प्रवासातील अनुभव भाग 20 एसटी प्रवासात "उदंड जाहली गर्दी"!

 प्रवासातील अनुभव...








( भाग : 20 ) 


 गुरुवार दि. 05 जून 2025 रोजीचा अनुभव...


*एस टी प्रवासात "उदंड जाहली गर्दी "*

 

👉🏻 आज मला कामानिमित्त उमरखेड येथे जायचे होते. सकाळी 8 वाजता  वाशिम - पुसद गाडीने प्रवास सुरू केला. 


 ( मी केव्हाही  बसने प्रवास करण्यासाठी बाहेर पडतो, त्यावेळेस  प्रवास करताना आपल्याला बस मध्ये  जागा मिळेल याची शाश्वती नसतेच, आपल्याला उभे राहूनच प्रवास करावा लागेल. याची मनोमन तयारी करूनच मी  बसने जाण्याचा निर्णय घेत असतो. कारण,  प्रवाशांची संख्या आणि त्या तुलनेत असणाऱ्या  एसटी महामंडळाच्या गाड्या  यामध्ये फार मोठी तफावत आहे. )  


  असो,  सकाळी आठ वाजता पुसद गाडीत बसलो. असे वाटले सकाळी  8  वाजता तरी बसण्यासाठी सीट मिळेल. मात्र, नाही मिळाली. अनसिंग आल्यानंतर काही प्रवासी उतरले. आणि तेथे जागा झाली. सव्वा तासात पुसदला पोहोचलो. 


 पुसद येथून उमरखेड जाण्यासाठी  बसला वेळ असल्यामुळे  नाश्ता करून घेतला. त्यानंतर अर्धा पाऊन  तासानंतर यवतमाळ - नांदेड ही बस आली. ही बस उभी झाल्यानंतर  100  ते सव्वाशे लोक बसच्या आजूबाजूला खिडकीजवळ जाऊन  रुमाल टाकून जागा जिंकण्याचा प्रयत्न करत होते. एवढी गर्दी पाहून  या बस मध्ये काही जायला परवडणार नाही. 

 म्हणून मी दुसरी बस येण्याची वाट पाहिली. 

दहा मिनिटांनी शिवशाही बस आली. त्यात जागा मिळाली आणि बसलो.  सव्वा दीड तासात उमरखेड पोहोचलो. 


 उमरखेड येथून काम आटोपून  चार वाजता  बस स्टैंड वर येऊन पुसद गाडीची वाट पाहत होतो. 

 अर्ध्या तासात  नांदेड - यवतमाळ गाडी आली. 

 उमरखेड बस स्थानकात एक तासापासून पुसद कडे जाणारी गाडीच नसल्यामुळे  साधारणतः  50 च्या वर  प्रवासी जमा झाले होते, आणि या बस मध्ये चढणार होते. 


 पुसद वरून वाशिम ला गाडी मिळावी म्हणून लवकर येण्यासाठी त्याच बसमध्ये मलाही येणे गरजेचे होते. 


 गाडी आल्यानंतर पटापट लोक गाडीत चढले. सरते शेवटी पाय ठेवायला सुद्धा गाडीत जागा नव्हती. 

  अशाच गर्दीत मीही चढलो. आत गर्दीत न जाता प्रवेशद्वारा जवळच थांबलो. 


    या गाडीचा कंडक्टर, आणि ड्रायव्हरही अफलातूनच होते. 

 ड्रायव्हर  हा तरणाबांड उंचपुरा काळा गॉगल लावलेला,  रांगडा गडी दिसत होता. तर कंडक्टर हा नुकताच रुजू झालेला असावा असा पंचवीस वर्षाचा  ठेंगणासा युवक होता.  गाडीत एवढ्या मोठ्या गर्दीत तिकीट काढताना तो दिसतही नव्हता. 


  गाडी सुरू झाली, उमरखेड ते पुसद हा रस्ता  मुळातच अरुंद  आणि प्रचंड खड्डे असलेला रस्ता. 

