*प्रवासातील अनुभव...*
भाग : 08 )
सोमवार दि 3 फेब्रुवारी 2025 रोजीचा अनुभव...
...संसाराचं बिऱ्हाड घेवून रेल्वेतुन उतरतांना "तीला" झालेल्या मानसिक वेदनांनी "मला" गहिवरून आणले !
👉 आज मला मलकापूर ला जायचे होते. दूरचा प्रवास असल्यामुळे आणि बसने जाणे येणे शक्य नसल्यामुळे काही बसने तर तर काही ट्रेन चा प्रवास करून मी आजचे काम पूर्ण करण्याचे ठरविले होते. सकाळीच साडेआठ वाजता वाशिम वरुन बसने अकोला आलो. अकोल्यातून बडनेरा नाशिक या डेमो गाडीने मलकापूर गाठले. दिवसभर काम आटोपून
परत येताना सायंकाळी सात वाजता सिकंदराबाद येथे जाणाऱ्या सुपरफास्ट रेल्वे गाडीमध्ये मलकापूर येथून बसलो.
21 डब्यांची ही ट्रेन. मात्र, जनरल डबे केवळ दोनच, एक डबा समोर इंजिनला लागून तर दुसरा डब्बा सर्वात पाठीमागे, माझे जनरल तिकीट असल्यामुळे इंजिनला लागून असलेल्या डब्यामध्ये बसण्याचे ठरवून ट्रेन आल्यानंतर लगेच ट्रेनमध्ये बसलो.
लांब पडल्याच्या गाड्यांमध्ये जनरल डब्यामध्ये बसायचे म्हणजे तारेवरची कसरत असते.
मी ज्या डब्यामध्ये बसलो तेथे पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती, एवढी गर्दी होती. तासा दीड तासाचा प्रवास असल्यामुळे मला गर्दीचं काही विशेष त्रास वाटला नाही. थोड्यावेळात मला जागा सुद्धा मिळाली.
जनरल डब्यात ज्या कंपार्टमध्ये मी बसलो होतो त्या ठिकाणी पालावरचं जीवन जगणारं बिहार किंवा उत्तर प्रदेशातील वाटाव असं हिंदी भाषिक कुटुंब आपलं बिऱ्हाड घेऊन प्रवास करत होतं. बऱ्याच दूरवरून ते प्रवास करून आलेलं वाटत होतं, त्यांना अकोल्याला उतरायचं होतं. मात्र, मलकापूर पासूनच त्यांची उतरण्याची धावपळ सुरू होती. सोबत बरच मोठ सामान होतं, वीस पंचवीस गाठोडे, बॅगा, तीन-चार लहान मुले, मुलांची आई, आणि त्या कुटुंबाची कुटुंबप्रमुख वाटणारी साधारणतः 50 55 वर्षीय महिला.
त्या कुटुंबप्रमुख असणाऱ्या महिलेवरच हा *प्रवासातील अनुभव* मी लिहित आहे.
मी मलकापुरातून बसल्यापासूनच त्या महिलेने ने सर्व गाठोडे ट्रेनच्या दरवाजासमोर जमविण्यास सुरुवात केली. प्रचंड गर्दी असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी असलेले गाठोडे एकत्र करण्यास तिला प्रचंड त्रास सोसावा लागला. दरम्यान, एका कप्प्यात बसून असलेले लहान लहान मुले गेट जवळ उभी असणाऱ्या त्या महिलेकडे येत होते. ती मुले जवळ आले की, तिथेच बसा, इकडे येऊ नका , असे तिच्या बोली भाषेत ती मुलांना रागवायची, दहा पंधरा मिनिटे झाले की मुले पुन्हा त्या आपल्या आजीकडे जात असत. आजी नातवंडांचा हा खेळ पाहून आजूबाजूचे प्रवासीही वैतागून गेले होते. जणू कधी अकोला स्थानक येते, आणि कधी आपण खाली उतरतो, याची आस त्या महिलेला मलकापुरापासूनच लागून होती. शेगाव ओलांडल्यानंतर तिचा त्रागा आणखी वाढला. आपल एवढ मोठ सामान प्लॅटफॉर्मवर दोन- तीन मिनिटे थांबणाऱ्या ट्रेन मधून बाहेर कसं काढावं याची चिंता तिला लागून होती. प्रचंड गर्दी असल्यामुळे इतर प्रवासी उतरून जातील. मात्र, आपले सामान काढणे होईल का ? या विचाराने तिला भांडावून सोडले होते.
अकोला स्टेशनच्या जवळ गाडी आल्यानंतर तिच्या हृदयाचे ठोके जणू काही आणखीनच वाढले होते.
मुळातच गावोगावी भटकंती करून आपला नवरा, मुले, सुना, आणि नातू चिल्या पिल्यांसह भटकंती करून जीवन जगणारे हे कुटुंब.
असे अनुभव त्यांना अनेक वेळा आले असतील.
कारण रिझर्वेशन करून ट्रेनने प्रवास करणं, याबाबतचे स्वप्न देखील त्यांना पडू शकत नाही. कारण, हातावरचं जीवन असणारे हे लोक कसेबसे पोटापाण्यापुरते कमवत असतात. त्यामुळे रिझर्वेशन चे तिकीट काढणे त्यांच्या अवाक्यपलीकडचे आहे.
जनरल डब्यातून असाच प्रवास करून या गावावरून त्या गावावर जात मिळेल ते काम करून ऊदरनिर्वाह करणे हे त्यांचे नित्याचेच बनलेले असल्यामुळे संघर्ष करण्याची जिद्द त्या महिलेच्या व्यक्तिमत्वावरून दिसून येत होती.
