*प्रवासातील अनुभव...*
(भाग : 10 )
बुधवार दि. 05 मार्च 2025 रोजीचा अनुभव...
बसमध्ये सीटवर खालूनच रुमाल टाकला, अन, म्हणे ही जागा माझी आहे, येथे बसू नका!
👉 आज मला आर्णी ला जायचे होते. दूरचा प्रवास असल्यामुळे मी सकाळीच बस ने वाशिम वरुन निघालो. वाशिम ते मंगरूळपीर गेल्यानंतर मंगरूळपीर येथून अकोला - दिग्रस गाडीने मला दिग्रस पर्यंत जायचे होते. आणि दिग्रस वरून आर्णीला जायचे होते.
मंगरूळपीर येथे पोहोचल्यानंतर अकोल्या वरून येणारी दिग्रस गाडी एक ते दीड घंटा होऊनही आली नाही. जवळपास दोन तासानंतर अकोला दिग्रस गाडी आली.
दोन ते अडीच तास गाडी न आल्यामुळे मानोरा आणि दिग्रस कडे जाणारे 100 च्या वर प्रवासी जमले होते.
एवढी गर्दी असल्यामुळे साहजिकच सीटवर जागा मिळणे मुश्किल होते.
शेवटी दिग्रस गाडी आली, सोबतच लागोपाठ मानोरा येथे जाणारी गाडीही आली. दोन्ही गाड्यांमुळे प्रवासी डिव्हाइड झाले आणि मानोरा पर्यंत जाणारे प्रवासी मानोरा गाडीत बसले.
मला दिग्रस येथे जायचे असल्यामुळे मी त्या गाडीत बसलो.
गाडी प्रवाशांनी खचाखच भरलेली होती.
अनेक लोक उभे होते.
मानोरा आल्यानंतर मानोरा चे लोक उतरतील आणि जागा होईल. या आशेने मी उभा होतो.
दरम्यान मानोरा बस स्थानक आले. बऱ्यापैकी प्रवासी मानोरा येथे उतरले. सर्वात शेवटच्या सीटवर जागा होती. इतर प्रवासी खाली उतरल्यानंतर मी शेवटच्या सीट कडे बसण्यासाठी गेलो असता, बसच्या खाली असलेल्या अंदाजे 65 वर्षीय व्यक्तीने खिडकीतून रुमाल टाकला आणि ही मागची पूर्ण सीट माझी आहे. येथे बसाल तर याद राखा. मी ही शीट रुमाल टाकून जिंकली आहे. तुम्ही येथे बसू नका. मी आणि माझे सहकारी बस मध्ये चढून या सीट वर बसणार आहेत. अत्यंत आवेशात ते गृहस्थ मला बोलत होते.
आधीच मंगरूळपीर येथून मी उभा आलेलो होतो. आणि सीटवर बसणार इतक्यात त्या व्यक्तीचे ते शब्द मला कदापी सहन झाले नाही. कारण आधी जो प्रवासी उभ्याने प्रवास करत आहे. तो त्या खाली झालेल्या शीट चा हकदार असतो. हा साधा सरळ नियम आहे.
त्यानंतर बाहेरील प्रवाशांनी उरलेल्या रिकाम्या सीटवर बसायचे असते.
मात्र, नियम पाळतील ते वैदर्भीय ( विदर्भातले ) कसे? हाच मोठा प्रश्न आहे.
मी त्या सीटवर बसलो असता, ते गृहस्थ आवेशात येऊन मला, तेथे बसू नका मला येथे बसायचे आहे. असे जोरात म्हणत होते .
त्यांच्या या अरेरावीमुळे मीही त्यांच्यावर भडकलो आणि मी मंगरूळपीर येथून उभा आलेलो आहे. त्यामुळे येथे बसण्याचा माझा हक्क आहे. दुसरी सीट रिकामी असेल तर तेथे बसा, असे मी त्यांना म्हणालो.
त्यांनी ज्या आवेशात मला सीट वरून उठविण्याचा प्रयत्न केला त्याच आवेशात मीही त्यांना प्रत्युत्तर दिले.
त्यांनी हा विषय जास्तच ताणला असता तर, मलाही नाईलाजाने प्रत्युत्तर तर द्यावे लागणार होते. वेळप्रसंगी पोलीस प्रशासनाची मदत घ्यावी लागणार होती.
ज्येष्ठ व्यक्तीचा आदर करणारा मी आहे. मात्र, ते व्यक्ती कुठलीही भीडभाड न ठेवता जागा बळकावण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्यामुळे मलाही त्यांना प्रत्युत्तर द्यावे लागले.
