प्रवासातील अनुभव : भाग 5

प्रवासातील अनुभव 



गुरुवार दि. 18 जुलै 2024 चा अनुभव...


( भाग - 5 ) 


... अन् तिने हंबरडा फोडला. 


 गुरुवारी दि. 18 जुलै 2024  रोजी दैनंदिन कामानिमित्त मी वाशिम वरून  पुसद कडे मोटरसायकलने जात होतो. पाण्यापावसाचे दिवस असल्यामुळे सायंकाळी लवकर परतण्यासाठी सकाळी सात वाजताच मी मोटरसायकल ने निघालो होतो.  मारवाडी फाटा क्रॉस केल्यानंतर तेथून काही अंतरावर असलेल्या घाटामध्ये घनदाट जंगलात सर्वत्र हिरवाईने नटलेल्या  निसर्गाचे विहंगम दृश्य टिपण्यासाठी मोटर सायकल थांबवून मी मोबाईलच्या कॅमेऱ्यात काही शूटिंग घेतली आणि सेल्फी घेतले. 


 दरम्यान तेथून दोन मोटर सायकल क्रॉस झाल्या. एका मोटरसायकलवर तीन युवक होते. तर दुसऱ्या मोटर सायकलवर एक महिला आणि एक पुरुष गाडी चालवत होता. ते थोडे समोर निघाल्यानंतर मीही त्यांच्या पाठोपाठ मोटरसायकलने प्रवास सुरू केला. थोडे पुढे गेल्यानंतर हिवळणी फाट्यापासून साधारणतः 100 मीटर अंतरावर पुढे जात असताना  ट्रिपल सीट असणाऱ्या मोटरसायकल वरील साधारणतः वीस वर्षे वय असणारा मुलगा अचानक गाडीवरून खाली कोसळला. त्यांची गाडी बऱ्यापैकी स्पीड मध्ये असल्यामुळे खाली पडलेला मुलगा साधारणतः 50 फूट गोल गोल फिरत रस्त्यावर घरंगळत गेला. आणि बेशुद्ध पडला. 

 या मोटरसायकलच्या मागेच माझी मोटर सायकल असल्यामुळे 

 मी डोळ्याने हे दृश्य पाहिले आणि माझ्या अंगाचे पाणी पाणी झाले.

दरम्यान काय करावं काही सुचलंच नाही. दरम्यान मी गाडी थांबवली आणि त्याच्या जवळ गेलो. 

 दरम्यान गाडीवरून पडल्यानंतर त्या मोटरसायकल वरील दोन युवक तसेच त्यांच्या समोर असलेली महिला आणि आणि ती गाडी चालवणारा माणूसही त्या मुलाजवळ आले आणि  प्रचंड आक्रोश करू लागले. 

तो मुलगा बेशुद्ध पडल्यामुळे कुणाला काहीही सूचना. मुलाची दातखिळी बसली होती . त्या मुलाला बोलतं करेपर्यंत  मी तिथून जवळच असलेल्या हिवळणी फाट्यावरील हॉटेल वरून पाण्याची बॉटल आणायला गेलो आणि तेथून दोघा तिघांना अपघाताची कल्पना देऊन त्यांनाही सोबत घेऊन आलो. तोपर्यंत तो मुलगा बेशुद्धेतून  बाहेर आला होता. त्याला पाणी दिले. आणि माझ्यासह तेथील सर्वांनीच काही होत नाही, काही झाले नाही,  कुठे लागले नाही,  रिलॅक्स हो. असे म्हणत त्याला धीर दिला आणि त्याला रस्त्याच्या कडेला उभे केले. तो प्रचंड हादरलेला होता,  त्याचे शरीर थरथर कापत होते. त्याच्या अंगावरील शर्ट काढले असता 50 फूट घासत गेल्यामुळे अंगावरील दोन-तीन ठिकाणचे चामडे निघून गेले होते. त्याला प्रचंड मुक्का मारही लागला होता. कदाचित  शरीराचा कुठलाही भाग फॅक्चर झालेला असू शकेल अशी ती सगळी परिस्थिती होती.  दरम्यान दुसऱ्या गाडीवर असलेली महिला ही प्रचंड आक्रोश करत होती .  तिचे रडणे पाहून  त्या मुलाची आई असल्याचे माझ्या लक्षात आले. 

