प्रवासातील अनुभव...
( भाग : 17 )
मंगळवार दि. 6 मे 2025 रोजीचा अनुभव...
आडव्या कुंकवाची हरवलेली रेषा !
👉 मंगळवारी मला कामानिमित्त पुसद आणि दिग्रस येथे जायचे होते. वाशिम वरून अकोला माहूर गाडीने प्रवास सुरू केला. एसटीचा प्रवास आणि गर्दीचा सामना हे समीकरण आज काही वेगळं नव्हतं.
मागच्या सीटवर कशीबशी मला जागा मिळाली होती.
माझ्याच बाजूच्या सीटवर एक आजीबाई बसल्या.
त्यांना किनवट ला जायचं होतं. त्यांच्या नातीचं लग्न असल्यामुळे काही दिवस आधीच त्या आपल्या लेकीकडे पोहोचणार होत्या.
त्यांनी आपल्या कपाळावर ठसठशीत आडवं कुंकू लावलेलं होतं.
आजकाल आडव कुंकू लावलेल्या महिला अपवादानेच दिसतात. साधारणतः 60 ते 80 वयोगटातील क्वचित महिला आडव कुंकू लावतात. आमच्या समाजात त्या काळी सर्वच महिला आडवे कुंकू लावत असत. माझी आजी सुद्धा आडवे कुंकू लावायची. माझी आई मात्र गोल कुंकू लावते. आणि पत्नी टिकली लावते.
मी आजीबाईंना बोलायला सुरुवात केली. आधी माझा परिचय आजीबाईंना दिला. नंतर आजींना बोलत असताना त्यांनी बरीच माहिती दिली.
त्या म्हणाल्या की मी जांभरून येथील रहिवासी आहे. मी किनवट ला जात आहे. याच बसणे माहूरपर्यंत जाईल. तेथून पुढे किनवटला जाईल. माझ्या नातीचे ( मुलीच्या मुलीचे) लग्न आहे असे त्या म्हणाल्या.
कुंकवाबद्दल मी बोललो असता, त्या म्हणाल्या की, माझे लग्न झाले तेव्हापासून मी असेच कुंकू लावते. त्यावेळी बहुतांश महिला आडवे कुंकू लावत असत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सुद्धा आडवं कुंकू लावत असत.
आडव कुंकू लावण्याची ही फार जुनी परंपरा आहे. हीच परंपरा मी जपत आहे.
आमच्या काळाच्या काही वर्षानंतर गोल कुंकू लावण्याची परंपरा सुरू झाली. आज कालच्या मुली तर अत्यंत बारीक टिकल्या लावतात. काही जणी तर त्याही लावत नाहीत.
पोटतिडकीने या सर्व बाबी आजीबाई सांगत होत्या.
मागील वर्षी मला एका पुस्तकाच्या मुखपृष्ठावर छापण्यासाठी आजीबाई सारख्या आडवं कुंकू असणाऱ्या महिलेचा फोटो पाहिजे होता. बरीच शोधाशोध केल्यानंतर तो मिळाला होता. याबाबतची आठवण मी आजीबाईंना करून दिली.
त्या आजीबाईकडे पाहून एक विलक्षण कलागुण असलेल व्यक्तिमत्व मला जाणवलं.
त्यांच्या चेहऱ्यावर अतिशय शांत, पण ठाम अभिमान होता. त्या कपाळावरची आडवी रेष, त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाला एक भारदस्तता देत होती.
कधी काळी आडवे कुंकू ही फक्त एक शृंगाराची खूण नव्हती, तर ती सौभाग्य, आत्मविश्वास आणि नात्यांवरील निष्ठेची साक्ष होती.
ती आडवी रेष सौंदर्यवती स्त्रीला अजूनच उठून दिसायची. कुंकवाची ही रेष कपाळाच्या मध्यावरून गेलेली, डोळ्यांतल तेज अजूनच ठळक करत असे. पारंपरिक साड्या, कपाळावर आडवे कुंकू लावणाऱ्या स्त्रिया त्यांचं ते रूप लक्षात राहावं असं असायचं.
ते केवळ शृंगार नव्हतं, तर त्यांच्या अस्तित्वाची ओळख होती. घराच्या उंबरठ्यापासून ते मंदिराच्या दारापर्यंत त्या स्त्रीचा एक तेजस्वी दरारा होता आणि त्या दराऱ्याचं एक महत्त्वाचं गमक होतं हे आडवं कुंकू.
परंतु, काळाच्या ओघात सगळं बदलत गेलं. गोल टिकली आली, मग छोटीशी बिंदी आली, आणि आज अनेक महिलांचं कपाळ रिकामं दिसू लागलं. तर आडवे कुंकू लावण्याची प्रथा आता जवळजवळ लुप्त होऊन गेली आहे.
पण त्या आजीबाई जशा मी त्या प्रवासात पाहिल्या त्या आजही या परंपरेला साक्षी ठरून, आपलं सौभाग्य आणि संस्कृती कपाळावर आडवे कुंकू लावून जपत आहेत. त्या एकट्या आहेत, पण त्यांच्या कपाळावरचं कुंकू एक मोठा इतिहास सांगून जातं.
आजच्या पिढीला कदाचित माहीतही नसेल की एक काळ असा होता, जेव्हा स्त्रीच्या सौंदर्यातील सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे तिचं आडवं कुंकू असायचं.
