*प्रवासातील अनुभव...*
( भाग : 19)
सोमवार दि. 02 जून 2025 रोजीचा अनुभव...
डायल 112 चा सुखद अनुभव
👉🏻 आज मी वाशिम शहरातच होतो. दिवसभराची कामे आटोपून सिव्हिल लाईन स्थित घरी पोहोचलो. रात्री 7.30 वाजता घरच्यांनी काही वस्तू आणायला सांगितल्या. गाडीची चावी घेतली आणि गाडी स्टार्ट केली. गाडीवर बसल्यावर कळाले की गाडी पंक्चर झाली आहे. गाडी शिवाय तर आपल्याला काहीच करता येणार नाही. त्यामुळे सकाळची वाट न पाहता, आत्ताच जाऊन गाडी पंचर काढून आणू, या उद्देशाने मी सिव्हिल लाईन येथून तहसीलच्या बाजूने असलेल्या पंक्चरच्या दुकानाकडे निघालो. गाडी लोटत असताना लघु सिंचन विभागाच्या समोर मुख्य रस्त्यावर एक व्यक्ती रस्त्यात पडलेला आढळून आला. या व्यक्तीच्या जवळच एक कुत्रा सुद्धा बसलेला होता.
वास्तविक पाहता तोच व्यक्ती दुपारी मी जेव्हा घराकडे आलो होतो , तेव्हाही त्याच ठिकाणी पडून होता. वाटले हा व्यक्ती अल्कोहोल घेतलेला असेल, दोन-तीन तासानंतर आपोआप उठून जाईल.
मात्र, आता मी त्याला पाहिल्यानंतर दुपारी तो ज्या अवस्थेत पडलेला होता, त्याच अवस्थेत आताही पडलेला दिसला.
यामुळे मला डाऊट आला,
रात्रीचे साडेसात आठ वाजत आहेत. रस्ता चांगला असल्यामुळे भरधाव वेगाने गाड्या येतात जातात. कदाचित या व्यक्तीच्या अंगावर अचानक एखादी भरधाव गाडी गेली तर अनर्थ होईल.
सोबतच, दुपारपासून या वेळेपर्यंत तो व्यक्ती एकाच ठिकाणी निपचित पडलेला असल्यामुळे काही बरे वाईट तर झाले नसेल ना, असाही संशय मला आला.
आपण जर या घटनेची दखल घेतली नाही तर, आणि रात्रभर हा व्यक्ती असाच पडून राहिला तर काहीही होऊ शकते.
हा विचार करूनच माझ्या काळजात चर्रर्रर्र झाले.
आपण ही घटना पोलीस बांधवांना कळविली पाहिजे. आणि त्यांच्या मदतीने या व्यक्तीबद्दल शहानिशा केली पाहिजे. हा विचार करून मी सर्वप्रथम माझे मित्र कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी गजानन काळे यांना कॉल केला.
गजूभाऊ असा असा व्यक्ती या ठिकाणी पडलेला आहे. काय केले पाहिजे.
यावेळी त्यांनी मला 112 हा क्रमांक डायल करा आणि सर्व हकीकत त्यांना सांगा, असे सांगितले.
गाडी लोटत लोटत पुढे जाताना मी 112 हा क्रमांक डायल केला.
112 क्रमांक डायल केल्यानंतर पोलीस प्रशासन आणि ॲम्बुलन्स यांची मदत घेण्यासाठी एक डायल करण्याचे सांगितले.
एक हा आकडा डायल केल्यानंतर समोरच्या व्यक्तीने मला माझे नाव विचारले आणि घटनाक्रम विचारला. यावेळी मी त्यांना सविस्तर माहिती दिली.
आपल्याला ॲम्बुलन्स हवी आहे का, असेही त्यांनी मला विचारले. घटनेची हकीकत पाहून त्यांनीही ॲम्बुलन्स ला सुद्धा पाठवून देऊ असे मला सांगितले.
यावेळी त्यांनी लगेचच स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांना कॉन्फरन्स मध्ये घेऊन मला 'ऍक्युरेट ऍड्रेस' विचारला. यावेळी मी त्यांना ऍड्रेस बद्दल सविस्तर माहिती दिली.
एवढ्या वेळात मी लक्झरी स्टॅन्ड जवळ रॉयल पॅलेस समोरील एका पंक्चरच्या दुकानावर पोहोचलो होतो.
गाडी पंक्चर काढण्यास सुरुवात झाली.
तेवढ्यात वाशिम शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी प्रल्हाद तागड यांचा मला कॉल आला.
आपण गजानन धामणे बोलता का, मी म्हटले हो, यावेळी ते म्हणाले की, आम्ही आपण सांगितलेल्या ठिकाणी पोहोचलो आहोत.
