्रमे आत प्रवेश करेल तोच  बस मधील रिकाम्या सीटवर बसू शकेल. 
रुमाल टाकून किंवा बॅग टाकून  कुणीही सीटवर दावा करू नये. असे आवाहन जर  प्रत्येक बसच्या कंडक्टरने केले तर  असल्या प्रकारचे वादविवाद होणार नाहीत. आणि रुमाल टाकून जागा जिंकण्याचा प्रयत्न सुद्धा कोणी करणार नाही. हा खूप महत्त्वाचा विषय असल्यामुळे एस टी महामंडळाने याची दखल घेणे गरजेचे आहे.  
 बघुयात एसटी महामंडळापर्यंत हा मेसेज पोहोचतोय का? 


 आजच्याच प्रवासातील दुसरा अनुभव, दारव्हा येथून काम आटोपल्यानंतर मी दारव्हा बस स्थानकावर 4.30 वा. आलो. 
 या  बस स्थानकाचे नूतनीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे साईडला टीन शेडचे तात्पुरते बस स्थानक बनविले आहे. 
 सायंकाळी साडेचार - पाच ची वेळ म्हणजे संपूर्ण विद्यार्थी आपापल्या गावी बसने जात असतात. शालेय विद्यार्थ्यांची बस स्थानकावर प्रचंड गर्दी असते. अर्धा एक तास थांबल्यानंतर  वणी ते  अकोला ही बस आली. दीड तासापासून  कारंजा कडे जाणारी गाडी नसल्यामुळे कारंजा कडे जाणारे  अनेक प्रवासी उभे होते. ही गाडी आल्यानंतर  प्रवाशांसह शालेय विद्यार्थी सुद्धा मोठ्या संख्येने बस मध्ये चढले. बस निघताक्षणी  बसचे गेट सुद्धा लावणे मुश्किल झाले होते. 

 यावेळेस एक वाद निर्माण झाला, बसच्या गेट जवळच साधारणता तीस वर्षाचा युवक दरवाजाजवळ उभा राहिला. ज्यावेळी ड्रायव्हर गाडीत बसले  त्यावेळी ड्रायव्हर म्हणाले की, मला तो आरसा दिसत नाही. त्यामुळे  तुम्ही तिथून इकडे गाडीमध्ये या, गाडीमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे  तो युवक काही तिथून हलायला तयार नव्हता. शेवटी कंडक्टर आणि त्या युवकांमध्ये प्रचंड बाचाबाची झाली. शेवटी विषय इगो पर्यंत येऊन पोहोचला. 

 यावेळी कंडक्टर आणि ड्रायव्हर नियम सांगत होते, प्रवासी  वाहन क्षमतेच्या कितीतरी जास्त प्रवासी गाडीत बसले आहेत. आणि वरून आमच्याशीच वाद घालत आहात. 
 तो युवक  ड्रायव्हर आणि कंडक्टरला सुद्धा प्रति प्रश्न करत होता. याचा राग कंडक्टरला आला आणि  ते  गाडीतून खाली उतरले. तुम्ही जोपर्यंत इथून हलणार नाही तोपर्यंत मी गाडी बस स्थानकावरून हलवत नाही. एवढे म्हणून ते  बस स्थानकाच्या कंट्रोल रूम कडे निघून गेले. आणि पोलीस कर्मचाऱ्यांना  संपर्क करत होते. 
 या प्रकाराला दहा-पंधरा मिनिटे झाल्यामुळे  गाडीतील घामाघूम झालेले प्रवासी  वैतागले. एका महिलेला अकोला येथून रेल्वेने पुढे जायचे होते. मोजकाच वेळ तिच्याकडे होता. त्यामुळे तिनेही  जोरात बोलून वाद थांबवा आणि गाडी लवकर काढा. असे आवाहन कंडक्टरला केले. 