असो, आजीबाईंशी बोलता-बोलता पुसद कधी आले हे कळलेच नाही. दरम्यान, आजीबाईंची परवानगी घेऊन त्यांचा एक फोटो घेतला.
पुसद बस स्टॅन्ड वर उतरलो. आजीबाई मात्र, त्याच बसने माहूरपर्यंत आणि तेथून पुढे किनवटला रवाना झाल्या.
माझी आजी सुद्धा अशाच प्रकारे आडवा कुंकू लावायची. या आजीबाईंना पाहून माझ्या आजीची मला आठवण झाली.
पुसद येथील काम आटोपून मी पुसद ते दिग्रस जाण्यासाठी यवतमाळ कडे जाणाऱ्या एका बस मध्ये बसलो. या बस मध्ये एक सुंदर वर्णन करता येईल असा अनुभव मला आला. गर्दी असल्यामुळे बस मध्ये चढण्याच्या पायऱ्यावरच मी उभा होतो. माझ्या बाजूलाच कंडक्टर आपल्या जागेवर बसले होते.
झाले असे की, एक 65 ते 70 वर्षांचे धोतर आणि पांढरा शर्ट घालून असलेले गृहस्थ बस मध्ये चढले. त्यांना सिंगद येथे उतरून जवळच्या एका खेड्यावर लग्नाला जायचे होते. ही बस एक्सप्रेस असल्यामुळे सिंगद येथे स्टॉप घेणार नव्हती. थेट दिग्रस येथेच थांबणार होती. त्या काकांनी बस मध्ये चढताना बस सिंगद येथे थांबेल का ? याबाबत कंडक्टरला विचारले की नाही, हे सांगता येत नाही. मात्र, त्यांनी विचारले असावे असे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते.
बस सिंगद येथे आल्यानंतर त्यांनी कंडक्टरला बस थांबविण्याचे सांगितले. यावेळी कंडक्टर म्हणाले की बस येथे थांबत नाही. असे म्हणताच दोघांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले. प्रकरण ड्रायव्हर पर्यंत गेले. ते काका ड्रायव्हरला गाडी थांबवण्याबाबत विनंती करत होते. मात्र, जोपर्यंत कंडक्टर बेल वाजवत नाही , तोपर्यंत गाडीही थांबणार नव्हती. यावेळी डबल बेल देऊन गाडी थांबू नका , असा कंडक्टरने ड्रायव्हरला इशारा दिला. आणि त्या काकांची विनंती फेटाळल्या गेली. ड्रायव्हरला बस थांबविण्यासाठी मी तयार केले, आणि तू डबल बेल वाजवून थांबू नका असे म्हणत आहे. असा थेट प्रश्न त्यांनी कंडक्टरला केला. आता मला लग्नाला उशीर होईल, एका मिनिटासाठी बस थांबवली असती तर काय झाले असते, असा अनेक प्रश्नांचा भडीमार त्यांनी कंडक्टर वर सुरू केला.
तू सुद्धा म्हातारा होणार नाहीस का? तुला सुद्धा मुलं नाहीत का? बस थांबविली असती तर काय झाले असते? असे अनेक प्रश्न त्यांनी कंडक्टरला केले? कंडक्टरही तोडीस तोड त्यांना बोलत होते. त्यांचे हे शाब्दिक युद्ध सर्व प्रवासी ऐकत होते. अस्सल बोली भाषेतील त्यांचे हे शब्द सर्व प्रवासी मन लावून ऐकत होते. त्या काकांची विनवणी, जणू काही सर्वच प्रवाशांनी मान्य केली असावी, एक मिनिटासाठी गाडी थांबली असती तर काय फरक पडला असता? या बिचार्याला वेळेवर लग्नाला पोचता आले असते. अशाच भावना इतर प्रवाशांच्या मनात आल्या असतील.
या प्रकरणात मध्यस्थ म्हणून बोलण्याची माझी खूप इच्छा होती. परंतु चूक कुणाची, याच्या निष्कर्षापर्यंत मी पोहोचलो नव्हतो. त्यामुळे मला त्यांच्या शाब्दिक लढाईत एक दुवा म्हणून सहभागी होता आले नाही.
कारण जेथे स्टॉप नाही तेथे गाडी थांबविण्याची परवानगीही ड्रायव्हरला नसते. असो तो नियमाचा भाग झाला.
शेवटी नाईलाजाने त्या काकांना दिग्रस येथे यावे लागले. पुन्हा दहा-पंधरा किलोमीटर मागे जाऊन ठराविक लग्नात ते वेळेत पोहोचले असतील का? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
( टिप : मी दैनंदिन कामानिमित्त दररोज कुठेतरी प्रवास करत असतो. प्रवासादरम्यान अनेक अनुभव मला येत असतात. यातील काही निवडक अनुभव शेअर करण्यासाठी मी *प्रवासातील अनुभव* हे सदर सोशल मीडियावर सुरू केले आहे . आजचा हा *सतरावा* भाग आहे. हा अनुभव आपणास कसा वाटला हे आपल्या कमेंट च्या माध्यमातून जरूर कळवा. )
✍️ गजानन धामणे
मुक्त पत्रकार, वाशिम
9881204538

Post a Comment