प्रवासातील अनुभव भाग- 12 ... चांगले कर्म करणाऱ्यांना "वेळ" साथ देत असते!

 *प्रवासातील अनुभव...*


( भाग : 12 ) 

मंगळवार  दि. 18 मार्च 2025 रोजीचा अनुभव...


...चांगले कर्म करणाऱ्यांना "वेळ"  साथ देत असते! 

 



👉 आज मला कामानिमित्त  जळगाव जिल्ह्यातील  बोदवड येथे जायचे होते. 

 दूरचा प्रवास असल्यामुळे  सकाळी 8 वाजताच  मी घराबाहेर पडलो. वाशीम वरून बसने थेट अकोला गाठले. 

 बोदवडला बसने जायचे म्हटलं तर तीन-चार वेळेस बस बदलावी लागते. आणि  गर्दीचा सामना करावा लागतो तो वेगळाच. त्यामुळे मी या  गावाला जात असताना  रेल्वेचा पर्याय निवडत असतो. 

 ठरल्याप्रमाणे अकोला आल्यानंतर  बडनेरा ते नाशिक या मेमू पॅसेंजरने बोदवड चे तिकीट काढले. साडेबाराला येणारी ही गाडी दीड वाजता अकोल्यात आली. 

 येथून बसल्यानंतर अडीच वाजता बोदवडला ( नाडगाव ) उतरलो. पहिले काम नाडगावातच होते. त्यामुळे लवकरच तेथील काम आटोपून घेतले. दरम्यान बोदवड येथील माझे 

 सहकारी मोटरसायकलने घेण्यासाठी आले. 

 बोदवडला गेल्यानंतर काम संपेपर्यंत सहा वाजले. सायंकाळी

6 वाजून 10 मिनिटांनी बोदवड वरुन मलकापूरला येण्यासाठी बस स्टॅन्ड वर गेलो असता,  दहा मिनिटापूर्वीच गाडी निघून गेल्याचे चौकशी कक्षा वाल्याने सांगितले. आणि नंतरची गाडी साडेसात वाजता होती. 

 ही गाडी हुकल्यामुळे माझा घरी येण्याचा प्लान पूर्णतः फसला होता. आता नक्कीच मुक्काम करावे लागेल. याची चुणूक मला लागली होती. 

 मात्र प्रयत्न तर मी सोडणार नव्हतोच, 

 सोबतच ट्रेन आणि बसचा मेळ बघून घरी कसे पोहोचता येईल याचे प्लॅनिंग करत होतो. 


 बोदवड बस स्टैंड वरुन सहा वाजताची गाडी पकडून मलकापूर गेल्यानंतर तेथून होळी सणानिमित्त असलेली  स्पेशल ट्रेन ( गाडी नंबर : 07612) पटना ते जालना  ही गाडी  खंडवा,  बुरानपुर,  मलकापूर, अकोला,   वाशिम,  पूर्णा मार्गे जालना  येथे जाणार होती. या गाडीची मलकापूरला येण्याची नियोजित वेळ 6 वाजताची होती. मात्र, लेट झाल्यामुळे ही गाडी साडेआठ वाजता  मलकापूरला पोहोचणार होती. 


 ही गाडी जर माझ्या हाती लागली तर  वाशिम पर्यंत जाऊ शकत होतो. 


 मात्र,  बोदवडची बस हुकल्यामुळे ही गाडी मिळण्याची शक्यता धूसर झाली होती. 

 मात्र, हार मानेल तो "मी" कसला? 

 मी ठरविलेले कुठलेही काम पूर्ण होईल की नाही याची तमा न बाळगता शेवटच्या क्षणापर्यंत  शर्तीचे प्रयत्न करत असतो. हा माझा स्वभाव गुणधर्म आहे. 


 त्यामुळे ही गाडी कशी पकडता येईल याची प्लॅनिंग करत असताना, 

बोदवड बस स्टॅन्ड वरून भुसावळ आणि    मुक्ताईनगर ह्या दोन बस लागल्या होत्या. 

 आधी विचार केला की भुसावळला जाऊ, मात्र, येत असलेली स्पेशल ट्रेन  भुसावळच्या बाहेरूनच येत असल्यामुळे  तेथे ही गाडी  मिळणार नाही, त्यामुळे तेथे जाऊन काही फायदा नाही. 


आपल्याला या ट्रेनला मलकापुरातच पकडावे लागेल. असा विचार करून लगेच मी मुक्ताईनगरच्या बस मध्ये बसलो. बस निघाली, अर्ध्या तासात 7 वाजता ही बस मुक्ताईनगर  बस स्टैंड वर पोहोचली. 


 तेथून मलकापूरच्या बसची चौकशी केली असता सव्वा सात वाजता मलकापूर बस असल्याचे  चौकशी कक्षावाल्यांनी सांगितले. ठराविक वेळेत 7.15 ला मलकापूर वरून चिखली कडे जाणारी  बस आली. गर्दीने खचाखच भरलेली ही बस, मात्र, मला दुसरा पर्याय नसल्यामुळे  गर्दीतच बस मध्ये शिरलो, पंधरा मिनिटांनी बस सुरू झाली. हायवे चा रस्ता असल्यामुळे 8.30 वाचता मलकापुरात आली. 

 दरम्यान "व्हेअर इज माय ट्रेन"   या ॲपवर मी स्पेशल ट्रेन कुठपर्यंत आहे? याची  वेळोवेळी पडताळणी करत होतो. 


