प्रवासातील अनुभव भाग-6

 प्रवासातील अनुभव...


( भाग : 6 ) 



सोमवार दिनांक 22 जुलै 2024  चा अनुभव...


शिर्षक : मुला बाळांसाठी हजारो किलोमीटर येऊन तो विकतोय ' बूढ्ढी के बाल '  


आज सोमवार दि.  22 जुलै 2024 रोजी मी दैनंदिन कामानिमित्त मालेगाव, जऊळका रेल्वे किन्हीराजा आणि वाशिम असा प्रवास निश्चित करून सकाळी घराबाहेर पडलो. दरम्यान, जऊळका रेल्वे येथील काम आटोपून दुपारी किन्हीराजा पोचलो. तिथल्या काही भेटी झाल्यानंतर आमचे किन्हीराजा येथील पत्रकार मित्र भीमराव पवार आणि तेथील सामाजिक कार्यकर्ते टेलर ठाकरे साहेब यांच्याशी चर्चा केल्यानंतर कार्ली, तोरणाळा मार्गे वाशिम कडे निघालो. किन्हीराजा येथून साधारणतः साडेपाच वाजता निघाल्यानंतर तेथे लिफ्ट ची वाट पाहत असलेल्या बोराळा येथील एका व्यक्तीला गाडीवर घेऊन मार्गक्रमण सुरू केले.  हा मार्ग खड्ड्यांचा असल्यामुळे खड्डे चुकवून बोलत बोलत आम्ही पुढे निघालो. दरम्यान थोड्या वेळात बोराळा फाटा आल्यानंतर त्या व्यक्तीला उतरवून दिले आणि पुढे निघालो.  त्यापुढे कार्ली या गावातील काम आटोपून वाशिम शहर जवळ करण्याच्या उद्देशाने मार्गक्रमण सुरू केले.  पाऊस येण्याचे वातावरण आणि दिवस अस्ताला निघाल्यामुळे आणि पुढे रस्ताही चांगला असल्याने बऱ्यापैकी स्पीडने गाडी चालवत असताना...


        तोरणाळा फाट्यावर एक युवक वाशिम ला जाण्यासाठी एखाद्या मोटरसायकलची आतुरतेने वाट पाहत असल्याचे माझ्या निदर्शनास आले. त्याने,  मला येऊ द्या! असे म्हणण्याच्या आतच मी गाडी थांबवली.  यावेळी त्याने साब, जहा तक आप जा रहे हो,  वहातक मुझे आने दो!  मुझे वाशिम जाना है! असे म्हणत केविलवाणी विनंती केली.  मदत करणे हा माझा गुणधर्मच असल्यामुळे मी त्याला "बैठो" असे म्हणत गाडीवर बसवून गाडी सुरू केली.  आणि नेहमीप्रमाणे अर्थातच माझ्यातील पत्रकाराने त्याची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्याला बोलते केले. 


     यावेळी तोरणाळा फाटा ते अकोला नाका वाशिम दरम्यान साधारणतः अर्ध्या तासात त्याने त्याची सर्व स्टोरी सांगितली.  आणि पोटासाठी माणसाला किती कष्ट घ्यावे लागतात याची प्रचिती मला पुन्हा आली.  तो एक उदाहरण असला तरी त्याच्यासारख्या मिळेल ते काम करणाऱ्या युवकांच्या जीवनाची ही कहाणी म्हटल्यास वावगे ठरू नये. 

म्हणून त्याच्याबाबत थोडे विस्ताराने येथे मांडत आहे...


.... मी ज्याला मोटरसायकलवर लिफ्ट दिली तो 27 वर्षीय युवक मूळचा जिल्हा कानपूर उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे. तो विवाहित असून त्याला आई,  वडील,  पत्नी,  सह छोट्या छोट्या दोन मुली आहेत.  तो म्हणतोय की, आमच्या इकडे मिळणाऱ्या कामाच्या मजुरी पेक्षा महाराष्ट्रात थोडी जास्त मजुरी मिळत असल्याने मी मुळाबाळांना सोडून येथे रोजगारासाठी आलो आहे. मी वाशिम येथील एका " बूढ्ढी  का बाल " बनविणाऱ्या लघु कारखानदाराकडे मजुरीने  बूढ्ढी का बाल विकण्याचे काम करतो. मला 350 रुपये रोजमजुरी मिळते.  सोबत वीस तीस रुपये गाव खेड्यावर येण्या-जाण्याचे मिळतात. आम्ही दहा पंधरा मुले त्या छोट्या कारखानदाराकडे रोज मजुरीने विविध गावात जाऊन 

 बूढ्ढी  का बाल विकतो.  आम्ही पाच जणांनी एक सामूहिक रूम केली असून तेथे आम्ही राहतो. दर तीन किंवा चार महिन्यातून मी मजुरीतून मिळालेले पैसे घेऊन माझ्या गावी कानपूर येथे जात असतो.  पंधरा-वीस दिवस तेथे राहून पुन्हा इकडे येतो. 