अकोला रेल्वे स्थानकावर गाडी थांबल्यानंतर लोक पटापटा दरवाजा जवळ जाऊन खाली उतरत होते. यावेळी त्या महिलेने एकदमच किंचाळण्यास सुरुवात केली. पटापट कुटुंबातील सदस्यांना, नातवांना खाली उतरवले. आणि भराभरा लुगड्यात बांधून असलेले सामानाचे मोठमोठे गाठोडे खाली देण्यास सुरुवात केली. दरम्यान प्रवाशांनाही उतरण्याची घाई असल्यामुळे येथे एकच कल्लोळ माजला होता.
दोन-चार मिनिटेच ट्रेन थांबणार असल्यामुळे अंगात एखादी शक्ती संचारल्या सारखीत्या महिलेची परिस्थिती झाली होती.
शेवटी भराभरा तिने आपले सामान खाली टाकले. गाडी निघणार एवढ्यात शेवटचे गाठोडे तिने खाली टाकले आणि स्वतः खाली उतरली.
तिची सर्व घालमेल मी डोळ्यांनी अनुभवत होतो. तिच्या वाटेत अडथळा नको म्हणून मी पलीकडल्या गेटने खाली उतरलो, आणि तिची सर्व धावपळ पाहत होतो.
हे सर्व चित्र पाहून माझा कंठ दाटून आला, आयुष्यात माणसाला किती यातना सहन कराव्या लागतात, याचे लाईव्ह चित्रण मी आज डोळ्याने बघितले होते.
रेल्वेतील सहप्रवासी रेल्वेतून खाली उतरले आणि आपापल्या मार्गाने मार्गस्थ झाले. मात्र, मी तेथे दहा मिनिटे स्तब्ध राहून भटकंती करत जीवन जगणाऱ्या त्या कुटुंबाचे काही क्षण डोळ्यात साठवले.
... काही क्षणात गाडी बडनेरा कडे मार्गस्थ झाली.
मी अमरावती पुणे गाडीने वाशिम ला येणार होतो , आणि गाडीला अर्धा तास वेळ होता त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांचे एकूणच चित्रण मी डोळ्यात साठविले.
माणसाला जीवन जगताना किती कष्ट सोसावे लागतात, याचे आणखी नवे उदाहरण मी आजच्या या प्रवासात अनुभवले.
*या प्रवासातील अनुभवातून मला रेल्वे विभागाला एक संदेश द्यायचा आहे तो म्हणजे,*
लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये जे लोक रिझर्वेशन करून प्रवास करू शकत नाहीत. किंवा रेल्वे रिझर्वेशन करणे ज्यांना शक्य होत नाही. अशा प्रवाशांसाठी ट्रेनमध्ये डब्यांची संख्या जरूर वाढवावी.
21 डब्याच्या ट्रेनमध्ये केवळ दोनच डबे जनरलचे ठेवले जात असतील तर हा या देशातील गोरगरिबांवर घोर अन्याय आहे असे मला वाटते.
वीस डब्यांच्या ट्रेनमध्ये किमान सात ते आठ डबे जनरल प्रवाशांसाठी ठेवले तर प्रवाशांना कोंबल्याप्रमाणे प्रवास करण्याची वेळ येणार नाही.
( चला तर अनुभवातील हे सदर लिहिता लिहिता माझा आजचा प्रवास पूर्ण होत आहे. वाशिम स्टेशनवर पोहोचतोय...
शुभ रात्री...)
( प्रवासातील अनुभव टिपत असताना मोबाईल मध्ये फोटो काढण्याचे राहून गेले...
त्यामुळे हा अनुभव वाचतांना आपणास संबंधित फोटोची कमतरता नक्कीच भासेल. )
( या प्रवास वर्णनासोबत जोडलेला फोटो ओरिजनल नाही. हा फोटो ए आय निर्मित फोटो आहे. )
( टिप : मी दैनंदिन कामानिमित्त दररोज कुठेतरी प्रवास करत असतो. प्रवासादरम्यान अनेक अनुभव मला येत असतात. यातील काही निवडक अनुभव शेअर करण्यासाठी मी "प्रवासातील अनुभव" हे सदर सोशल मीडियावर सुरू केले आहे. या सदराचा 7 वा भाग लिहिल्यानंतर पाच-सहा महिन्यांपासून एकही भाग मी लिहिला नव्हता. दैनंदिन कामाचा ताण किंवा आळसपणा याला कारणीभूत आहे. मात्र, माझे हे सदर वाचणाऱ्या अनेक वाचकांनी मला आपण हे लिहिणे का थांबविले, असे अनेक वेळा प्रश्न विचारले होते. आपण छान लिहिता, लिहित रहा, आम्ही वाचण्यास आतुर असतो, अशा अनेक प्रश्नांमुळे मी आजच्या या भागापासून नियमित लिहिण्यास सुरुवात करत आहे . आजचा हा आठवा भाग आहे. हा अनुभव आपणास कसा वाटला हे आपल्या कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. )
✍️ गजानन धामणे
मुक्त पत्रकार, वाशिम मो. 9881204538

संसाधनाच्या तुलनेत 65 टक्के लोकसंख्या अतिरिक्त आहे.... त्यामुळे किती जरी डब्बे वाढवले तरी परिस्थिती सुधारणार नाही.... लेख आवडला... मलकापूर अकोला प्रवासतील प्रसंग उभा राहिला.
ReplyDeletePost a Comment