 बस मधून उतरल्यानंतर बघितले तर पंधरा मिनिटे  ट्रेन ला यायला उशीर होता. त्यामुळे 

 आता मला खात्री झाली होती की, ही ट्रेन मला नक्कीच मिळणार , आणि थेट वाशिम पर्यंत पोहोचविणार.! 


  बसमधून मलकापुरातील रेल्वे स्टेशन चौकात  उतरल्यानंतर  भराभरा स्टेशन पर्यंत चालत गेलो. तिकीट खिडकीवर जाऊन वाशिम चे तिकीट काढले. 

 या गाडीने जाणाऱ्या एकाही प्रवाशांनी आतापर्यंत टिकीट काढले नव्हते. कारण ही ट्रेन  स्पेशल असल्यामुळे फार काही प्रवाशांना माहिती नव्हती. तिकीट वाल्याला मी वाशिम चे तिकीट मागितले. क्षणभर त्याने विचार करून  या गाडीचे काय खरे आहे, हिला जास्त उशीर होऊ शकतो, असे म्हणताना त्यांनी  कोणालातरी फोन लावला आणि गाडी बद्दल विचारणा केली, दरम्यान भुसावळ पासून पुढे गाडी निघाल्याचे त्यांच्या लक्षात आले. आणि  लगेचच मला तिकीट दिले. 


 तिकीट हातात घेतले आणि रिलॅक्स होत मी  जिन्यावरून चढून दोन नंबरच्या  प्लॅटफॉर्म वर उतरलो. 


 पुन्हा मोबाईल उघडून  "व्हेअर इज माय ट्रेन " अँप बघितले, तेव्हा 9 वाजून दोन मिनिटांनी  ही ट्रेन पोहोचणार होती. 


नंतर थोड्याच वेळात  भोंग्यातून गाडीची सूचना देणाऱ्या बाईचा आवाज आला, आणि  होळी स्पेशल ट्रेन ' पटना बिहार से जालना जानेवाली ट्रेन थोडीही देर मे प्लॅटफॉर्म नंबर दो पर आयेगी, अशी घोषणा केली. 


 रेल्वे डब्यात बसणारा मी एकटाच प्रवासी, 

 रेल्वेच्या शेवटी एकच असणाऱ्या  जनरल डब्यात मला बसायचे होते. 

 ट्रेन आली आणि थांबली, मात्र, इतर जनरल रेल्वे प्रमाणे  जनरल रेल्वे डब्यात पाय ठेवायलाही जागा नसते, हे चित्र मला या ट्रेनमध्ये बिलकुलच दिसले नाही, जनरल डब्बा पूर्णतः खाली होता, तसेच समोरचे सर्व डबे हे 80 टक्के रिकामे होते, 

    

 ट्रेनमध्ये बसलो, मोबाईल पूर्ण चार्ज करून घेतला, साडेदहा वाजता ही गाडी अकोला स्टेशनवर आली. 


 तेथूनच हे प्रवास वर्णन लिहिण्याचे हाती घेतले...

 आता वाशिम कडे निघालो आहो, बारा वाजेच्या आसपास ही ट्रेन वाशीमला पोहोचेल.  दहा मिनिटात मी घरी पोहोचेल , नंतर जेवण आणि निवांत झोप...


 कुठलीही घटना घडामोड नसताना, हे प्रवास वर्णन लिहिण्याचे कारण असे की, एवढा उशीर झाल्यानंतर सुद्धा  मला घरी पोहोचविण्यासाठी जणू काही  स्पेशल ट्रेनचं आली की काय? याची अनुभूती मला आजच्या प्रवासात मिळाली. 

 महतप्रयासानंतर  मलकापूर स्टेशनवर पोहोचणे, वाशिम कडे येणारी आणि तेही  स्पेशल ट्रेन, जी ट्रेन सहा वाजताच तिथून जाणार होती , त्या ट्रेनने तीन तास उशिरा येणे, आणि अगदी वेळेवर मला ती मिळणे, आणि सुखरूप घरी पोहोचविणे. 

 हा सर्व योगायोग आहे, असे मला जाणवले आहे. 


 चांगले कर्म केले की चांगले फळ मिळत असते, असे ज्येष्ठ व्यक्ती नेहमी सांगत असतात. 

 चांगले कर्म करणाऱ्यांचं कधीही वाईट होत नसते, अशी एक मन सुद्धा आहे. 

 याचीच प्रचिती आज मी अनुभवली आहे. 


 आता गाडी नुकतीच अमानवाडी स्थानकावरून पुढे निघाली आहे. थोड्या वेळात वाशिम ला पोहोचेल...


( टिप : मी दैनंदिन कामानिमित्त दररोज कुठेतरी प्रवास करत असतो. प्रवासादरम्यान अनेक अनुभव मला येत असतात. यातील काही निवडक अनुभव शेअर करण्यासाठी मी *प्रवासातील अनुभव* हे सदर सोशल मीडियावर सुरू केले आहे . आजचा हा *बारावा* भाग आहे. हा अनुभव आपणास कसा वाटला हे आपल्या कमेंट च्या माध्यमातून जरूर कळवा. ) 

✍️ गजानन धामणे 

मुक्त पत्रकार,  वाशिम 

9881204538

Post a Comment

Previous Post Next Post