प्रवासातील अनुभव...
प्रवासातील अनुभव भाग - 11
( भाग : 11 )
बुधवार दि. 12 मार्च 2025 रोजीचा अनुभव...
...अन 'त्या' कणखर आजीबाईंनी 'त्यांना' स्वत्वाची जाणीव करून दिली!
👉 आज मला जानेफळ येथे जायचे होते. निघण्यास थोडा उशीर झाल्यामुळे मी बसने जाण्याचा निर्णय घेतला. सकाळी दहा वाजता बसने मेहकर पर्यंत गेलो. तेथे गेल्यानंतर जानेफळ फाटा येथून प्रवासी मॅक्झिमो गाडीत बसलो.
मेहकर ते जानेफळ हा 18 किलोमीटरचा मार्ग.
या मार्गावर बसेसची संख्या थोडी कमी असल्यामुळे ऑटो व इतर प्रवासी वाहनांची संख्या थोडी जास्त.
बस ची वाट न पाहता मी एका प्रवासी मॅक्झिमो गाडीत बसलो.
आधीची गाडी निघाल्यानंतर त्यामागे लागलेल्या मॅक्झिमो गाडीत भराभर माणसे बसली.
दरम्यान एसटी बसची वाट पाहत उभ्या असलेल्या एक आजीबाई गाडीत माझ्या शेजारी येऊन बसल्यात.
बऱ्यापैकी प्रवाशांची भरती झाल्यामुळे ड्रायव्हरने गाडी स्टार्ट केली. दरम्यान, गाडी स्टार्ट केल्यानंतर दोन प्रवासी आणखी येऊन मागच्या साईडला बसले.
ते दोघेही थोडेसे जास्तच मद्यधुंद अवस्थेत होते.
त्यामुळे त्यातील एकाच्या शेजारी बसलेला प्रवासी उतरला आणि निघून गेला.
नंतर गाडीचा प्रवास सुरू झाला, मागे बसलेले दोघेही मद्यधुंद असल्याचे सर्वच प्रवाशांच्या आधीच लक्षात आले होते. कारण त्यांचे चेहरे मद्यपान केल्याचे स्पष्टपणे सांगत होते. परंतु, ड्रायव्हरने बसविल्यामुळे आपण कशाला काही बोलवायचे या भावनेने इतर प्रवाशांनी त्यांना उपदेश पर बोलणे टाळले.
मात्र, माझ्या शेजारी बसलेल्या आजीबाईंनी आपला कणखर बाणेदारपणा दाखवत, त्या दोघांनाही त्यांच्या स्वतःची जाणीव करून दिली. दारू पिणे हे वाईट आहे, त्याचे दुष्परिणाम कुटुंबाला भोगावे लागतात. बाबत आजीबाईंनी त्यांना आपल्या मराठमोळ्या भाषेत त्यांना संबोधित केले.
बाबा हो, तुमच्या मागे तुमचे आई-वडील आहेत, पत्नी आहे, लेकरं बाळ आहेत. या सगळ्यांची जबाबदारी तुमच्यावर आहे. असे असताना तुम्ही भर दिवसा अशाप्रकारे दारू पिणे योग्य आहे का.? दारू ही अख्या कुटुंबाचा नाश करते हे आपल्याला माहित नाही का? तुम्ही जर असे वागले तर तुमच्या मुलांवर काय संस्कार होतील? तुमची पत्नी, आई-वडील आणि मुले खरंच सुखी जीवन जगू शकतील का? तुम्ही अशा अवस्थेत घरी गेलात तर त्यांना कसे वाटेल ? आपला हा अर्ध्या तासाचा सोबतचा प्रवास , मात्र आपल्या व्यसनाचा आम्हाला त्रास होतोय की नाही?
तुम्ही कुटुंबाचा आधार आहात आणि तुम्हीच जर अशा पद्धतीचे व्यसन करत असाल तर त्या कुटुंबाने कोणाच्या भरोशावर रहावे?
आपल्या अस्सल बोलीभाषेतून त्या आजीबाई त्या दोघांनाही स्वतःची जाणीव करून देत होत्या.
आजीबाईंच्या या प्रेमळ व भावनिक शब्दांच्या उपदेश पर बोलण्याचा त्या दोघांनाही राग मुळीच आला नाही. उलट आजीबाई आपण खरं सांगत आहात. आम्हीच कुठेतरी चुकलो आहोत, आपण म्हणता ते अगदी सत्य आहे. अशी प्रतिक्रिया त्यांच्या बोलण्यातून आली.
वास्तविक पाहता मद्यप्राशन केलेल्या व्यक्तीसोबत इतर कुणी अनोळखी व्यक्ती सहसा संवाद साधत नाहीत.
मात्र, पै पै जमा करण्यासाठी किती घाम गाळावा लागतो. आणि किती कष्ट घ्यावे लागतात. याची जाणीव असलेल्या आजीबाईंनी अगदी हृदयसंवादातून त्या दोघांना मद्यपान न करण्याचे आवाहन केले.
त्या आजीबाईंच्या बोलण्यातून नम्रता आणि आपुलकीची भावना दिसून येत होती. त्यांच्या बोलण्यात माधुर्य होते. त्या आजीबाईंनी त्या दोघांना केलेले उपदेश योग्यच असल्याची दाद सोबत असलेल्या आम्ही सर्वच प्रवाशांनी दिली.
मी माझा परिचय करून देत आजीबाईंचे कौतुक केले, त्यांना अधिक बोलते केले. त्यानंतर आजीबाईंनी असेच अनेक किस्से शेअर केले. त्याकाळी महिला फार जास्त शिकत नव्हत्या. मात्र कुटुंब काबिला चालविण्याचे गणित त्यांच्याशिवाय कुणालाही जमत नव्हते.
या आजीबाई सारखा कणखरपणा, बाणेदारपणा, निडरपणा सर्वच महिलांच्या अंगी आला तर आणखी सशक्त अशी महिलांची पिढी तयार होण्यास वेळ लागणार नाही.
पुढे दोन-तीन स्टॉप गेल्यानंतर ते दोघे एका गावातील स्टॉपवर उतरले. मात्र, त्यांच्याकडे भाड्यासाठी पैसे नसल्यामुळे आमच्याकडे पैसे नसल्याचे ते ड्रायव्हरला म्हणाले. नाईलाजाने ड्रायव्हरलाही ते त्यांचे भाडे सोडून द्यावे लागले. पुढे अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर जानेफळ आले. तेथील चौफुलीवरच उतरून आजीबाई आपल्या पाहुण्याकडे निघून गेल्या. त्या जात असताना मात्र, मी त्यांना सॅल्यूट करण्याचे विसरलो नाही.
( टिप : मी दैनंदिन कामानिमित्त दररोज कुठेतरी प्रवास करत असतो. प्रवासादरम्यान अनेक अनुभव मला येत असतात. यातील काही निवडक अनुभव शेअर करण्यासाठी मी *प्रवासातील अनुभव* हे सदर सोशल मीडियावर सुरू केले आहे . आजचा हा अकरावा भाग आहे. हा अनुभव आपणास कसा वाटला हे आपल्या कमेंट च्या माध्यमातून जरूर कळवा. )
✍️ गजानन धामणे
मुक्त पत्रकार, वाशिम
9881204538

Post a Comment