प्रवासातील अनुभव भाग 22

 प्रवासातील अनुभव...



( भाग : 22 ) 


सोमवार दि. 21 जुलै 2025 रोजीचा अनुभव...


पावसाळ्यातील दमटपणा, बस मधील गर्दी  अन जीव झाला घामाघुम...!


 


👉 आज मला कामानिमित्त यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे जायचे होते. पावसाळा असल्यामुळे केव्हाही पाऊस येऊ शकतो , याची जाणीव ठेवून मी दूरचा प्रवास बसनेच करत असतो. 

आज सकाळी नऊ वाजता अकोला -  पुसद बसणे वाशीम वरून पुसद कडे निघालो. दररोज प्रमाणेच  प्रवाशांची प्रचंड गर्दी असल्यामुळे  बस मध्ये चढल्यानंतर  कशीबशी उभे राहण्यासाठी जागा मिळाली. पुसद कडे जाताना  शीटवर जागा मिळाली नाही तर  अनसिंग येथे सीट मिळण्याची शक्यता असते. आणि तेथून शीट मिळाली नाही तर मग पुसद पर्यंत  "स्टँडअप"  मध्येच प्रवास करावा लागतो. हा नेहमीचा अनुभव. 

 आजही तसेच झाले. गर्दीने  "पॅक" असणारी बस वाशिम मधून निघाल्यानंतर अनसिंग बस स्थानकावर  चार-पाच प्रवासी उतरले. मात्र,  त्यापेक्षा दुपटीने प्रवासी चढले. त्यामुळे सीटवर जागा मिळणे  अशक्य होते. 

 अनसिंग येथून बस सुरू झाली. मुळात वाशिम ते पुसद हा रस्ता मारवाडी पासून थेट पुसत पर्यंत  डोंगररांगांचा असल्यामुळे आडवळणे घेतच घाटमार्गातून पुसद गाठावे लागते. हे संपूर्ण जंगल सध्या  हिरवाईने नटले आहे. रस्त्यात कोणत्याही ठिकाणी उभे राहून  सेल्फी काढावा,  असा निसर्गाची मुक्त उधळण करणारा हा रस्ता. 

 आमच्या बस मध्ये  प्रचंड गर्दी होती. वरून कडाक्याचे ऊन पडत असल्यामुळे प्रचंड उकाडा निर्माण झाला होता. सर्वच प्रवासी घामाघून झाले होते. 

 बाहेर हिरवागार निसर्ग, मात्र,  बस मध्ये  प्रचंड गर्मी आणि उकाडा, असे एकूणच विसंगत चित्र या प्रवासादरम्यान होते.


 मला वाशिम पासूनच जागा न मिळाल्यामुळे बसच्या मागील भागात मी उभा होतो. 

 स्टॉप आला की प्रवासी उतरत होते, आणि उतरणार्‍यांपेक्षा जास्त प्रवासी बस मध्ये चढत होते . त्यामुळे बसमध्ये  गर्दी आणखीनच वाढत होती. मारवाडी फाट्यावर तर  50 -  60 प्रवासी उभे होते. त्यामुळे उतरणाऱ्या प्रवाशांना उतरून देऊन  एकही प्रवासी ड्रायव्हरने घेतला नाही. पुढे खंडाळा फाट्यावरही काही प्रवासी चढले. 


 गर्दीमुळे, आणि  कडाक्याच्या उन्हामुळे  मी प्रचंड घामाघुन झालो होतो. 

 त्यातच सलग दीड तास उभे राहिल्यामुळे आणखीनच  घामाघूम झालो. घाट रस्ता संपल्यानंतर गाडी पुसद शहराच्या जवळ आली असताना  मला एकदमच अस्वस्थ वाटायला लागलं. घाम येऊ लागला. वातावरणही तसंच असल्यामुळे तस होणंही साहजिक होतं. 


 अखेर बस पुसदच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन थांबली. 

मला पुसद भरून महागाव येथे जायचे असल्यामुळे  आणि या चौकातूनच बस लागणार असल्यामुळे मी तिथेच उतरलो. मात्र,  उतरल्यानंतर  खूपच अस्वस्थ वाटायला लागले. म्हणून थोडासा आराम करावा,  रिलॅक्स व्हावे आणि नंतरच पुढे जावे, या विचाराने मी बस स्टँड परिसरात आलो. 


 पुसदच्या बस स्टँड  समोर  "तुफान" नावाचे एक  नामांकित कॅन्टींग आहे. तेथील "पायनापल ज्यूस" ची  चवच न्यारी आहे. आपण कधीही,  केव्हाही गेले तरी तो कॅफे हाऊसफुलच असतो. मी जेव्हा केव्हा पुसदला जातो त्यावेळेस  या कॅन्टीन मधील पायनापल ज्यूस घेत असतो. 


