प्रवासातील अनुभव भाग 16 रेल्वेतील प्रवाशांना थंडगार फिल्टरचे पाणी पाजून "त्यांनी" प्रवाशांची मने जिंकली!

 *प्रवासातील अनुभव...*



( भाग : 16 ) 

शनिवार  दि. 3 मे 2025 रोजीचा अनुभव...

... रेल्वेतील प्रवाशांना  थंडगार फिल्टरचे पाणी पाजून त्यांनी प्रवाशांची मने जिंकली ! 

  👉🏻आज मला कामानिमित्त वर्धा येथे जायचे होते. सकाळीच 5.30  वाजता  कोल्हापूर - नागपूर ट्रेनने प्रवास सुरू केला. 11 वाजता वर्धा येथे पोचलो. ठराविक काम आटोपले. 

 परतीच्या प्रवासासाठी   नागपूर -  कोल्हापूर गाडी पकडली. 4.30 वाचता ही गाडी वर्ध्यात पोहोचली. 

 नागपूर येथून अकोल्याकडे जाणाऱ्या  दोन-तीन गाड्या उशिरा असल्यामुळे  या गाडीत नागपुरातूनच प्रचंड गर्दी होती. त्यात भरीस भर म्हणजे  वर्ध्यातून मोठ्या प्रमाणात प्रवासी ट्रेनमध्ये चढले. परिणामी, ट्रेनमध्ये पाय ठेवण्यास सुद्धा जागा शिल्लक नव्हती, एवढी प्रचंड गर्दी झाली होती. आम्हीही त्या गर्दीतच कसेबसे ट्रेनमध्ये चढलो. 

 पुलगाव ला काही प्रवासी उतरले. त्यानंतर धामणगावला बऱ्यापैकी प्रवासी उतरले. त्यामुळे बसण्यास जागा मिळाली. धामणगाव रेल्वे येथे  ट्रेन थांबल्यानंतर तेथील काही सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या बांधवांनी आपल्या सोबत आणलेले थंड पाण्याचे बॅरल ट्रेनच्या वेगवेगळ्या डब्यासमोर उभे केले आणि  पटापट आपल्या बॉटल काढा, थंडगार पाणी भरून घ्या, असे म्हणत होते. बहुतांश सर्वच प्रवाशांकडे पाणी बॉटल असल्यामुळे  अनेक प्रवाशांनी त्यांच्याकडून थंडगार पाण्याच्या बॉटल भरून घेतल्या. मी सुद्धा थंडगार पाणी पिले आणि एक बॉटल भरून घेतली. पाणी घेण्याच्या गडबडीत त्यांचा फोटो काढण्याचे मात्र राहून गेले. 

भर उन्हात त्यांचे हे कार्य पाहून खरे पुण्याचे कार्य तर हेच, याची मला प्रचिती आली. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीचे मी मनोमन त्यांना सॅल्यूट केले. खरे पुण्याचे कार्य तर हेच, अगदी योग्य वेळी आणि गरज असताना  अशा प्रकारची मदत करणे हे खरे पुण्याचे  कार्य होय. त्या दातृत्वकर्त्यांना मी पुन्हा सलाम ठोकतो. 

 जवळपास 40-50 पाण्याच्या कॅन आणल्या होत्या, साधारणतः वीस पंचवीस जण असतील, अगदी तीन ते चार मिनिटाच्या वेळेत  त्यांनी प्रत्येक रेल्वे डब्यासमोर जाऊन प्रवाशांना पाणी वाटण्याचे कार्य पूर्णत्वास नेले. 

अवघ्या चार ते पाच मिनिटात पुन्हा गाडी सुरू झाली, उतरलेल्या आणि चढलेल्या प्रवाशांची गोळा गोळा बेरीज करता, पुन्हा तेवढीच गर्दी डब्यात झाली. 

 एवढ्या भरगच्च गर्दीत  खरमुरे, फुटाणे विकणारा आला, खरमुरे,  फुटाणे, खोबरा गोळ्या घ्या, असे तो म्हणत होता, सोबतच विमल पुडी घ्या असेही म्हणत होता. त्याच्या हातात सुद्धा  खरमुरे फुटाण्यासह विमल च्या पुढे दिसत होत्या. एकीकडे गुटखा बंदी असताना   रेल्वेमध्ये राजरोसपणे गुटखा  पुड्या विकल्या जातो, यावरही आज शिक्कामोर्तब झाले. 

