प्रवासातील अनुभव भाग 14 ... जळालेले जंगल व रस्त्याच्या कडेची जळत असलेली झाडे पाहून अत्यंत दुःख झाले!

 *प्रवासातील अनुभव...*

( भाग : 14 ) 




मंगळवार दि. 25 मार्च 2025 रोजीचा अनुभव...

... जळालेले जंगल व  रस्त्याच्या कडेची जळत असलेली  झाडे पाहून अतिव दुःख झाले! 

 

👉🏻 आज मला कामानिमित्त पुसद तालुक्यातील जांब बाजार या गावी जायचे होते. उन्हाचे दिवस असल्यामुळे  सकाळी लवकरच मी घराबाहेर पडलो. हे गाव आडवळणाच्या रस्त्यावर असल्यामुळे  येथे जाण्यासाठी बस किंवा खाजगी वाहनांची  व्यवस्था नाही. त्यामुळे मी सकाळीच मोटर सायकलने निघालो. 

 अनसिंग येथे गेल्यानंतर  इलखी व लाखी गावाजवळून घाट रस्त्याने जांब बाजार कडे मार्गस्थ झालो. 

इलखी येथून थोडे पुढे गेल्यानंतर खराब रस्ता असल्यामुळे  हळुवार मोटरसायकल चालवत होतो. थोडे पुढे घाट रस्ता आणि मोठे जंगल आहे. 

लाखी फाट्याच्या थोडे पुढे गेल्यानंतर मला रस्त्याच्या दोन्ही कडेला जळत असलेले गवत दिसले. 

 मी गाडी थांबवली आणि  फोटो काढण्याच्या उद्देशाने  जवळ जाऊन पाहिले तर  गवत जळत असताना त्यासोबतच  छोटी छोटी  बाभळीची वा तत्सम  वनसंपदा जळत असल्याचे दिसून आले. 

शेतातील अनावश्यक  असलेले गवत काडी कचरा पेटविणे  एक प्रकारे मान्य करू, मात्र अशाप्रकारे रस्त्याच्या कडेला असलेले  गवत पेटवून त्यासोबतच नुकतेच पालवी फुटत असलेले छोटे छोटे वृक्ष जाळून जैवविविधतेला धोका निर्माण करण्यासारखे आहे. 

सदर जळत असलेल्या रस्त्याच्या कडेचे मी फोटो घेतले आणि थोडे पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर घनदाट जंगल लागले, या जंगलात सर्वत्र सागवानाची झाडे दिसत होती. मात्र खाली बघितले तर संपूर्ण जंगल जळालेले दिसत होते. गवत,  काडी कचरा, काहीच दिसत नव्हता, पूर्णपणे जळालेला दिसत होता. 

या जळालेल्या भागात काही छोटी वृक्ष ही असतील, आणि अर्थातच ती सर्व वृक्ष, नवी पालवी जळून नष्ट झालेली असतील याची मला जाणीव झाली. 

अलीकडील काळात निसर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पर्यावरणाचे संरक्षण करण्याऐवजी  जैवविविधतेला धोका निर्माण केला जात आहे. 

 त्यामुळेच की काय 45 डिग्री च्या वर  तापमान पोहोचले आहे. जमिनीतील पाण्याची पातळी प्रचंड खालावली आहे. फेब्रुवारी महिना संपण्याच्या अगोदरच  धरणे ओस पडत आहेत. तर विहिरी तळ गाठत आहेत. 

 यावर कुठेतरी आळा बसावा म्हणून  शासन दरवर्षी वृक्ष लावण्याचा मोहिमा हाती घेते. 

 शासकीय जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लावले जातात. मात्र,  त्यातील किती वृक्ष जगतात,   हा मात्र संशोधनाचा विषय आहे. 