त्या व्यक्तीबद्दल मी विचारले असता ते म्हणाले की, सदर व्यक्ती हे अल्कोहोल घेतलेले असल्यामुळे ते पडून होते.
ते निपचित पडून असल्यामुळे आम्हालाही डाउट आला. मात्र, आम्ही तेथे आल्यानंतर त्यांना आवाज दिला आणि ते उठून बसले.
यावेळी त्यांच्यासोबत आलेल्या ॲम्बुलन्स मधील डॉक्टर मॅडम यांनी मला फोनवर सांगितले की , सदर व्यक्तींना आम्ही हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी तयार आहोत, मात्र, ते येण्यास नकार देत आहेत.
आपण येथे या , आपण सर्वजण त्यांना बोलू.
मात्र माझी गाडी पंचर काढण्यास वेळ लागणार असल्यामुळे मी त्यांना दहा मिनिटे थांबण्याचा सल्ला दिला.
सदर व्यक्तीचे नातेवाईक पोलीस कर्मचाऱ्यांच्या ओळखीचे असल्यामुळे तागड साहेबांनी त्यांना कॉल करून सांगितले, आणि आपल्या नातेवाईकाला घेऊन जाण्याचा सल्ला दिला.
साधारणतः दहा मिनिटांच्या वेळेत मी सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलो.
तेथे आल्यानंतर पोलीस कर्मचारी आणि ॲम्बुलन्स सुद्धा निघून गेलेली होती.
आणि ते व्यक्ती जोराजोरात बोलत होते.
मी त्यांच्याजवळ गेलो असता अधिकच जोरात बोलणे त्यांनी सुरू केले.
मी मनातल्या मनात म्हटले, जाऊद्या आता हे होशवर आलेत, आता नाही परंतु थोड्या वेळात हे इथून उठून निघून जातील, हा विचार करून मी माझ्या घराकडे मार्गस्थ झालो.
संभाव्य अपघातातून एका व्यक्तीला आपण वाचविल्याचे समाधान मला मनोमन वाटले.
या घटनेमध्ये मला एक प्रकर्षाने जाणवले की , तो व्यक्ती ज्या ठिकाणी रस्त्यावर पडलेला होता. अगदी त्याच्या जवळच एक कुत्रा बसलेला होता.
कदाचित हा व्यक्ती त्या कुत्र्याला आपल्या घासातला घास म्हणून अन्न देत असेल. आणि म्हणूनच आपल्या मालकाची राखणदारी करण्याचे काम तो कुत्रा इनामे इतबारे करत होता.
मुके प्राणी किती संवेदनशील आणि इमानदार असतात. हे मला या घटनेवरून दिसून आले.
सोबतच या व्यक्तीच्या अंगावर अचानक एखादी गाडी गेली तर अनर्थ होईल. हा धोका सुद्धा पोलीस बांधव आणि ॲम्बुलन्स च्या माध्यमातून टळला होता.
एक आवर्जून सांगायचे म्हणजे, माणसातील माणुसकी कुठेतरी हरवते आहे की काय असा प्रत्येक अनेक वेळा निर्माण होत आहे.
कालच आमचे पत्रकार मित्र संदीप पिंपळकर यांनी अशीच एक घटना शेअर केली. एक जर्जर झालेली म्हातारी रस्त्याच्या मधोमध पडलेली होती. मात्र, तिला कोणीही उचलत नव्हते. संवेदनशील असलेल्या संदीप पिंपळकर यांनी पोलीस प्रशासनाला कळवून तिला हॉस्पिटलमध्ये हलवले. आणि तिचा जीव वाचविला.
मात्र, कालच्या या घटनेतून तसेच आजच्या घटनेतून प्रश्न हा निर्माण होतो की, एवढ्या मोठ्या रहदारीच्या रस्त्यावर शेकडो लोक ये - जा करतात. मात्र, रस्त्यात पडलेल्या अशा माणसांना मदत करण्याची त्यांची इच्छा का होत नसेल?
हा प्रश्न तर माझ्यासाठी ही अनुत्तरीतच आहे?
आपल्याकडे याचे उत्तर असेल तर नक्कीच द्यावे?
( टिप : मी दैनंदिन कामानिमित्त दररोज कुठेतरी प्रवास करत असतो. प्रवासादरम्यान अनेक अनुभव मला येत असतात. यातील काही निवडक अनुभव शेअर करण्यासाठी मी *प्रवासातील अनुभव* हे सदर सोशल मीडियावर सुरू केले आहे . आजचा हा *एकोणिसावा* भाग आहे. हा अनुभव आपणास कसा वाटला हे आपल्या कमेंट च्या माध्यमातून जरूर कळवा. )
✍️ गजानन धामणे
मुक्त पत्रकार, वाशिम
9881204538
Post a Comment