  

 हे सगळं तो सहजतेने सांगत होता.  तसतसे आम्हीही वाशिमच्या जवळ जवळ पोहोचत होतो.  तो हे सगळं सांगत असताना माणसाला पोटासाठी किती कष्ट घ्यावे लागतात याची प्रचिती मला येत होती. शेवटी मी त्याला आजची दिनचर्या विचारली असता तो म्हणाला की,  आज मी सकाळी 9.10 वाजता वाशिम च्या सुंदर वाटिका भागातून एका पीव्हीसी पाईपला  बूढ्ढी का बाल चे पॅकेट लटकवून विक्रीसाठी निघालो.  विक्री करत करत कोंडाळा झामरे, सुराळा,  तोरणाळा असे काही गावे पायदळच केलीत.  मी आणलेल्या मालातून 650 रुपये आले आहेत.  यातील 350 रुपये मजुरी आणि वीस तीस रुपये येण्या-जाण्यासाठी मिळणार आहेत.  अशाप्रकारे आम्ही दररोज वेगवेगळ्या गावात जाऊन बूढ्ढी

का बाल विकत असतो.  त्याच्या तोंडून हे सर्व ऐकत असताना आम्ही काटा चौफुली येथे पोहोचलो.  शेवटी जास्त काही न बोलता मी त्याला म्हणालो की मी पत्रकार आहे.  तुझ्या या जीवन संघर्षाबद्दल मी लिहिणार आहे!  एवढेच त्याला सांगितलं.  शेवटी अकोला नाका येथे आम्ही सोबत गुपचूप खाल्ले.  यानंतर तो जुन्या शहरातील आपल्या खोलीकडे रवाना झाला. 

 या माणसाने मला लिफ्ट दिली नसती तर पाण्या पावसात मला किती अडचण आली असती. असाच काहीसा विचार करत तो  आपल्या रूम कडे निघून गेला...


 मात्र तो गेल्यानंतर त्याची स्टोरी ऐकून माझ्या मनात प्रश्नांचे काहूर निर्माण झाले होते. हजार किलोमीटर दूर महाराष्ट्रात येऊन चिल्या पिल्यांना घरी ठेवून तो येथे आलाय खरे,  मात्र, महिन्याकाठी उनेपुरे आठ दहा हजारच त्याला मिळत असतील  आणि शेवटी त्यातही खाण्यापिण्याचा खर्च आणि राहण्याचा खर्च वगळला तर त्याच्या हातात महिन्याकाठी किती रुपये शिल्लक राहत असतील.  शेवटी घरी जाताना आई-वडील पत्नी मुलाबाळांच्या वाट्याला काय मिळत असेल.  हा विचार करत असताना माझ्या डोक्यात झिनझिन्या यायला लागल्या आणि बेरोजगारीचे भिषण वास्तव माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले.  एक मात्र नक्की की, बेरोजगारीचा प्रश्न भारतात किती गंभीर वळणावर आला आहे. एकीकडे त्याच्या इथल्या येण्याने उत्तर प्रदेशात त्याच्यासारख्या तरुणांना योग्य प्रमाणात रोजगार मिळत नाहीये.  म्हणून बाहेर राज्यात जाऊन लोक रोजगार शोधताहेत हे दिसून येते.  तर दुसरीकडे आपल्या महाराष्ट्रातही बेरोजगारांची संख्या पाहता पुरेशे उद्योग उभारण्याची नितांत गरज असल्याचे दिसून येत आहे... 


( टीप : मी दररोज कामाच्या निमित्तानेप्रवास करत असतो. दरम्यान येणारे अनुभव शब्दबद्ध करून सोशल मीडियाच्या आधाराने  जनमानसात व्यक्त होण्यासाठी " प्रवासातील अनुभव"  हे सदर मी  केले आहे.  हा अनुभव आपल्याला कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. ) 


✍️ गजानन धामणे 

मुक्त पत्रकार, वाशिम 

9881204538

Post a Comment

Previous Post Next Post