ट्रेनमध्ये  दुसरा एक महत्त्वाचा अनुभव म्हणजे ट्रेन हे सार्वजनिक ठिकाण असताना सुद्धा अनेक जण आपल्या मोबाईल मध्ये  मोठ मोठ्या आवाजात गाणे,  तथा व्हिडिओ रिल पाहत असतात. बाजूच्या प्रवाशाला माझा काही त्रास होईल, याची कशाचीही पर्वा न करता  काही प्रवासी आपल्या मोबाईल मध्ये रिल्स पाहण्यात दंग असतात. आणि चारही बाजूनी मोबाईल चा कर्णकर्कश आवाज घुमत असतो. माझ्या शेजारी बसलेल्या अशाच एका प्रवाशाला मी रिल्स किंवा व्हिडिओ पाहताना  आवाज छोटा ठेवावा किंवा  हेडफोन लावून पहावेत. जेणेकरून इतरांना त्रास होणार नाही. असे म्हणालो, 

मी नम्रपणे केलेल्या सूचनेचा  आदर करत त्यांनी लगेच आपल्या मोबाईल मधील व्हिडिओ बंद केले. 

मात्र,  हे चित्र सर्वत्रच दिसून येत असते. रेल्वे असो की बस  प्रवासादरम्यान मला हा अनुभव नेहमीच येत असतो. मला जी गोष्ट पटत नाही, त्याबाबत भाड-भिड न ठेवता मी थेट प्रश्न करत असतो.  कारण असे म्हणतात की  अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा  तितकाच दोषी असतो. 

 या बाबीची मला सतत जाणीव असते. 

असो, 7.30 ला गाडी अकोला रेल्वे स्टेशनवर आली. येथून गाडीचा मार्ग बदलत असल्यामुळे समोरचे इंजिन मागच्या बाजूला येऊन लागते. त्यामुळे आपसुकच अर्धा तास गाडी येथे वेळ घेते. अर्ध्या तासाचा वेळ असल्यामुळे अनेक प्रवाशांनी आपल्या सोबत आणलेले जेवणाचे डबे  खाण्यास सुरुवात केली. तसेच बाहेरून  विक्रेत्यांचा मोठा कल्लोळ सुरू होता, गरम खाना लेलो, चाय वाले, चाय चाय, पाणी लो पाणी बॉटल लो, गरमागरम समोसे लो, असे विविध खाद्यपदार्थ विकणाऱ्यांची धांदलघाई सुरू होती. 

  म्हणतात ना पोटापाण्यासाठी सर्व काही करा लागते. दूरवरून प्रवास करून आलेल्या  प्रवाशांना  आपला प्रवास पूर्ण करताना  मिळेल ते खाऊन आपला प्रवास पूर्ण करावा लागतो. याचे सुंदर चित्रण मी अकोला रेल्वे स्टेशनवर बघितले. 

करेक्ट 8 वाजता हि ट्रेन वाशिम कडे मार्गस्थ झाली. 

 अकोला स्टेशनवर  अनेक प्रवासी उतरल्यामुळे  उरलेल्या प्रवाशांना  सुटसुटीत बसण्याची जागा मिळाली. 

 उन्हाचा प्रचंड कडाका, आणि अशा वातावरणात प्रवास, हे समीकरण जुळविताना बराच त्रास सोसावा लागतो. 

 मात्र, शेवटी पोटापाण्यासाठी  हे करणेही तितकेच गरजेचे आहे. 

  असो, आता थोड्याच वेळात  मी वाशिम ला पोहोचतोय...

  पुढच्या प्रवासात  आणखी असाच काहीतरी वेगळा अनुभव घेऊन आपल्यासमोर  नक्कीच येणार...! 

( टिप : मी दैनंदिन कामानिमित्त दररोज कुठेतरी प्रवास करत असतो. प्रवासादरम्यान अनेक अनुभव मला येत असतात. यातील काही निवडक अनुभव शेअर करण्यासाठी मी *प्रवासातील अनुभव* हे सदर सोशल मीडियावर सुरू केले आहे . आजचा हा *सोळावा* भाग आहे. हा अनुभव आपणास कसा वाटला हे आपल्या कमेंट च्या माध्यमातून जरूर कळवा. ) 

✍️ गजानन धामणे 

मुक्त पत्रकार,  वाशिम 

9881204538

Post a Comment

Previous Post Next Post