 थोडा रिलॅक्स झाल्यानंतर पुन्हा त्याला मोटरसायकल वर बसून पुसद येथे दवाखान्यात नेण्यासाठी दोन्हीही गाड्या मार्गस्थ झाल्या. मी त्यांच्या मागे निघालो. मात्र,   थोडेच पुढे गेल्यानंतर त्या मुलाला प्रचंड चक्कर यायला लागली.  मोटरसायकल वर बसणेही त्याला असह्य झाले. पुन्हा त्याला मोटरसायकलच्या खाली उतरविले. दरम्यान तो रस्त्यावर लोळण घेत होता,  प्रचंड विव्हळत होता,  त्याला प्रचंड वेदना होत होत्या. 

 त्यावेळी अधिक माहिती घेतल्यानंतर कळाले की तो मारवाडी या गावातील रहिवासी आहे. त्याला आधल्या दिवशी काही जणांनी मारहाण केली होती. म्हणूनच त्याला दवाखान्यात घेऊन जात होते. अशातच त्याला चक्कर येऊन सदर घटना घडली. आदल्या दिवशीचा मार आणि चालत्या मोटरसायकल वरून पडल्यामुळे त्याला किती वेदना होत असतील याची जाणीव मला झाली होती. आता त्याला मोटार सायकलवर नेणे अशक्य असल्यामुळे 108 ला कॉल करून ॲम्बुलन्स मागविण्याबाबत मी त्या मुलाला बोललो.  यावेळी गाडी चालवणाऱ्या युवकाने 108 नंबर वर कॉल करून  घडलेली हकीकत सांगितली आणि  ॲम्बुलन्स ला प्रचारण केले. साईडला बसवून त्याला आम्ही थोडा धीर देत होतो. दरम्यान रस्त्याने येजा करणाऱ्या बऱ्याच मोटर सायकल वाले तेथे थांबले. 

 यावेळी त्या महिलेचा आक्रोश काही थांबत नव्हता. मेल्यांनी  माझ्या मुलाला विनाकारण मारले. जीव गेला असता तर काय केले असते.  अशाप्रकारे बोलत  ती महिला आक्रोश करत होती. 

   मी अत्यंत संवेदनशील मनाचा असल्यामुळे हे सारे दृश्य पाहून मलाही प्रचंड वेदना होत होत्या. 

  शेवटी आता ॲम्बुलन्स येणार होती आणि त्याला दवाखान्यात पोहोचविणार होती. दरम्यान बरेच बरेच प्रवासी तेथे जमलेले असल्यामुळे ॲम्बुलन्स येणे पर्यंत वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. 

 दरम्यान मला पुढे पुसद आणि शेंबाळपिंपरी येथे जाण्याचे असल्यामुळे मी तेथून मार्गस्थ झालो. मात्र,  ती घटना काही माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हती. अजूनही गेली नाही.  माझ्या मनात एकच विचार, ॲम्बुलन्स कधी आली असेल, त्या मुलावर योग्य उपचार मिळाले असतील की नाही. या विचारातच मी माझे काम आटोपून सायंकाळी घराकडे परतलो. मी परत येताना ज्या ठिकाणी तो मुलगा पडला होता तेथे मोटरसायकल थांबून मनाशीच बोलत होतो. 

 हिवळणी फाट्यावरील ज्या हॉटेल वरून बिसलरी घेतली होती त्याला वीस रुपये देण्यासाठी गेलो असता त्यांनीही ते घेतले नाहीत. मी या घटनेबाबत  थोडीशी चौकशी करून  तेथून वाशिम कडे परतीच्या प्रवासाला निघालो...

 अजूनही ती घटना आणि त्या आईचा आक्रोश डोळ्यासमोर आला की माझ्या डोळ्यात पाणी तरळत आहे. 


( टिप : मी दैनंदिन कामानिमित्त दररोज मोटर सायकल किंवा बसणे प्रवास करत असतो. दरम्यान अनेक बरे वाईट अनुभव येत असतात. हे अनुभव प्रत्यक्ष शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न मी "प्रवासातील अनुभव" या सदराखाली लिहीत असतो. अनुभव कसा वाटला हे आपल्या कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. )


✍️ @ गजानन धामणे 

मुक्त पत्रकार, वाशीम 

9881204538


Post a Comment

Previous Post Next Post