प्रवासातील अनुभव : भाग - 2
( स्वतंत्र : भाग दुसरा )
आजचा अनुभव...
आज शुक्रवारी ( दि. 21 जून 2024 ) मी दैनंदिन कामाच्या निमित्ताने वाशीम वरुन पुसद तालुक्यातील बेलूरा येथे जाण्यासाठी सकाळी 8 वाजताच मोटारसायकल ने पुसद रस्त्याने निघालो. रस्ता टकाटक असल्यामुळे बऱ्यापैकी 60 च्या स्पीडने मी मार्गक्रमण करत असताना फाळेगाव थेट फाट्याजवळ चिंतामणी धाब्यासमोर एक साधारणतः तिशीतल्या युवकाने माझ्या गाडीला हात देऊन गाडीवर येऊ देण्याची विनंती केली. त्याच्या डोक्याला हॉस्पिटलची पट्टी दिसल्यामुळे तो काहीतरी संकटात असल्याचे मला जाणवले आणि मी लगेच गाडी थांबवली.
त्यानंतर जास्त काही न विचारता मी त्याला गाडीवर बसून घेतले. गाडी सुरू केल्यानंतर मी त्याला बोलते केले.
यानंतर त्याने पुढील प्रमाणे आपली आपबीती कथन केली.
माझे नाव राजकुमार आत्माराम सातपुते असून मी रतनवाडी पो. फुलउमरी ता. मानोरा असल्याचे त्याने सांगितले.
तो म्हणाला की, दीड महिन्यापूर्वी मी मुंबईला भायखळा येथे बिगारी कामाला गेलो होतो. अकोल्यातील एक मुलगाही माझ्यासोबत होता. मुंबईतील एका एजंटच्या माध्यमातून मी बिगारी काम सुरू केले होते. सदर काम सुरू केल्यानंतर तेथील ठेकेदाराने मला दररोजच्या कामाची मजुरी दररोज देणार असल्याचे कबूल केले होते. मात्र, ज्यावेळी मी बिगारी काम सुरू केले त्यानंतर ठेकेदाराने दररोज पैसे देण्यास नकार दिला. मला वाटले की जाऊ द्या आज ना उद्या भेटणारचं आहेत. म्हणून मी सतत काम करत गेलो. माझ्यासोबत आलेला अकोल्याचा मुलगा व इतर वेगवेगळ्या भागातून आलेले काही मजूर त्या ठेकेदाराकडे काम करत होते. दीड महिना होऊनही ठेकेदाराने मला छदामही दिला नव्हता. त्यामुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून मी ठेकेदाराला पैसे मागत होतो. मला दीड महिना झाला आहे माझ्याकडे एक रुपया सुद्धा नाही त्यामुळे आतापर्यंतची मजुरी मला द्या असे म्हणत होतो. मात्र ठेकेदाराने मजुरी देण्यास नकार दिला. काल मी ठेकेदाराला मला माझे पैसे आजच्या आज पाहिजेत असे सांगितले असता ठेकेदाराने माझ्यावर हात उचलला. दरम्यान, माझ्या कपाळावर गजाने मारहाण केली. तेव्हा बरीच झटापट झाली. त्या ठेकेदाराचा त्या ठिकाणी मोठा जोड जमाव असल्यामुळे मी हिम्मत असूनही त्याचा प्रतिकार करू शकलो नाही. आणि मी त्याच क्षणी घराकडे येण्याचा निर्णय घेतला. काल रात्री मुंबईवरून नागपूरकडे येणाऱ्या ट्रेनने मी अकोला येथील रेल्वे स्टेशनवर उतरलो. खिशात छदामही नसल्यामुळे आपसुकच तिकीट काढण्याचा प्रश्नच नव्हता. प्रवासादरम्यान टीटी ने मला पकडले आणि तिकिटाची मागणी केली. त्यावेळी मी टीटीला सदर हकीकत सांगितली . टीटीला हे सर्व पटल्यामुळे त्यांनी रेल्वेतच मला जेवणाचा डब्बा मिळवून दिला. सकाळी अकोला येथील रेल्वे स्टेशनवर पोहोचताच पूर्णाकडे जाणाऱ्या ट्रेनने मी वाशिम रेल्वे स्टेशनवर उतरलो. पुसद तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे माझी मावशी राहत असल्यामुळे मावशीकडे जाण्याचा निर्णय मी घेतला आणि वाशिमच्या पुसद नाक्यावरून एका मोटरसायकलवर इथपर्यंत आलो आहे. आता तुम्ही मला अनसिंग पर्यंत आणले आहे. डबडबलेल्या डोळ्यांनी त्याने पटापट ही सर्व हकीकत मला सांगितली. दरम्यान, आम्ही अनसिंग येथील चौफुलीवर पोहोचलो होतो. त्याची सर्व हकीकत ऐकून मी त्याच्या भुकेचा विचार करून त्याला चौफुलीवरील हॉटेलवर नेऊन खिचडी भजे खाऊ घातले. अनसिंग येथून ब्राम्हणगाव ला जाण्याला त्याला ऑटो मिळणार होता. ब्राह्मणगाव ला जाऊन तो मावशी कडून पैसे घेऊन गावाकडे जाणार होता आणि त्या ठेकेदाराच्या विरोधात मानोरा पोलीस स्टेशन येथे तक्रार देणार होता. त्याची सर्व हकीकत ऐकल्यानंतर मी त्याला माझे कार्ड दिले आणि काही अडचण आली तर मला फोन कर असे सांगितले. त्याच्याकडे मावशीकडे जाण्यासाठी काहीच पैसे नव्हते त्यामुळे मी त्याला सत्तर रुपये दिले आणि रवाना केले. तेथून निघताना त्याने चार ते पाच वेळा मागे वळून पाहिले. दरम्यान, कृतज्ञतेचे भाव त्याच्या डोळ्यातून स्पष्टपणे जाणवत होते. तेवढ्यात माझे सहकारी आणि समनक जनता पार्टीचे जिल्हा महासचिव धीरज नायक हे तेथे आले. त्यांनाही मी त्याची ओळख करून दिली.
या घटनेवरून हे लक्षात येते की, आपल्या विदर्भात उद्योगांची अत्यंत कमतरता असल्यामुळे नाईलाजाने येथील गोरगरिबांना एकतर ऊस तोडणी ला किंवा पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी बिगारी काम करायला जावे लागते.
मुंबईत जाऊन काहीतरी काम मिळेल आणि आपल्या कुटुंबाची सोय लागेल या भावनेने तो युवक मुंबईला गेला होता. मात्र, त्याच्यासोबत ठेकेदाराने बदमाशी केल्यामुळे त्याच्यावर अशी वेळ आली. या घटनेच्या संदर्भाने तो पोलीस कम्प्लेंट करेल की आणखी काही...?
मात्र त्याला इथून 800 किलोमीटरचे अंतर पार करून रोजगारासाठी मुंबईला जावे लागते याचेच दुःख वाटते...
आपल्या विदर्भात रोजगाराचा प्रश्न किती बिकट झाला आहे...
याची जाणीव होण्यासाठी ही घटना पुरेशी आहे असे मला वाटते...
आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा...
( टिप : दैनंदिन कामाच्या निमित्ताने माझे दररोज वेगवेगळ्या भागात फिरणे असते...
दरम्यान आलेले अनुभव शेअर करण्याचे मी ठरवले आहे... लवकरच पुढील अनुभव घेऊन येईल... )
✍️ गजानन धामणे
मुक्त पत्रकार, वाशीम
9881204538

Post a Comment