प्रवासातील अनुभव : भाग - 9

 *प्रवासातील अनुभव...* 

भाग : 09 ) 





मंगळवार दि. 04 मार्च 2025 रोजीचा अनुभव...

भुकेने व्याकुळलेल्या  प्राणीमात्रांवर खाकी वर्दी चे ममत्व! 


👉 आज मला पुसद येथे जायचे होते. बऱ्याच ठिकाणी जायचे असल्यामुळे मी मोटरसायकलनेच गेलो. दिवसभर कामे आटोपून येरवाळी घरी पोहोचण्याच्या अनुषंगाने  04.30  वाजता पुसद वरून वाशिमला मार्गस्थ झालो. 

 मी कुठल्याही रस्त्याने येजा करताना  ठराविक वेगानेच मोटरसायकल चालवत असतो. पुसद वरून निघाल्यानंतर आपल्या दैनंदिन स्पीड मध्ये मी वाशिम कडे येत होतो. वाशिम - पुसद हा मार्ग बहुतांश घाट रस्ता असून जवळपास 30 किलोमीटर रस्त्याचे अंतर सागवानाच्या घनदाट जंगलातूनच करावे लागते. आता नुकताच उन्हाळा लागलेला असल्यामुळे सागवानांच्या झाडाची पानगळ झालेली आहे. अनेक ठिकाणी जंगलाला आग लावून पालापाचोळा  जाळलेला दिसतो. कुठेही हिरवळ दिसत नाही किंवा पाण्याचे डबके  दिसत नाही. परिणामी, या जंगल परिसरातील  प्राणीमात्रांची  खूपच आबाळ होत असल्याचे दिसून येते. या जंगलातील अनेक वन्य प्राणी पाणी व खाद्याच्या शोधात भटकताना दिसतात. 

  

 पुसद वरून येताना खंडाळा घाट पार केल्यानंतर हिवळणी फाट्याजवळुन थोडेसे पुढे आल्यानंतर मला रस्त्याच्या डाव्या बाजूला खाकी वर्दीतील चार जण दिसले. त्यांच्या थोडे जवळ जाऊन मोटरसायकल उभी केल्यानंतर मला एक आनंददायी चित्र डोळ्यासमोर दिसले. 

*ते म्हणजे खाकी वर्दीतील ते चार जण आपल्या सोबत आणलेले  बिस्किट व चणे फुटाणे जंगल परिसरात राहणाऱ्या माकडांना चारत होते.* 

 दोन-तीन प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये त्यांनी बरीच बिस्किटे आणलेली दिसत होती. आणि समोर वीस ते पंचवीस माकडांचा कळप त्यांच्याजवळ येऊन उभा होता आणि त्यांनी टाकलेली बिस्किटे खाताना ते दिसून येत होते. 

  रस्त्याने मार्गक्रमण करणारे  खाकी वर्दीतील ते चार जण त्या माकडांबाबत  ममत्वशील आहेत हे मला दिसत होते. 

   

 हे दृश्य पाहता क्षणीच मला "प्रवासातील अनुभवाची "  स्टोरी मिळाल्याची जाणीव झाली. 


 त्यांच्याजवळ पोहोचताच मी माझी बाईक रस्त्याच्या कडेला लावून खिशातील मोबाईल बाहेर काढला आणि  त्यांच्यातील एकाला सांगितले की मी आपल्या या प्राणी प्रेमाबद्दल लिहिणार आहे . मी आपले फोटो घेत आहे. यावेळी ते म्हणाले की, साहेब आमचं हे कार्य प्रसिद्धीसाठी मुळीच नाही. यावेळी मी त्यांना म्हणालो की, आपण मला येथे थोडीच बोलावले, आपल्याही ध्यानीमनी नसताना मी येथे पोहोचलो आहे. मी पत्रकार असल्यामुळे आपली दखल नक्कीच घेणार. याबाबत दुमत नाही. ही घटनाच मुळात नॅचरल असल्याचे मी त्यांना सांगितले. 


आपल्या या कार्याची प्रेरणा इतरांनी घेतली पाहिजे. म्हणून मी आपल्याबद्दल लिहिणार आहे. असे म्हटल्यावर त्यांनी होकार दिला आणि त्या माकडांना बिस्किटे आणि इतर खाद्य त्यांच्यापुढे टाकत राहिले. 

 हे चित्र जणू काही आजचेच नवीन नाही. ते माकड आणि या खाकी वर्दीवाल्यांचे  जुनेच ऋणानुबंध असल्याचे मला जाणवत होतेच. 

 मी पत्रकार असल्यामुळे प्रश्न विचारणारच होतो. 

  यावेळी त्यांनी बिस्किटे टाकून झाल्यानंतर मी त्या पोलीस बांधवांना बोलते केले, यावेळी ते म्हणाले की, साहेब आम्ही खंडाळा पोलीस स्टेशन येथे  गृहरक्षक दलात कार्यरत आहोत. 

 बेलुरा आणि मांजर जवळा येथील आम्ही रहिवासी आहोत. दररोज आम्ही या रस्त्याने येता करतो. 

