प्रवासातील अनुभव*
( भाग - 3 )
'तिकीट फ्री' मात्र, सन्मान काही मिळेना...!
आज रविवारी ( दि. 23 जून 2024 ) दुपारी 4.30 वाजता मी आणि आमच्या सौ. मालतीबाई एस टी बस ने वाशीम - रिसोड गाडीने रिसोड येथे विवाहास जात होतो. माझे चळवळीत सहकारी, मित्र आणि पत्रकार गजानन खंदारे यांच्या मुलीचे लग्न होते. पाऊस पाण्याचे दिवस असल्यामुळे आम्ही एसटी बसने जाण्याचा निर्णय घेतला.
आपल्याला माहित आहेच की, आजकाल कुठल्याही मार्गावर कुठल्याही बसने प्रवास करा. बस हाउसफुलच दिसेल. काही बस मध्ये तर पाय ठेवायला सुद्धा जागा नसते, अशी परिस्थिती मी अनेक वेळा अनुभवत असतो.
वाशिम - रिसोड ह्या मार्गावर जाणाऱ्यांची संख्या प्रचंड असल्यामुळे आणि त्या तुलनेत एसटी बस ची संख्या कमी असल्यामुळे रिसोड कडे जाणारी किंवा रिसोड वरून वाशीम कडे येणारी बस हाउसफुलच असते. आम्ही ज्या बस मध्ये बसलो त्यात काही यापेक्षा वेगळी परिस्थिती नव्हती. आम्हाला कसेबसे पाय ठेवण्यापूरती जागा मिळाली. कंडक्टर साहेब तिकीट काढण्यासाठी उभे झाल्यामुळे आमच्या सौ. यांना सीट मिळाली.
आपल्याला माहित असेलच की, 75 वर्षे च्या वर वय झालेल्या प्रत्येक नागरिकाला एसटी बसचा प्रवास मोफत आहे. त्यामुळे या वयाची लोक बहुतांश एसटी बसनेच प्रवास करतात.
ज्येष्ठांना मोफत सवलत असली तरी त्यांना प्रवास करताना नाहकचे टोमणे खावे लागतात. म्हातारे लोक कशाला बरे प्रवास करत असतील, यांच्यापासून कोणाचं काय आडलं असेल, विनाकारण बस मध्ये गर्दी करतात, लवकर उतरतही नाहीत. असे वाक्य नेहमी बस मध्ये प्रवासादरम्यान ऐकायला मिळतात.
आज आम्ही प्रवास करत असलेल्या बसमध्ये सुद्धा काही ज्येष्ठ नागरिक बसलेले होते. आपसूकच वरील वाक्य ही त्यांच्याबद्दल कुजबुजल्या गेले.
हा अनुभव येथेच संपत नाही, या विषयाच्या अनुषंगाने मला नेहमी प्रवासादरम्यान असेच काही अनुभव येत असतात. काही वेळा तर कंडक्टर साहेब सुद्धा कंटाळून ज्येष्ठांना हाडस निडस करताना दिसतात.
ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच इतर शासकीय लाभातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी केलेल्या प्रवासाच्या भाड्याची केवळ 25 टक्के रक्कम ही शासन एस टी महामंडळाला देत असते. व्यवहाराचा विषय केला तर 25% भाड्याच्या रकमेत एसटी महामंडळाचा मेंटेनन्स सुद्धा निघत नाही. मात्र, एसटी महामंडळ हे जनतेसाठी शासकीय सुविधा असल्यामुळे शासनाला नफा किंवा तोटा याचा विचार न करता सवलती द्याव्यात लागतात.
शासन अशा प्रकारे सवलती तर देते परंतु वाढत्या लोकसंख्येचा विचार करून नव्या बसेस आगाराला देत नाही. वाशिम आगार हे जिल्ह्याचे आगार असून सुद्धा इथे केवळ 50 बसेस आहेत. त्या सुद्धा ढणढण झालेल्या आहेत. रिसोड येथील आगाराकडे केवळ 40 बसेस आहेत. या तुटपुंज्या बसेस लांब पल्यावर पाठवायच्या की, गाव खेड्यावर पाठवायच्या की, तालुका मार्गावर पाठवायच्या, या सगळ्या नियोजनात बस ने करणाऱ्या प्रवास प्रवाशांना वेळेवर बस मिळत नाही ही वस्तूस्थिती आहे. ज्या बसेस धावतात त्याच्या मध्ये प्रचंड गर्दी असते.
एखादा अपवाद सोडला तर अनेक दिवसांपासून भंगार बसेसच्या भरोशावर प्रवाशांची वाहतूक सुरू आहे.
शासन योजना तर सुरू करते. परंतु त्याला लागणार असलेले इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करत नाही.
ज्येष्ठांचा आदर केलाच पाहिजे. मोफत प्रवास सवलत देऊन शासन जर ज्येष्ठांचा सन्मान करत असेल तर प्रॅक्टिकली त्यांना प्रवास करताना इतर प्रवाशांचे टोमणे खावे लागतात याचे कारण शोधण्याचा प्रयत्न शासन करणार आहे की नाही? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकीकडे प्रवासी संख्या वाढल्यामुळे बस स्टैंड वर एखाद्या फलाटावर बस लागली की प्रवासी पटापट खिडकीतून रुमाल, बॅगा किंवा तत्सम साहित्य टाकून जागा जिंकून ठेवतात. आणि बस मध्ये शेवटी चढले तरी सुद्धा माझी सीट आहे म्हणून बसण्यासाठी दावा करतात. जे प्रवासी रांगेत लावून प्रथम बस मध्ये चढतात त्यांना सुद्धा जागा मिळत नाही. रुमाल टाकला म्हणून ही माझी जागा, असा अलिखित नियमच तयार झाला आहे. या प्रकारामुळे अनेक वाद-विवाद झाल्याच्या घटना घडत आहेत. मात्र, एसटी महामंडळाने याची कधी दखल घेतलेली दिसत नाही. मुळात एका रांगेत लावून प्रवाशांनी बस मध्ये चढावे आणि प्रथम चढेल त्याला सीट मिळेल या नियमाप्रमाणे बसेस धावल्या तर वादविवाद होणार नाहीत.
मात्र, ह्या बाबी एसटी महामंडळाला शिल्लक वाटत असाव्यात. असो, एखादा ज्येष्ठ व्यक्ती गाडीत उभा असेल तर त्याला आपण जागा दिली पाहिजे. आणि माणसातील माणुसकी जपली पाहिजे. एवढाच संदेश मी या प्रवासवर्णनाच्या माध्यमातून देत आहे. अर्थातच याचे अनुकरण करण्याची जबाबदारी माझी आहेच...
एसटी महामंडळाच्या संदर्भाने अनेक बाबी मांडण्यासारख्या आहेत. पुढील प्रवास वर्णनाच्या माध्यमातून मी त्या बाबी वेळोवेळी मांडण्याचा प्रयत्न करेल. तूर्तास एवढेच...
आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा...
( टिप : दैनंदिन कामाच्या निमित्ताने माझे दररोज वेगवेगळ्या भागात फिरणे असते. दरम्यान आलेले अनुभव शेअर करण्याचे मी ठरवले आहे. लवकरच पुढील अनुभव घेऊन येईल )
✍️ गजानन धामणे
मुक्त पत्रकार, वाशीम
9881204538

Post a Comment