प्रवासातील अनुभव
प्रवासातील अनुभव...
( भाग - 4 )
... तर आपण अपघातापासून कुणाला तरी वाचवू शकतो.
गुरुवारी ( दि. 27 जून 2024 ) मी दैनंदिन कामानिमित्त मालेगाव ला गेलो होतो. हायवे रोड आणि वीसच किलोमीटर अंतर असल्यामुळे मोटर सायकलनेच गेलो होतो. ठराविक कामे आटोपून मी पाण्यापावसाचा अंदाज घेवून पाच वाजता मालेगाव वरुन परत निघालो. दृतगती हायवे असल्यामुळे साहजिकच 60 च्या स्पीड ने मार्गक्रमण करत होतो. दरम्यान, झोडगा बू गावानजिक असलेल्या जलधारा धाब्याजवळील पुलाजवळून जातांना भर रस्त्यात सात आठ मोठे दगड पडलेले मला दिसून आले. माझी गाडी बऱ्यापैकी स्पीड मध्ये असल्यामुळे आणि दिवस असल्यामुळे अचानक दिसलेले दगड चुकवून मी पुढे गेलो. त्याच क्षणी माझ्या लक्षात आले की, हे दगड जर क्षणात आपल्याला दिसले नसते तर त्यावरून आपली गाडी गेली असती आणि अपघात झाला असता. आपण तर कसेबसे वाचलो मात्र, मागून येणाऱ्या अनेक वाहनांपैकी कुणीतरी या दगडावर जाऊन पडणार आणि अपघात होणार, हा विचार करून मी तातडीने गाडी थांबून रिव्हर्स घेतली. आणि ते सर्व दगड रस्त्याच्या बाजूला सारले. तेव्हा कुठे मला समाधान वाटले.
हे दगड रस्त्याच्या बाजूला सारले म्हणजे मी फार मोठे समाज कार्य केले असा याचा अर्थ होत नाही. किंवा मी केलेल्या कामाचा मोठेपणा म्हणून सुद्धा मी हा अनुभव शेअर करत नाही. परंतु आपल्या छोट्याशा कामामुळे एखाद्याचा जीव वाचवू शकतो. होणारा अपघात आपण टाळू शकतो. हा संदेश या अनुभवाच्या माध्यमातून मला द्यायचा आहे. सदर दगड हे रस्त्यावर कोणी आणि कसे टाकले. हे सांगता येत नसले तरी एखादे वाहन रस्त्यात बंद पडले असेल म्हणून त्यांनी आजूबाजूला हे दगड ठेवले असतील आणि वाहन सुरू झाल्यानंतर ते दगड बाजूला न सारता तसेच निघून गेले असतील अशी शक्यता वाटते. मात्र ज्याने कुणी कशासाठी हे दगड रस्त्यात आणले असतील त्यांनी संभाव्य अपघात टाळण्यासाठी रस्त्याच्या बाजूने करणे गरजेचे होते. परंतु बऱ्याच वेळा लोक विसरून जातात किंवा आपल्याला तर जायचं आहे जाऊद्या ना तिकडे. या भावनेने लोक निघून जातात . अशाच प्रकारे रस्त्यात वाहन उभे असताना किंवा चांगल्या रस्त्यावर दगड असल्यामुळे अपघात झाल्याच्या घटना घडत असतात.
आता पावसाळ्यात शेतात काम करून येणारे ट्रॅक्टर टायर भरलेल्या चिखलाने रस्त्यावरून येतात आणि चिखल रस्त्यावर सांडून जातात. चोपड्या रस्त्यावर चिखल आल्यामुळे मोटर सायकल किंवा छोट्या वाहनांचा टायर घसरून अपघात होतो. अशा अनेक घटना आणि व्हिडिओ आपण पाहत असतो. मात्र, या संदर्भाने समयसुचकता दाखवून उपाययोजना करताना फार कमी लोक दिसत असतात.
सामाजिक कार्य करायचे म्हणजे फार काही जबाबदारी घेऊन करावे लागते असे नाही. आपण चालता फिरता अशा अनेक गोष्टी आपल्या निदर्शनास येतात. दरम्यान वेळीच एखाद्याला मदत मिळाली तर आपण त्यांचा जीव वाचवू शकतो. एखाद्या गरजूला वेळीच मदत मिळाली तर आपल्याकडून झालेले ते समाजकार्यच म्हणता येईल. संकटात सापडलेल्याला मदत करणे एवढे तरी आपण लक्षात घेतले तर आयुष्यात आपण बरेच चांगले कामे करू शकतो.
एकीकडे अशा घटना घडत असताना संकटात सापडलेल्या ला मदत करण्याऐवजी त्याचे मोबाईल मध्ये व्हिडिओ काढण्यात धन्यता मानणारे ही अनेक आहेत.
असो, रस्त्यात पडलेल्या दगडामुळे माझाच अपघात होण्यापासून मी वाचलो. यावेळी केवळ समय सुचकता दाखवून मी वाचलो परंतु माझ्या मागून येणार आहे एखादा दगडावर घसरून पडला आणि अपघात झाला तर त्याला आपण संभाव्य धोक्यापासून टाळू शकतो या भावनेने मी हे दगड बाजूला सारलेत.
माझ्या या प्रवासातील अनुभवातून एखाद्या व्यक्तीने जरी असे मदतीचे पाऊल उचलले तर माझ्या या प्रवासातील अनुभवाचे चीज झाले असे मला वाटेल.
आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
( टिप : दैनंदिन कामाच्या निमित्ताने माझे दररोज वेगवेगळ्या भागात फिरणे असते. दरम्यान आलेले अनुभव शेअर करण्याचे मी ठरवले आहे. लवकरच पुढचा भाग आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करेल. )
✍️ गजानन धामणे, मुक्त पत्रकार, वाशीम
9881204538


Post a Comment