 आज तर अस्वस्थ वाटत असल्याने ज्यूस घेणे गरजेचेही होते. अधिक वेळ न करता मी तेथील  ज्यूस घेतला. थोडा रिलॅक्स झालं. परंतु दररोज पेक्षा  अधिक थकवा जाणवत होता. त्यामुळे एखाद्या डॉक्टरला दाखवून देऊ , हा निश्चय करून मी  तेथे बाजूलाच असलेल्या MBBS डॉ. राम राठोड यांच्या राठोड हॉस्पिटलमध्ये गेलो. तेथील कंपाउंडर कडे नाव नोंद केले. थोड्यावेळाने  डॉक्टरांच्या केबिनमध्ये  गेल्यानंतर त्यांना प्रसंग सांगितला. डॉक्टर साहेबांनी तपासणी केली. 

 सर्व काही नॉर्मल होते. 

 वातावरणातील बदल आणि दगदगीमुळे  थकवा जाणवतो. आपण अगदी ठणठणीत आहात. असे डॉक्टर साहेबांनी सांगितले. आणि प्रिकॉशन्स म्हणून काही गोळ्या दिल्या. त्या मी घेतल्या. आणि निश्चिंत होऊन  पुढील प्रवासास निघालो. 


 मी सतत कार्यरत राहणारा  माणूस आहे. मला जसं कळते तेव्हापासून आजपर्यंत  मी कधीही सलाईन घेतले नाही. सर्दी खोकला, ताप याशिवाय कुठलाही आजार  मला झाला नाही. 

 परंतु नेहमीच तब्येतीची  काळजी घेणे हे मी माझे कर्तव्य समजतो. 


 आजही काहीही गरज नसताना सुद्धा मी  डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेतली. आणि निश्चिंत  झालो. 


 तेथून निघाल्यानंतर  छत्रपती शिवाजी महाराज चौकातून खाजगी ट्रॅव्हल्स ने महागाव ला गेलो. 

 या लक्झरी मध्ये मात्र,  जागा मिळाली. 

 तेथील काम आटोपून  चार वाजता पुन्हा लक्झरी ने  पुसद कडे आलो. 


 पुसद वरून वाशिम कडे येण्यासाठी  लोकल खाजगी बसेस नसल्यामुळे एसटी महामंडळाच्या बस शिवाय पर्याय नसतो. पुसद कडून वाशिम येथे येण्यासाठी  किंवा वाशिम कडून पुढे पुसद येथे जाण्यासाठी  साधारणतः एक तासाच्या  फरकाने बसेस आहेत. मात्र,  या एक तासांमध्ये  बस मधील आसनांच्या संख्येपेक्षा दुपटीचे प्रवासी प्रवासासाठी तयार असतात. त्यामुळेच कुठल्याही बस मध्ये प्रवास करताना  जागा मिळणे मुश्किलच असते. 


 बस स्टैंड वर आल्यानंतर मला  माहूर -  वाशिम ही गाडी मिळाली. आणि योगायोगाने जागा सुद्धा मिळाली आणि रात्री आठ वाजता वाशीमला पोहोचलो. 


 मला कामानिमित्त  नेहमीच फिरावे लागते. प्रवासाची सवय असल्यामुळे फार काही त्रास होत नाही. मात्र, आजच्या प्रवासात प्रचंड त्रास जाणवला होता. त्याचे कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून पाऊस  येत नाही आणि वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे. किंबहुना उन्हाळ्यापेक्षाही जास्त ऊन तापत आहे. त्यामुळेच हा त्रास सहन करावा लागला. 


 मला प्रवास करताना बरेच छोटे मोठे अनुभव येत असतात. सकारात्मक अनुभवातून  समाजासाठी दिशादर्शक ठरणाऱ्या अनुभवांना मी शब्दबद्ध करत असतो. मागील 21 वा भाग  21 जून रोजी लिहिला होता. आज बरोबर एक महिना पूर्ण झाला आहे. मध्यंतरी काही बारीक सारिक अनुभव होते. मात्र ते मी शब्दबद्ध केले नाहीत. 

 आज स्वतःच्या तब्येतीबद्दलचा  अनुभव जाणीवपूर्वक शेअर करत आहे. 

 आपणही प्रवास करताना  काळजी घेतली पाहिजे. तब्येतीत  काही चढ उतार झाल्यास त्याला दुर्लक्षित करू नयेत. असा संदेश मला या  प्रवास वर्णनाच्या माध्यमातून द्यावयाचा आहे. 


( टिप : मी दैनंदिन कामानिमित्त दररोज कुठेतरी प्रवास करत असतो. प्रवासादरम्यान अनेक अनुभव मला येत असतात. यातील काही निवडक अनुभव शेअर करण्यासाठी मी *प्रवासातील अनुभव* हे सदर सोशल मीडियावर सुरू केले आहे . आजचा हा *बावीस* वा भाग आहे. हा अनुभव आपणास कसा वाटला हे आपल्या कमेंट च्या माध्यमातून जरूर कळवा. ) 


✍️ गजानन धामणे 

मुक्त पत्रकार,  वाशिम 

9881204538

Post a Comment

Previous Post Next Post