प्रवासातील अनुभव
आजचा प्रसंग...
भाग : 01
दि. 19 जून 2024 रोजी चा अनुभव
अन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले...
पुसद - अकोला ही बस पुसद वरुन नियमित वेळी ठिक 6.30 वाजता निघाली.
पुसद येथून निघतांना बस हाऊसफुल होती. दरम्यान, खंडाळा आणि मारवाडी फाट्यावर बरेच लोक उतरले. त्यानंतर बस पुढे निघाल्यावर प्रत्येकाला सीट मिळाली. मी कंडक्टर च्या बाजूलाच बसलेलो होतो.
जसजसे अनसिंग जवळ येत होते, तसे मागील सीटांवर बसलेले नऊ जण समोर आले. त्यांच्या राहणीमानावरून पेहराव व बोलण्यातील नम्र भावामुळे ते दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील असावेत. त्यांना ढील्ली या गावाला जायचे होते. अनसिंग येथून ढील्ली या गावाला जाण्यासाठी शेवटची एसटी बस सात वाजता होती. आणि आमची गाडी साडेसात वाजता अनसिंग येथे पोहोचणार होती. त्यामुळे आता ढील्ली बस निघून गेली असणार? आपण आता ढील्लीला कसे जायचे? या विचारात एक आजीबाई आणि तिचा साधारणतः 55 वर्षाचा मुलगा एकमेकांशी हितगुज करत होते. चेहऱ्यावर प्रचंड नैराश्य आले होते. कारण एसटी बस जर गेली असेल तर आपण आता घरी कसे जायचे किंवा अनसिंग येथे कुठे थांबायचे. या नऊ ही जणांतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हे भाव स्पष्टपणे दिसत होते . शेवटी अनसिंग फाट्यावरील कमानीतून बस अनसिंग कडे वळली. आता कसं जायचं घरी, देव करो अन बस गेलेली नसो, अशी कुजबूज त्यांच्यात सुरू झाली. त्यांच्या या बोलण्या बोलण्यात अनसिंग बस स्टैंड वर आमची बस पोहोचली.
आणि पाहतो तर काय, ढील्ली येथे जाणारी बस निघण्याच्या बेतातच होती, ड्रायव्हरने गाडी स्टार्ट करूनही ठेवली होती. जणू काही ती बस या नऊ लोकांच्या येण्यासाठीच थांबली असावी असे चित्र त्या ठिकाणी दिसून आले.
ही जाणारी बस ढील्लीलाच जात आहे हे त्या नऊ लोकांना कळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलेले दिसले. काहींनी तर आमच्या बसमधूनच ओ ड्रायव्हर साहेब थांबा आम्हाला ढील्लीला यायचे आहे. असे म्हणून त्या ड्रायव्हरला आवाज दिला आणि पटापट आमच्या बसमधून उतरून ढील्लीच्या बस मध्ये ते दाखल झाले. त्या बस मध्ये शिरताना त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो अवर्णनीय होता. आम्ही आमच्या गावच्या बस मध्ये बसलो म्हणजे घरी पोहोचलो. या भावनेने आणि जणू काही एखादी मोठी परीक्षा आपण पास केल्यानंतर मिळणारा एवढा आनंद त्या ढील्लीवासीयांच्या चेहऱ्यावर दिसून आला.
बरेच लोक पैशात किंवा इतर अनेक गोष्टींमध्ये सुख शोधत असतात. मात्र, गोरगरिबांना मिळणारे सुख हे त्याहीपलीकडे सामान्य जीवन जगताना अनेक वेळा अनुभवास येते. याचा प्रत्यय मला आज आला. सुख शोधायला गेलो आणि सुखाचा वाटेकरी झालो असा अनुभव मी आज घेतला.
त्यांना बस मिळाल्याच्या आनंदाने मी सुद्धा आनंदून गेलो आहे...
हा अनुभव लिहिता लिहिता मी सुद्धा वाशिम शहरात पोहोचलो आहे...
( टिप : मी दररोज माझ्या दैनंदिन नोकरीच्या निमित्ताने प्रवास करत असतो. असे अनेक अनुभव मला दररोज येत असतात. पुढे वेळ मिळेल तसा मी असे अनुभव शब्दबद्ध करून शेअर करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे )
✍️ गजानन धामणे मुक्त पत्रकार, वाशीम
9881204538

Post a Comment