 गर्मीच्या उकाड्याने  हैराण झालेले प्रवासी, आणि खड्ड्यांमधून गाडी  आदळत असल्याने एवढ्या गर्दीत प्रवास करताना  सगळ्याच प्रवाशांची प्रचंड दैना झालेली पाहायला मिळाली. 


 पोफाळी साखर कारखान्यावर गाडी थांबली. दोन प्रवासी उतरले आणि  पुन्हा आठ दहा प्रवासी बसले. आणि पुन्हा गर्दीने बस पॅक झाली. 


  खड्ड्याच्या रस्त्याने धडाल धडल करत बस पुसदला पोहोचली. 

 वाटले एकदाची  मोठ्या गर्दीतून सुटका झाली. 


 माझा प्रवास तर संपला नव्हता, आता पुसद वरून वाशिम कडे यायचे होते. 

 चौकशी कक्षात विचारले तर सहा वाजता गाडी आहे असे ते म्हणाले . 


 प्लॅटफॉर्मवर उभे असताना  पुसद -  परभणी बस  लागलेली होती. या बस मध्ये 100 पेक्षा अधिक प्रवासी दिसत होते. 

  बसमधील आसनांची  संख्या  45 ते 50 दरम्यान असते. तर दहा पंधरा प्रवासी उभे राहू शकतात. मात्र,  या बसमध्ये प्रत्येक सीटवर तीन माणसे  बसलेली असूनही  50 च्या वर लोक  उभे दिसत होते. 


 एवढ्या लोकांना आम्ही घेऊन जाऊ शकत नाहीत. 

 असे कंडक्टर आणि ड्रायव्हर खालूनच बोलत होते. मात्र,  एकही प्रवासी खाली उतरण्यास तयार नव्हता. कंडक्टर म्हणाले की एवढ्या गर्दीत मला तिकीटच काढता येत नाही. 

 त्यामुळे पंचवीस तीस टक्के प्रवासी कमी झाल्याशिवाय आम्ही बस येथून हलवतच नाही. 


 साधारणतः मी येण्याच्या आधी एक तासापासून  प्रवासी या बस मध्ये बसलेले असावेत. 

 काही प्रवासी महिला आणि कंडक्टर  यांच्यामध्ये गाडी  सुरू करण्यावरून खटके उडत होते. 

 प्रवासी ऐकण्यास तयार नसल्याने  एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी  पोलीस कर्मचाऱ्यांना पाचारण केले. पोलिसांनीही समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र,  कोणीही प्रवासी उतरण्यास तयार नव्हते. 

 उतरण्यास विनंती केली असता, एक महिला प्रवासी म्हणाली की, ही गाडी गेली तर आम्ही येथे कुठे थांबणार, आणि उशिरा गाडी मिळालीच तर पुढे आमच्या गावाकडे कसे जाणार, त्यामुळे नाईलाजाने आम्हाला या बस मध्येच यावे लागेल. 

 अशाप्रकारे अनेक प्रवासी आपल्या अडचणी सांगत होते. एवढ्यात मी तिथे आलो, एसटी मधील गर्दीचे  फोटो काढण्यास सुरुवात केली. यावेळी कंडक्टर व इतर काही उभे असलेले प्रवासी  म्हणालेत की, बसच्या आत जाऊन आपण फोटो काढा. तेव्हा गाडीत किती तुफान गर्दी आहे हे दिसेल.  मी पत्रकार असल्याचे त्यांनी  मनोमन समजून घेतले असेल. कारण अशा प्रकारे हे इतर सामान्य व्यक्ती फोटो काढताना आढळून येत नाही. 

 दरम्यान मी गर्दीचे फोटो हे काढले. मात्र,  गाडी निघण्यासाठी  एकच तोडगा निघाला, तो म्हणजे  हिंगोली कडे जाणारी  दुसरी गाडी जोपर्यंत येत नाही,   तोपर्यंत ही गाडी येथून हलवणार नाही. 