जागा जिंकण्याचा त्यांचा केविलवाला प्रयत्न माझ्या शेजारचे इतर प्रवासी पाहत होते. माझ्या समोरच्या सीटवर बसलेले एक गृहस्थ त्या व्यक्तीच्या संपर्कातील होते. त्यांनी लगेचच त्या व्यक्तीला आवाज दिला आणि आत्ताच येऊन दादागिरी करता का? असे म्हणाले, यानंतर आपले कुठेतरी चुकत असल्याची जाणीव त्या व्यक्तीला झाली, नंतर ते बसच्या प्रवेशद्वाराकडे निघून गेले.
बस मध्ये आल्यानंतर माझ्या समोरच ते उभे होते. परंतु पुन्हा मला बोलण्याची त्यांची हिंमत झाली नाही.
पोहरादेवी आल्यानंतर त्यांनी सीटवर टाकलेला रुमाल मी त्यांच्या हवाली केला. मुकाट्याने रुमाल घेऊन त्यांनी पुढचा प्रवास केला.
दिग्रस येथील मानोरा चौकात मी बस मधून उतरलो, माझ्याच मागे तेही तेथे उतरले आणि मागच्या मागे निघून गेले.
या प्रवास वर्णनातून मला शासनाला हे सांगायचे आहे की, एसटी महामंडळाने कठोर नियमावली बनवावी, आणि बसच्या प्रवेशद्वारासमोर रांगेत उभे राहूनच बसमध्ये चढावे, जो व्यक्ती रांगेत राहून पुढे चालेल त्याच व्यक्तीला जागा मिळेल, खिडकीमधून बॅग किंवा रुमाल टाकून कुणालाही सीटवर ताबा मिळवता येणार नाही. असे कोणी केले आणि त्याबाबतची तक्रार झाली तर अवैधपणे सीटवर कब्जा मिळविणाऱ्या प्रवाशावर दंडात्मक कारवाई करण्याचे प्रावधान करणे अत्यंत गरजेचे आहे.
जे लोक गर्दीतून प्रवेशद्वारातून बस मध्ये चढतात त्यांना जागा मिळत नाही. आणि जे लोक रुमाल किंवा थैली टाकून ही माझी जागा आहे. येथे बसू नका असा खालूनच आदेश देतात. त्यांना मात्र, ती सीट मिळते. याबाबत बस कंडक्टर सुद्धा फारशी दखल घेत नाहीत. या प्रकारातून अनेक वेळा भांडण झाली आहेत. वादविवाद झाले आहेत.
असे वाद-विवाद मी नेहमी पाहत असतो. परंतु आजचा हा प्रसंग माझ्यासोबतच घडलेला असल्यामुळे या प्रवासवर्णनाचा नायक मीच ठरलो आहे.
एखादा गरीब किंवा लुचूपूचू माणूस बस मध्ये गर्दी असतांना जागा मिळवुच शकत नाही.
अशी सगळी परिस्थिती आहे. कुठल्याही बसने कुठल्याही मार्गावर प्रवास केला तर जागा मिळणे कठीण होऊन बसले आहे.
याचे कारण म्हणजे, 65 वर्षांवरील जेष्ठांना मोफत प्रवास आहे. महिला प्रवाशांना तिकिटात 50 टक्के सवलत आहे. तसेच इतर सवलती वाले ही भरपूर असतात.
त्यामुळे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. आणि गाड्या अत्यंत कमी प्रमाणात असतात. बहुतांश सर्वच डेपोमध्ये प्रवाशांच्या तुलनेत अत्यंत कमी बस गाड्या आहेत.
हा एक ज्वलंत विषय होऊन बसला आहे.
विद्यमान सरकार बस वाढविण्याची नुसती घोषणा करते. परंतू त्या तुलनेत नवीन गाड्यांची भर पडताना दिसून येत नाही. माझ्या या प्रवास वर्णनाची एसटी महामंडळ दखल घेईल अशी अपेक्षा करतो.
( टिप : मी दैनंदिन कामानिमित्त दररोज कुठेतरी प्रवास करत असतो. प्रवासादरम्यान अनेक अनुभव मला येत असतात. यातील काही निवडक अनुभव शेअर करण्यासाठी मी *प्रवासातील अनुभव* हे सदर सोशल मीडियावर सुरू केले आहे . आजचा हा दहावा भाग आहे. हा अनुभव आपणास कसा वाटला हे आपल्या कमेंट च्या माध्यमातून जरूर कळवा. )
✍️ गजानन धामणे
मुक्त पत्रकार, वाशिम
9881204538

Post a Comment