*प्रवासातील अनुभव...*
( भाग : 13 )
सोमवार दि. 24 मार्च 2025 रोजीचा अनुभव...
... मी त्या प्राण्याला बाजूला सारल्यामुळे संभाव्य अपघात टळला!
आज मला कामानिमित्त मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथे जायचे होते.
उन्हाचे दिवस असल्यामुळे सकाळी लवकरच मी घराबाहेर पडलो. 40 किलोमीटरच्या अंतरावर जायचे असल्यामुळे मोटर सायकलनेच निघालो.
तसे पहिले तर वाशिम ते शेलुबाजार हा एकदम टकाटक असणारा रस्ता. त्यामुळे 30 ते 40 मिनिटात शेलुबाजार गाठता येते. वाशिम पासून दुतर्फा असणारा हा रस्ता पिंपरी अवगण पासून शेलुबाजार पर्यंत सिंगलच आहे. कदाचित वन विभागाच्या हद्दीत येत असल्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण राहिले असावे असे ऐकण्यात आहे, मात्र तरीही आतापर्यंत हा रस्ता व्हायला पाहिजे होता, असो, हा रस्ता सुंदर आहे परंतु सिंगल असल्यामुळे वाहन क्रॉस होताना एका वाहनाला रस्त्याच्या खाली उतरावेच लागते.
मी वाशिम वरून जात असताना पिंपरी अवगण ओलांडल्यानंतर पुढे पिंपरी सुर्वे फाट्याच्या जवळपास रस्त्याच्या मधोमध अज्ञात वाहनाने धडक दिलेला आणि मृत्यू झालेला कुत्रा मला दिसून आला.
हा कुत्रा दिसताक्षणीच मी गाडी थांबवली. फारच अरुंद रस्ता आणि रस्त्याच्या मधोमध अपघात ग्रस्त होऊन मृत्यू पावलेला हा कुत्रा जर आपण रस्त्याच्या बाजूला सारला नाही तर याच्यावर गाडी जाऊन एखाद्या मोटर सायकल वाल्याचा नक्कीच अपघात होऊ शकतो.
याची जाणीव मला लगेच झाली.
आपण जर इथून पुढे गेलो तर, मागून अनेक वाहने येतील, परंतु कोणीही त्या कुत्र्याला रस्त्याच्या कडेला सरकवणार नाही. रात्री बेरात्री एखादा वेगवान मोटरसायकलवाला येऊन त्या मृत कुत्र्यावरून गाडी नेईल आणि त्याचाही अपघात होईल. याची जाणीव मला झाली होती.
त्यामुळे मी क्षणाचाही विलंब न करता माझ्या गाडीमध्ये ठेवलेला गाडी पुसण्याचा कापड हातात घेतला आणि काठीच्या सहाय्याने त्या मृत कुत्र्याला रस्त्याच्या कडेला असलेल्या खंटी मध्ये सरकवले.
या पाच - दहा मिनिटाच्या टाईममध्ये भराभरा आठ दहा मोटरसायकल तसेच काही चार चाकी गाड्या निघून गेल्या. मात्र,
हा माणूस येथे काय करतोय, रस्त्यावर रक्त पडलेले आहे, आपण विचारपूस केली पाहिजे.
याबाबत तर काहीही विचारपूस करण्याची आवश्यकता कोणाला भासली नसावी.
मी आपला त्या मृत कुत्र्याला बाजूला सारून शेलुबाजार कडे मार्गस्थ झालो.
कदाचित मी त्या कुत्र्याला बाजूला सारले नसते तर, दिवसभरात किंवा रात्री एखादा मोटर सायकलवाला नक्कीच त्याच्यावरून गेला असता आणि अपघात झाला असता, असे मला सारखे वाटत होते.
मात्र, माझ्या त्या कामगिरीमुळे माझ्या मनातील किंतु परंतु सगळे काही निघून गेले होते.
हे काही फार मोठे काम माझ्या हातून घडले नाही. मात्र, संभाव्य अपघात होण्यापासून मी कुणाला तरी वाचविले, याचे आत्मिक समाधान मला मिळाले.
