प्रवासातील अनुभव...
( भाग : 07 )

मंगळवार दि 6 ऑगस्ट 2024 रोजीचा अनुभव...
... त्या सर्जा राजाच्या खिल्लारी बैलजोडीने वेधले प्रवाशांचे लक्ष!
👉 आज मला दारव्हाल्या जायचे होते. पाण्या - पावसाचे दिवस असल्यामुळे बसनेच प्रवास करायचा असे ठरवून सकाळी दहा वाजता रिसोड - चंद्रपूर गाडीने मी वाशिम वरून दारव्हाकडे मार्गस्थ झालो. एस टी महामंडळाची बस आणि एखादी सीट रिकामी दिसेल. असे चित्र क्वचितच पाहायला मिळते. अर्थातच कुठलीही गाडी गर्दीने हाउसफुलच असते. रिसोड वरून आलेली गाडी वाशिम मध्ये बरीच रिकामी झाल्यामुळे मला बसमध्ये समोरच्या सीटवर जागा मिळाली. दरम्यान तासाभरात मंगरूळपीर आले. काही प्रवासी उतरले तर काही प्रवासी बसमध्ये चढले. दरम्यान एक साधारणतः 60 वर्षीय आजीबाई गाडीत चढल्या. त्यांच्यासोबत आपल्या सामानासह भली मोठी आणि साज शृंगाराने सजलेली "जणू काही नजर लागेल इतकी सुबक " आणि सुंदर "बैलजोडी" ची मूर्ती घेऊन त्या आजीबाई एसटीमध्ये चढल्या. गाडीमध्ये आधीच गर्दी. आणि त्यात मातीने बनवलेल्या या बैल जोडीला जराही धक्का लागला तर तुटू शकेल अशी शक्यता. मात्र, अशाही परिस्थितीत त्या आजीबाईने एसटीमध्ये चढून जागा मिळवली. त्यांच्याजवळ असलेली बैल जोडी आजूबाजूच्या प्रवाशांनी जवळ घेऊन सुरक्षित जागेत ठेवली. प्रवासी भरल्यानंतर बस मंगरूळपीर बस स्थानकाच्या बाहेर कारंजा कडे मार्गस्थ झाली. दरम्यान, ज्या ज्या प्रवाशांची नजर त्या बैलजोडीवर पडली. त्या त्या प्रवाशांनी आजीबाईला कुठून आणली ही बैल जोडी? खूपच सुंदर आहे. किती रुपयाला आणली? आम्हालाही पाहिजे होती कुठे मिळेल? हीच बैल जोडी आम्हाला देता का? असे प्रश्न त्या आजीबाईला प्रवाशांनी विचारणे सुरू केले. तसेच अर्ध्या अधिक प्रवाशांनी त्या सुंदर डौलदार सर्जा राजाच्या बैल जोडीचे सेल्फी अनेकांनी आपल्या मोबाईल मध्ये घेतले. आपण आणलेल्या बैलजोडीचे एवढे कौतुक होत असल्याचे पाहून आजीबाई ही आनंदून गेल्या. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदच सर्व काही सांगत होता.
एवढे सगळे माझ्या डोळ्यासमोर घडत असताना माझ्यातील पत्रकार शांत कसा राहील! आजीबाई बैल जोडी घेऊन एसटीमध्ये चढल्यापासूनच मला प्रवासातील अनुभवाची स्टोरी मिळाल्याची जाणीव झाली होती. चालत्या गाडीमध्ये आणि ऐन गर्दीत आजीबाईचा इंटरव्यू कसा घ्यायचा. म्हणून मी मंगरूळपीर पासून कारंजा पर्यंत शांत होतो. योगायोगाने कारंजा बस स्थानकावर बस थांबली आणि कंडक्टर म्हणाले की, आता पंधरा मिनिटे येथे बस थांबणार आहे. कंडक्टरचे हे शब्द म्हणजे माझ्यासाठी पर्वणीच होती. मला आजीबाई ची मुलाखत घेण्यासाठी हा वेळ पुरेसा होता. माझ्या शेजारी एक तलाठी मॅडम बसल्या होत्या. त्यांनाही ती बैलजोडी खूपच आवडली होती. म्हणून त्यांनीही त्यांच्या मोबाईल मध्ये त्या बैलजोडीचे सेल्फी घेतले. बस थांबणार असल्यामुळे प्रवासी खाली उतरले होते. कशाबशा उभे राहून आलेल्या आजीबाईंना आता जागा मिळाली होती. आता त्यांनी एक सीट बैलजोडी साठी राखीव ठेवली आणि साईडला त्या बसल्या. यावेळी मी त्यांना माझा परिचय करून देत मला हवे असलेले फोटो मोबाईल मध्ये काढले. त्यांना सर्व माहिती विचारली. त्या आजीबाई म्हणजे मंगरूळपीर येथील रहिवासी असलेल्या नंदाबाई रामदास ढंगारे ह्या होत. त्यांचा मुलगा प्रशांत ढंगारे हा यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तहसील मध्ये लिपिक आहे. प्रशांत ढंगारे यांचा मुलगा म्हणजेच आजीबाईचा नातू शिवांश हा चार वर्षाचा असून त्याला बैल जोडी चे विशेष आकर्षण आहे. आपल्याला बैल जोडी पाहिजे असल्याचा हट्ट त्याने आजीबाई सोबत केला होता. नातवाने पुरवलेला हट्ट आजीबाई पूर्ण करणारच याबद्दल दुमत नव्हते. म्हणून आजीबाईंनी ( नंदाबाई ढंगारे ) यांनी अधिक माहिती घेऊन सर्वाधिक सुंदर बैलजोडी कुठे मिळते याची माहिती आधीच घेऊन ठेवली होती. मिळालेल्या माहितीवरून त्यांनी कारंजा तालुक्यातील भिलखेडा या गावी जाऊन सदर बैल जोडी आठशे रुपयात विकत आणली. भिल डोंगर येथून बैल जोडी घेऊन त्या मंगरूळपीर आल्या आणि मंगरूळपीर वरून पुन्हा यवतमाळ जाणाऱ्या बसने मारेगाव येथे आपल्या मुलाकडे म्हणजेच नातवाला बैल जोडी देण्यासाठी निघाल्या. आजी आणि नातवाचे नाते हे जगातील सर्वाधिक सुंदर असे नाते आहे. लहान मुलांचा सांभाळ करण्यामध्ये आजीबाईचा सर्वात महत्त्वाचा वाटा असतो. माझी आई सुद्धा माझ्या मुलांना जिवापाड सांभाळत असते. त्यामुळेच आपल्या नातवाचा कुठलाही हट्ट पुरविण्यासाठी आजीबाई तत्पर असतात. मग याच आजीबाई यापेक्षा वेगळ्या कशा असू शकतील. आजीबाईंनी सुद्धा नातवाचा हट्ट पुरवण्यासाठी डौलदार अशी बैलजोडी खरेदी केली. कृषी संस्कृती मधला सर्वाधिक लोकप्रिय असणारा सण म्हणजे बैलपोळा होय. येत्या 2 सप्टेंबर रोजी पोळा हा सण सर्वत्र साजरा केला जाणार आहे. आतापासूनच बैलपोळ्याची चाहूल शेतकऱ्यांना लागली आहे. पोळ्याला प्रत्येक घरात बैलाच्या मूर्तीची पूजा केली जाते. दरम्यान प्रत्येक घरातील मुलांना बैलजोडीचे विशेष आकर्षण असते. प्रत्येक घरामध्ये बैल जोडी खरेदी केली जाते. आज घडीला वाढत्या तंत्रज्ञानामुळे पारंपारिक शेती ऐवजी यांत्रिक शेती केली जात आहे. त्यामुळे बैल जोडी वापरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या नगण्य आहे. बैलपोळ्यात सुद्धा बैलांची संख्या नगण्य दिसत आहे. कुठे कुठे तर ट्रॅक्टरचाही पोळा भरताना आपल्याला दिसून येतो. अशा या बैलपोळ्याच्या पर्वात आजीबाईंनी घेतलेल्या बैल जोडीने एसटी मधील प्रवाशांसाठी बराच भाव खाल्ला आणि बैलपोळ्याची चुणूक लावून गेला. कारण जाऊन पुढे दारव्हा पर्यंत आम्ही आजीबाईंची बोलत बोलत गेलो. पुढे दारव्हा आल्यानंतर मी बसच्या खाली उतरलो आणि माझ्या दैनंदिन कामात व्यस्त झालो.
खिल्लारी बैलांची ती जोडी इतकी सुंदर होती की ते सुंदर चित्र आताही माझ्या डोळ्यासमोर तरळत आहे. ही स्टोरी वाचण्याबरोबरच आपल्याला त्या बैल जोडीचे छायाचित्र ही पाहण्यास मिळणार आहे. ती बैलजोडी आपल्याला कशी वाटते. हे सुद्धा आपण कमेंटच्या माध्यमातून कळवावे. कृषी संस्कृती जिवंत राहण्यासाठी बैलांचे संगोपन वाढविण्याची गरज वाटत आहे. भविष्यात जिवंत बैलांऐवजी मूर्तीतील बैलालाच पाहण्याची वेळ येणाऱ्या पिढीवर येऊ नये म्हणजे झाले.
( टिप : मी दैनंदिन कामानिमित्त दररोज कुठेतरी प्रवास करत असतो. प्रवासादरम्यान अनेक अनुभव मला येत असतात. यातील काही निवडक अनुभव शेअर करण्यासाठी मी "प्रवासातील अनुभव" हे सदर सोशल मीडियावर सुरू केले आहे. आजचा हा सातवा भाग आहे. हा अनुभव आपणास कसा वाटला हे आपल्या कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. )
✍️ गजानन धामणे
मुक्त पत्रकार, वाशिम मो. 9881204538
Post a Comment