*प्रवासातील अनुभव...*
( भाग : 25 )
गुरुवार दि. 11 सप्टेंबर 2025 रोजीचा अनुभव...
*शहरांना जोडणारे ग्रामीण रस्ते खड्डे मुक्त केव्हा होतील?*
👉 आज मला मालेगाव तालुक्यातील राजुरा येथे जायचे होते. सावडण्याच्या प्रोग्राम ला जायचे असल्यामुळे पत्नी आणि मी सकाळी आठ वाजताच वाशिम वरून निघालो.
वाशिम - अकोला मार्गावर रिधोरा फाट्यापासून पूर्वेस चार ते पाच किलोमीटर राजुरा हे गाव येते.
सकाळी वाशिम वरून निघाल्यानंतर मालेगाव मार्गावरील रस्त्याचे काम सुरू असलेल्या चौपाल सागर नजीक मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम झाली होती. एवढ्या मोठ्या ट्राफिक मधून कधी निघणार असा विचार करून आम्ही परत वाशीम आलो आणि रिसोड रोडने बायपास मार्गे मालेगाव कडे मार्गस्थ झालो.
मालेगाव च्या पुढे समृद्धी महामार्ग ओलांडल्यानंतर रिधोरा फाटा येथून पूर्वेस राजुरा या गावाकडे गाडी वळविली.
वाशिम - अकोला हा राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे अर्ध्या तासात रिधोरा पर्यंत आलो होतो.
मात्र, रिधोरा फाटा येथून राजुरा गावाकडे वळल्यानंतर गिट्टी टाकून खडीकरण झालेल्या खडतर रस्त्याने जावे लागले.
मागील काही महिन्यांपूर्वी मी या मार्गाने गेलो होतो. आता वाटले होते की, या मार्गाचे डांबरीकरण पूर्ण झाले असेल. मात्र, सद्य परिस्थिती जैसे - थे च होती.
या रस्त्याने जसजसे पुढे जात होतो, तसतसे मोठ मोठे गिट्टीचे खडे आणि खड्ड्यांचा सामना करावा लागत होता.
यावेळी या खडतर मार्गाने गाडी आणलीच कशाला?
असा प्रती प्रश्न मला पत्नीने केला. गाडी हळू घ्या, थोडासा वेळ लागेल, असे त्यांनी म्हटल्यानंतर गाडी एकदम हळू घेतली.
दरम्यान, पत्नीने मला प्रश्न केला की, तुम्ही एवढं लिहिता, बातम्या लिहिता, या रस्त्याबद्दल कधी लिहिले का? मागील काही वर्षांपूर्वी मी या रस्त्याने आले होते तेव्हा सुद्धा हा रस्ता असाच खराब होता.
सरकारने, वाशिम - अकोला रोड कसा सुंदर बनविला आहे. मग, ग्रामीण भागातील असे रस्ते सरकार लवकर पूर्ण का करत नसेल?
त्या रस्त्याने माणसे जातात, मग या रस्त्याने सुद्धा माणसेच जात असतील ना? असे एक ना अनेक प्रश्न त्यांनी मला केले.
आम्हाला लवकर पोहोचायचे असल्यामुळे मी अधिक न बोलता गाव जवळ केले.
या खराब रस्त्यामुळे चार किलोमीटरच्या अंतरासाठी अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ लागला.
तेथे पोहोचल्यानंतर आमच्यासारखेच इतरही काही पाहुणे याच रस्त्याने आले होते. यामधीलच तीन-चार पाहुण्यांमध्ये चर्चा सुरू होती. काय ब्वा, कित्येक दिवसांपासून हा रस्ता असाच खडतर आहे. मागील काही दिवसांपूर्वी त्याचे खडीकरणाचे काम करण्यात आले. मात्र, डांबरीकरणाचा थर न टाकताच ठेकेदारांनी काम बंद केले.
चर्चा करताना ते एकमेकांचे अनुभव शेअर करत होते. शेवटी मीही त्या चर्चेत सहभागी झालो. त्यानंतर एक जण म्हणाले की, अहो, सरकारने आता लाडकी बहिण योजनेचे पैसे दर महिन्याला महिलांना देण्यासाठी इतर सरकारी योजनांचा पैसा वळवला आहे. याच रस्त्यासारखे कित्येक रस्त्यांचे पैसे सरकारने ठेकेदारांना न दिल्यामुळे असे कित्येक रस्त्यांची कामे अर्धवट पडलेली आहेत. मागील काही दिवसात एका ठेकेदाराचे कोट्यवधी रुपयाचे बिल सरकारने न दिल्यामुळे त्या ठेकेदाराने आत्महत्या केल्याची आठवण करून दिली.