 या पानगळ झालेल्या भयान जंगलात  अनेक वन्य प्राणी आहेत. या दिवसात त्यांच्या पाण्याचा आणि खाद्याचा प्रश्न उभा राहत असतो. 

 या ठिकाणी जे माकडे आहेत  अशाच प्रकारच्या माकडांच्या टोळ्या तीन चार ठिकाणी आम्हाला दिसायच्या आणि रस्त्याने ये - जा करणाऱ्या प्रवाशांकडे आशाळभूत नजरेने बघायचे. त्यामुळे आम्हाला कळून चुकले की यांना अन्न,  पाण्याची  गरज आहे. 


त्यामुळे आम्ही दररोज नित्यनेमाने सकाळी जाताना किंवा तेथून परत येताना सोबत बिस्किटे किंवा इतर काही खाद्यपदार्थ आणत असतो. आणि ते या माकडांना देत असतो. हिवळणी फाट्या जवळील या ठिकाणी एक टोळी असते. तसेच थोडे समोर गेल्यानंतर  मारवाडी जवळील  वळण रस्त्यावर दोन माकडांच्या टोळ्या असतात. त्यांना आम्ही नित्यनेमाने खायला देत असतो. 

 एखाद्या दिवशी आम्ही आलो नाही तर, आम्हालाच कसे तरी वाटते. हे माकडे आम्ही दिसलो की लगेच  आमच्या जवळ येतात. आम्ही आणलेले कुठलेही खाद्य हातातून घेऊन ते तिकडे जाऊन खातात. आमची त्यांना मुळीच भीती वाटत नाही. 

 कारण आमचे एक आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे. 

  त्या चौघा बांधवांनी अशा प्रकारे आपले अनुभव कथन केले. थोडे पुढे गेल्यानंतरही त्यांनी त्या दुसऱ्या माकडांच्या टोळीला बिस्किटे टाकली. 


 पोलीस बांधवांबद्दल  काही चांगले तर काही वाईट अनुभव  चर्चेत येत असतात. मात्र,  खाकी वर्दीच्या मागे एक ममत्व लपलेले आहे, प्रेम आहे,  जिव्हाळा आहे, दानत आहे, सहकार्याची भावना आहे, हे या भावांच्या कृतीवरून दिसून येते. 


  चेहऱ्यावर कुठलाच राग,  लोभ,  मत्सर,  नाही. 

 आपली ड्युटी सांभाळून  काहीतरी चांगले करणे, यातच आम्हाला समाधान वाटत असल्याचे त्यांचे मत आहे. 


 एकीकडे समाजातील माणुसकी हरवत चालल्याची उदाहरणे दिसत असताना किंबहुना   त्याहून अधिक प्रमाणात माणुसकी आजही जिवंत असल्याचे या बांधवांच्या प्राणी प्रेमावरून दिसून येते. 


  खंडाळा पोलीस स्टेशन येथील गृहरक्षक दलात कार्यरत असलेले सुभाष घुमकर, विष्णू टाकरस, वैभव मारकड, ज्ञानेश्वर आडे  ही त्या खाकी वर्दीतील चार भावांची नावे आहेत. 

 खाकी वर्दी अंगावर असतानाही बोलण्यात कुठलाही उन्मादपणा नाही, त्यांच्या बोलण्यातूनच दातृत्वपणा दिसून येत होता. 

 सुभाष घुमकर यांच्याशी  मी बोलताना ते म्हणाले की, कोरोना काळातही आम्ही अशाच प्रकारे  रस्त्याने येता करणाऱ्यांना मदत करत होतो, ड्युटी करतानाही आम्ही  "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय"  या ब्रीद वाक्याची अंमलबजावणी करत असतो. आमच्या पोलीस स्टेशन येथेही आम्ही  छानशी पारस बाग तयार केली असून पक्षांचा तेथे सतत वावर असतो. चर्चा करताना त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. 


 यावेळी सायंकाळचे साडेपाच वाजले होते.   सूर्य मावळतीला आला होता. थोड्याच वेळात अंधार  पडणार होता, त्यामुळे मी त्यांना आपल्या सहृदयतेला सॅल्यूट असे बोलून पुढे वाशिमकडे मार्गस्थ झालो. 

 थोड्यावेळाने तेही आपापल्या गावी मार्गस्थ झाले. 


( टिप : मी दैनंदिन कामानिमित्त दररोज कुठेतरी प्रवास करत असतो. प्रवासादरम्यान अनेक अनुभव मला येत असतात. यातील काही निवडक अनुभव शेअर करण्यासाठी मी *प्रवासातील अनुभव* हे सदर सोशल मीडियावर सुरू केले आहे . आजचा हा नववा भाग आहे. हा अनुभव आपणास कसा वाटला हे आपल्या कमेंट च्या माध्यमातून जरूर कळवा. ) 


✍️ गजानन धामणे 

मुक्त पत्रकार,  वाशिम 

9881204538

Post a Comment

Previous Post Next Post