 त्या युवकामुळे  गाडीला उशीर होत आहे. हे एव्हाना सर्व प्रवाशांच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्या युवकाने सामंजस्याची भूमिका घेऊन  गाडी खाली उतरला आणि  त्या कंडक्टरकडे चालत गेला. आणि सांगितले की मी आता या गाडीने येत नाही. माझ्यामुळे तुम्ही इतर प्रवाशांना थांबू नका. गाडी घेऊन जा. असेच त्यांचे खाली बोलणे झाले असेल. 
 त्यानंतर पाच मिनिटात  ड्रायव्हर  गाडीत बसले आणि गाडी सुरू झाली. 
 प्रचंड गर्दी असल्यामुळे कारंजा पर्यंत  स्टॅंडिंग मध्येच प्रवास करावा लागला. 

 कारंजा आल्यानंतर  पुन्हा वाशिम कडे दुसऱ्या गाडीने प्रवास करायचा होता. वाटले, इथून पुढे तरी गाडीत जागा मिळेल. मात्र, बसताक्षणी जागा मिळाली नाही. चंद्रपूर ते रिसोड  या गाडीत वाशिमकडे  मार्गस्थ झालो, पण स्टॅंडिंग मध्येच. 
 सायंकाळी ची वेळ, गाड्यांची संख्या कमी असल्यामुळे नाईलाजाने त्याच गाडीत यावे लागणार होते. नेहमीचा अनुभव असा आहे की , गाडी मंगरूळपीर आल्यानंतर येथून जागा मिळते. येथेही तसेच झाले. मंगरूळपीर ला जागा मिळाली. या गाडीत कारंजा इथून बसल्यानंतर  अचानकच गाडीमध्ये एका महिलेचा रडण्याचा आवाज आला. ती महिला जोरा जोरात रडत होती. इतर प्रवाशांना कळेनासे झाले की ही महिला का रडत असेल? 

 कंडक्टर जसजसे तिकीट काढत मागे येत होते, तसतसे प्रवासी त्यांना विचारत होते की ही महिला का रडत आहे? 

 शेवटी कुजबूज  अशी आली की, त्या महिलेचे कुणीतरी नातेवाईक वारले असावे. आणि हा निरोप तिला नुकताच मिळाला असावा. यामुळे ती रडत असावी. मंगरूळपीर येईपर्यंत त्या महिलेचे रडणे सुरूच होते. शेवटी ही कुजबूज सर्व प्रवाशांपर्यंत पोहोचली. आपण काय करू शकतो? या भावनेने सर्व प्रवासी शांत राहिलेत. 

 बस मध्ये प्रवास करणाऱ्यांमध्ये सर्वच जाती-धर्माचे, पंथाचे, लोक असतात. येथे फक्त एकच जात असते. ती म्हणजे "प्रवासी". कोण,  कशासाठी प्रवास करतो. हा ज्याचा त्याचा भाग. मात्र,  प्रवासामध्ये पॉझिटिव्ह - निगेटिव्ह दोन्ही प्रकारच्या घटना पाहायला मिळतात. 

 बस मध्ये प्रवास करताना, बऱ्याच बाबी निदर्शनास येतात. त्यातील काही पॉझिटिव्ह आणि प्रेरणादायी घटना मी  अशाप्रकारे प्रवास वर्णनातून रेखाटत असतो. जेणेकरून एक सकारात्मक मेसेज समाजात पेरला जाईल. 
 यापुढेही अशाच सकारात्मक प्रेरणादायी घटना मांडण्याचा माझा प्रयत्न असेल. 

( टिप : मी दैनंदिन कामानिमित्त दररोज कुठेतरी प्रवास करत असतो. प्रवासादरम्यान अनेक अनुभव मला येत असतात. यातील काही निवडक अनुभव शेअर करण्यासाठी मी *प्रवासातील अनुभव* हे सदर सोशल मीडियावर सुरू केले आहे . आजचा हा *सव्वीस* वा भाग आहे. हा अनुभव आपणास कसा वाटला हे आपल्या कमेंट च्या माध्यमातून जरूर कळवा. ) 

✍️ गजानन धामणे 
मुक्त पत्रकार,  वाशिम 
9881204538

Post a Comment

Previous Post Next Post