आता अशाच प्रकारे रस्त्याची कामे असो व इतर योजनांचा पैसा थांबवून सरकार लाडकी बहिण योजनेसाठी वापरणार असल्याचे एकाने सांगितले.
प्रत्येक जण आपापला अंदाज घेऊन प्रतिक्रिया देत होते. मी मात्र, त्यांची चर्चा ऐकत होतो.
सरकारला जर रस्तेच पूर्णत्वास न्यायचे नाहीत तर असे अर्धवट रस्ते तरी का बनववितात. जाणून बुजून ग्रामीण नागरिकांना त्रास देण्याचा तर प्रयत्न होत नाही ना?
जर सरकार ठेकेदारांची बिले काढत असेल आणि ठेकेदार रस्त्यांची कामे पूर्ण करत नसेल? असेही असू शकते का?
एका जिल्ह्यापासून दुसऱ्या जिल्ह्याला जोडणारे रोड, किंवा एका तालुक्यापासून दुसऱ्या तालुक्याला जोडणारे रोड किती गुळगुळीत बनले आहेत.
मग ग्रामीण भागातील रस्त्याकडेच एवढे दुर्लक्ष सरकार का करत असेल?
ग्रामीण भागातील रस्त्यांवरच पैसा खर्च का करत नसेल? आमच्या ग्रामीण लोकांसोबत सरकार दुजाभाव का करत असेल? असा एकूणच सूर त्या चर्चेतून उमटला.
या चर्चेतूनच मला प्रवास वर्णनासाठी साठी महत्त्वाचा विषय मिळाला.
या प्रवास अनुभवातून एक बाब प्रकर्षाने दिसून येते की, अपवाद वगळला तर छोट्या छोट्या गावांना जोडणारे रस्ते आजही खड्डेमयच आहेत. ज्या काही रस्त्यांची कामे होत असतील, ती सुद्धा निकृष्ट दर्जाची होत आहेत. नवीन बनलेला रस्ता पुढील सहा महिन्यात पुन्हा जैसे थे होतो. हेच एकंदर चित्र सर्वत्र आहेत.
यामागे, लोकप्रतिनिधींचे कमिशन, अधिकाऱ्यांचे कमिशन हे कारणीभूत असल्याची चर्चा सुज्ञ नागरिकात नेहमीच होत असते.
अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हेच जर भ्रष्टाचारास प्रोत्साहन देत असतील तर कामे निकृष्टच होणार ना?
हे चित्र कुठेतरी बदलवायचे असल्यास गावागावातील सुजान नागरिकांनी समोर येऊन आंदोलनांच्या माध्यमातून भ्रष्टाचाऱ्यांना उघडे पाडण्याची गरज आहे.
या राजुरा सारख्या कित्येक रस्त्यांची कामे रेंगाळत पडलेली असल्यास एक सजग नागरिक म्हणून शासनाला वेठीस धरण्याचे काम सुद्धा सामान्य नागरिकांनाच करावे लागणार आहे. हेही तितकेच खरे!
आम्ही परतीचा प्रवास करताना मात्र, या रस्त्यावरून गेलो नाही. राजुरा येथून कुरळा ते डव्हा फाटा मार्गे हायवे वर येऊन आम्ही वाशिम कडे मार्गस्थ झालो.
ग्रामीण भागातील नागरिकांना ये - जा करण्यासाठी किती यातना भोगाव्या लागतात हे आज आम्ही प्रत्यक्ष बघितले.
खेड्यातील संस्कृती, कल्चरल टिकवून ठेवायचे असेल, तसेच जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांना समृद्ध ठेवायचे असेल तर खेडे समृद्धच करावे लागतील.
आणि त्यासाठी दळणवळणाचे ग्रामीण रस्ते , शेतातील पांदण रस्ते समृद्धच करावे लागतील. यापेक्षा दुसरा पर्याय नाही.
( टिप : मी दैनंदिन कामानिमित्त दररोज कुठेतरी प्रवास करत असतो. प्रवासादरम्यान अनेक अनुभव मला येत असतात. यातील काही निवडक अनुभव शेअर करण्यासाठी मी *प्रवासातील अनुभव* हे सदर सोशल मीडियावर सुरू केले आहे . आजचा हा *पंचवीस* वा भाग आहे. हा अनुभव आपणास कसा वाटला हे आपल्या कमेंट च्या माध्यमातून जरूर कळवा. )
✍️ गजानन धामणे
मुक्त पत्रकार, वाशिम
9881204538



Post a Comment