दुसरीकडे  शेतकऱ्यांच्या तसेच इतरांच्या  हातून अशाप्रकारे जंगलाला आग लावून देणे, धुरे पेटविणे , शेतातील काडी कचरा पेटविणे, सोंगलेल्या गव्हाचे काड पेटवित असल्याचे  दिसून येते. 

 सद्यस्थितीत  कुठेही शेत शिवारात भटकंती केल्यास अशा प्रकारे  आग लावल्याच्या घटना निदर्शनास येतील. 

 कदाचित काही ठिकाणी अज्ञानातून हा प्रकार घडत असावा. मात्र याबाबत  योग्य जनजागृती होत नसल्याचे दिसून येत असल्यामुळे  अनेक भागातील शेतकरी व इतर नागरिक  अशाप्रकारे  शेतातील किंवा जंगलातील गवताला पेटविण्याचा प्रकार करीत असावेत. 

जंगलाला आग लावणे ही मानवनिर्मित आपत्तीच मानली जाते. 

 यामुळे मृदा संवर्धनास हानी पोहोचते. शेतातील गवत जाळल्याने जमिनीतील जैविक घटक नष्ट होतात आणि मृदेचा पोत बिघडतो. 

 यामुळे हवामानावर दुष्परिणाम होतात. मोठ्या प्रमाणावर गवत जाळल्याने कार्बन डाय-ऑक्साइड आणि इतर वायू हवेत मिसळतात,  ज्यामुळे वायू प्रदूषण वाढते. 

 सोबतच आगीचा धोका निर्माण होतो. शेतातील गवत जळताना आगीचा अनियंत्रित व प्रसार होण्याची शक्यता असते,  यामुळे शेतमाल आणि जीवितास धोका निर्माण होण्यासह आसपासची जंगले बेचिराख होऊ शकतात.

यामुळे अनेक उपयुक्त कीटक,  गांडूळ आणि सूक्ष्मजीव नष्ट होत असल्यामुळे याचा जैवविविधतेवर धोका निर्माण होतो. 

सरकारी जमीन किंवा जंगलाला आग लावणे हा गंभीर गुन्हा आहे. यामुळे पर्यावरणाची हानी तर होतेच पण मानवी जीवन आणि प्राण्यांच्या जगण्यालाही धोका निर्माण होतो. 

 त्यामुळे असे कृत्य करणाऱ्यांवर  वनविभाग,  पोलीस आणि पर्यावरणीय संस्थांच्या माध्यमातून कठोर कारवाई केली जाऊ शकते. 

या संदर्भाने वेळोवेळी काही कायदे अस्तित्वात आले आहेत. 

 भारतीय वन कायदा : 1927  या कायद्यानुसार कलम 26 आणि कलम 33 नुसार सरकारी जंगलाला किंवा राखीव जंगलाला आग लावणे हा गुन्हा मानला जातो जातो. 

 तसेच पर्यावरण संरक्षण कायदा :  1986 जंगलाची किंवा पर्यावरणाची हानी करणाऱ्या  कृत्यांसाठी हा कायदा आहे. 

एवढे सर्व नियम कायदे असताना सुद्धा  सर्रासपणे मानवनिर्मित आगीच्या घटना दिसून येत आहेत. 

या संदर्भाने असणारे कायदे कृतीत उतरविण्यासाठी शासनाने  कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. 

( टिप : मी दैनंदिन कामानिमित्त दररोज कुठेतरी प्रवास करत असतो. प्रवासादरम्यान अनेक अनुभव मला येत असतात. यातील काही निवडक अनुभव शेअर करण्यासाठी मी *प्रवासातील अनुभव* हे सदर सोशल मीडियावर सुरू केले आहे . आजचा हा *चौदावा* भाग आहे. हा अनुभव आपणास कसा वाटला हे आपल्या कमेंट च्या माध्यमातून जरूर कळवा. ) 

✍️ गजानन धामणे 

मुक्त पत्रकार,  वाशिम 

9881204538

Post a Comment

Previous Post Next Post