 अशाप्रकारे तब्बल दीड तासापेक्षा अधिक काळ  मी असेपर्यंत 100 पेक्षा अधिक प्रवासी त्या बसमध्ये ताटकळत उभे होते. दरम्यान, पुसद - वाशिम ही गाडी लागली. आणि मी त्या गाडीत बसलो. कदाचित थोड्या वेळा आधीच  वाशिम कडे येणारी गाडी  गेली असेल. त्यामुळे मला या गाडीत जागा मिळाली. 


 मात्र,  परभणी कडे जाणारी ती गाडी केव्हा निघाली असेल, दुसरी गाडी लवकरच आली असेल का, त्या प्रवाशांचे किती हाल झाले असतील, याचा विचार केला तरी एसटी महामंडळाबाबत शासन किती उदासीन आहे  याची प्रचिती येते. 


 माझ्यासारख्या अशा  प्रवासातील घटनांवरून   शासनाने आणि एसटी महामंडळाने काहीतरी बोध घेण्याची गरज आहे. 


एकीकडे एसटी महामंडळाने  अव्वाच्या सव्वा  प्रवासी तिकीट दर वाढविले आहेत. 

 एवढे मोठे तिकीट दर देऊन सुद्धा  प्रवास करताना प्रवाशाला जागा मिळेलच याची कुठलीही खात्री नसते. 


 प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असल्यामुळे एसटी महामंडळाने  प्रवाशांची  लक्ष संख्या लक्षात घेता  नवीन एसटी गाड्या आणण्याची गरज असताना  काही दिवसांपूर्वी काही बोटावर मोजण्या इतक्या गाड्या  आणल्यात. आणि भंगार गाड्या शासन जमा केल्या. त्यामुळे गाड्यांची बेरीज आणि वजाबाकी केल्यास  फार काही गाड्यांची संख्या वाढली आहे असे म्हणता येणार नाही. 


वाढत्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता  पुरेशा गाड्या राज्यातील  कुठल्याच बसस्थानकाकडे उपलब्ध असतील असे वाटत नाही. म्हणूनच प्लॅटफॉर्म वरून सुटणारी प्रत्येक गाडी  फुल गर्दीने पुढे  मार्गक्रमण करते. याचा सर्वाधिक त्रास कंडक्टर आणि ड्रायव्हरला सोसावा लागतो. 


 माझ्यासारख्या सतत बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवास करताना अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. 

 मी जेव्हा केव्हा बसने प्रवास करतो , त्यामध्ये 80 टक्के प्रवास  बस मध्ये उभे राहूनच करावा लागतो. 

 सर्वत्र, हेच एसटी प्रवासाचे वास्तव आहे. 


महिलांसाठी अर्ध टिकीट आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास आहे. तसेच इतरही प्रवास सवलती आहेत. त्यामुळे साहजिकच  एसटी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या  मोठ्या प्रमाणात आहे. 

 असे असताना  पाहिजे त्या प्रमाणात  बस उपलब्ध करण्याची जबाबदारी शासनाची नाही का? 

 की जाणून बुजून  त्यांना जनतेला वेठीस धरायचे आहे? एसटी महामंडळाकडे पैसा नाही असे म्हटले तर  ते संयुक्तीक  होणार नाही. कारण  प्रवाशांची संख्याच एवढी आहे की  एस टी महामंडळ प्रचंड नफ्यात असावे. मग प्रवाशांसोबत  शासन आणि एसटी महामंडळ एवढ्या निष्ठुरपणे का वागत असेल? याचा विचार कोण करणार आहे? 

   

( टिप : मी दैनंदिन कामानिमित्त दररोज कुठेतरी प्रवास करत असतो. प्रवासादरम्यान अनेक अनुभव मला येत असतात. यातील काही निवडक अनुभव शेअर करण्यासाठी मी *प्रवासातील अनुभव* 

हे सदर सोशल मीडियावर सुरू केले आहे . आजचा हा *विसावा* भाग आहे. हा अनुभव आपणास कसा वाटला हे आपल्या कमेंट च्या माध्यमातून जरूर कळवा. ) 

✍️ गजानन धामणे 

मुक्त पत्रकार,  वाशिम 

9881204538

Post a Comment

Previous Post Next Post