या घटनेवरून मला जो संदेश द्यायचा आहे तो पुढील प्रमाणे,
वेगवेगळ्या रस्त्यांवर विशेषतः भटकंती करणारे कुत्रे किंवा रस्ता ओलांडणारे माकड किंवा मांजर या प्राण्यांचे अपघात होताना जास्त प्रमाणात आढळून येतात.
रस्त्यामध्ये अज्ञात वाहन अशा प्राण्यांना उडवून निघून जाते.
तर त्या अपघातग्रस्त प्राण्याला कोणीही रस्त्याच्या बाजूला सारत नाही. परिणामी, अनेक वेळा रस्त्यावर मरून पडलेल्या अशा मृत प्राण्यांमुळे मोटर सायकल तसेच चारचाकी वाहनांचे अपघात झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
मुळात अशाप्रकारे प्राण्यांचे अपघात झाल्यास कुणीतरी त्याबाबतची माहिती संबंधित विभागाला देणे गरजेचे असते, आणि त्यानंतर त्या विभागाचे कर्मचारी तेथे येऊन अपघात ग्रस्त प्राण्याची योग्य विल्हेवाट लावत असतात.
बऱ्याच वेळा अशा अपघातांमुळे वाहतूक कोंडी सुद्धा होते.
त्यामुळे संबंधित अशा प्रकारच्या घटनांच्या संबंधाने नेहमीच अलर्ट मोडवर असायला पाहिजे. मात्र बऱ्याच वेळा असे दिसून येत नाही.
त्यामुळेच अशा प्रकारे अनेक रस्त्यांवर अपघात ग्रस्त होऊन पडलेले प्राणी , अनेक वाहने गेल्यानंतर चापट होऊन जातात आणि रस्त्यावरून नाहीसे होतात. तरीसुद्धा याबाबतची दखल कोणी घेत नाही. आणि म्हणूनच अशा प्रकारचे अनेक अपघात होताना आढळून येतात.
आज मी ज्या अपघाताबद्दल बोलत आहे, त्या अपघाताचे फोटो मी सोबत टाकलेले आहेत. सोबतच दुसरा एक नागपूर - पुणे एक्सप्रेस हायवे वरचा तऱ्हाळा गावानजीकचा काढलेला फोटो टाकत आहे. या फोटोमध्ये एक मांजर मृत झालेले आहे, साधारणतः चार-पाच दिवसांपूर्वीचे मृत झाले ते मांजर वाहनांच्या ये जा करण्यामुळे रस्त्यावरच चिपकून सुकून गेलेले दिसत आहे.
सांगायचे तात्पर्य म्हणजे, अशाप्रकारे प्राण्यांचे अपघात वेगवेगळ्या रस्त्यांवर सातत्याने होत असतात. मात्र, त्यांना रस्त्याच्या कडेला करण्याची तसदी कुणीही घेत नाही, आणि वेगवान वाहने त्याच्यावरून जाऊन अपघात होताना दिसून येतात.
ह्या बाबी कुठेतरी टाळायच्या असतील तर, शासनाने ठराविक रस्त्याच्या अंतरांवर स्पेशल कर्मचारी ठेवले पाहिजेत आणि रस्त्यांची देखरेख करून घेतली पाहिजे. तरच अशा प्रकारचे अपघातामुळे होणारे अपघात टाळता येऊ शकतात.
( टिप : मी दैनंदिन कामानिमित्त दररोज कुठेतरी प्रवास करत असतो. प्रवासादरम्यान अनेक अनुभव मला येत असतात. यातील काही निवडक अनुभव शेअर करण्यासाठी मी *प्रवासातील अनुभव* हे सदर सोशल मीडियावर सुरू केले आहे . आजचा हा *तेरावा* भाग आहे. हा अनुभव आपणास कसा वाटला हे आपल्या कमेंट च्या माध्यमातून जरूर कळवा. )
✍️ गजानन धामणे
मुक्त पत्रकार, वाशिम
9881204538


Post a Comment